माटुंगा - येथील यशवंत नाट्यमंदिरात सोमवारी मेघ कम्युनिकेशन्सच्या 'भगतसिंग...वन्समोर' या दोन अंकी प्रायोगिक नाटकाचा प्रवेश सादर झाला. हल्ली भगतसिंग यांच्या नावाचा, त्यांच्या विचारांचा विरोध करणाऱ्या लोकांनीही सोयीप्रमाणे त्यांचा वापर केला असल्याचे पाहायला मिळते. आपल्याला सोईचे वाटणारे विचार घेतले जातात आणि बाकी विचारांची गळचेपी केली जाते, या गोष्टीवर नाटकातून बोट ठेवण्यात आले आहे.
एका कॉलेजच्या कट्यावर व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी भगतसिंग सेना अशा कोणत्यातरी सेनेने 14 फेब्रुवारी हा भगतसिंग यांचा हुतात्मा दिन असल्याचे सांगत गोंधळ केल्यामुळे या विषयाला सुरुवात होते आणि खरे भगतसिंग नक्की काय आहेत आणि त्यांचा प्रवास या नाटकातून उलगडत जातो. या नाटकात प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका चोख बजावत आपल्या संवादाचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवलेला दिसून येतो. लेखिका ऋतुजा खरे हिने उत्तम आणि अचूक लेखन केले आहे. नाटकाची निर्मिती मेघ कम्युनिकेशन्सने केली असून, नाटकाचे दिग्दर्शन युवा दिग्दर्शक मंगेश सातपुते यांनी केले आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून, प्रकाश योजना प्रकाश शिंदे यांनी सांभाळली आहे.