एंटरटेन्मेंटचा 'बिग बॉस' आता मराठीत!

बिग बाॅसच्या घरातील लुडबुडी अन् भानगडी कुणाला पटो वा न पटो 'सुजाण' प्रेक्षकांची नस धरत कलर्स मराठी बिग बाॅस मराठीत घेऊन येत असल्याची पक्की माहिती 'मुंबई लाइव्ह'च्या हाती आली आहे. त्यामुळे मायबोलीत बिग बाॅसच्या इंटरटेन्मेटचा धमाका अनुभवायला तय्यार रहा अर्थात मराठीत... हा यातला स्पेशल पाॅईंट.

SHARE

एंटरटेन्मेंट चॅनेलचा तारणहार... टीआरपीचा अनभिषिक्त सम्राट... रिअॅलिटी शोचा बाॅस... अर्थात 'बिग बाॅस' मराठीत येतोय..हो... ही बातमी वाचून तुमचे डोळे खाडकन् उघडतील... उघडायलाच पाहिजेत... कारण मनोरंजनाचा तिसरा डोळा आपला करिष्मा दाखवायला सज्ज होतोय. हा तिसरा डोळा उघडताच 'बिग बाॅस'च्या आदेशावर आता मराठी सेलिब्रिटीही तांडव करतील, तर दुसरीकडे प्रेक्षक त्याची मजा लुटतील. बिग बाॅसच्या घरातील लुडबुडी अन् भानगडी कुणाला पटो वा न पटो, 'सुजाण' प्रेक्षकांची नस धरत कलर्स मराठी बिग बाॅस मराठीत घेऊन येत असल्याची पक्की माहिती 'मुंबई लाइव्ह'च्या हाती आली आहे. त्यामुळे मायबोलीत बिग बाॅसच्या एंटरटेन्मेंटचा धमाका अनुभवायला तय्यार रहा..अर्थात मराठीत... हा यातला स्पेशल पाॅईंट!


मराठीत लोकप्रिय होणार?

'बिग बॉस' रिअॅलिटी शो सुरू होताच कलर्स चॅनेलने लोकप्रियतेची शिखरं गाठली. या कार्यक्रमाने आपला स्वत:चा प्रेक्षक वर्ग तयार केला. फक्त तरूणच नाही, तर बिग बॉसने प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आपल्या मुठीत ठेवलं. म्हणूनच तर हिंदीपाठोपाठ तेलुगू, तमिळ अशा प्रादेशिक भाषांमध्येही बिग बाॅस सुरू होताच या रिअॅलिटी शोने प्रादेशिक भाषेतील प्रेक्षकांनाही वेड लावलं. त्यानंतर आता 'बिग बॉस' मराठी प्रेक्षकांच्या मनाचा ताब घेण्यास तयार होत आहे. कलर्स मराठी बिग बॉस मराठीत सुरू करण्यासाठी वेगाने पावलं उचलत आहे.


पहिल्या टप्प्यातील सेटअप पूर्ण

कलर्स टीव्हीवरील 'बिग बॉस'च्या सेटअपचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. साधारणत: मार्चमध्ये बिग बाॅस मराठीचा पहिला सीझन सुरू होण्याची चिन्ह आहेत. मार्च २०१८ ते जून २०१८ असा हा पहिला सीझन असेल. या पहिल्या सीझनमध्ये नेमके कोण स्पर्धक असतील हे अजून ठरवण्यात आलेलं नाही. मात्र, लवकरच या नावांची घोषणा करण्यात येईल, अशी शक्यता आहे. मराठी बिग बॉसचं शुटींगही लोणावळ्यात होणार आहे.


रितेश देशमुख सूत्रसंचालक?

या शोबाबत अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सेटअपचं काम पूर्ण झाल्यानंतरच शोची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. २०१३ मध्ये अभिनेता रितेश देशमुखने मराठीत बिग बॉस सुरू व्हावं, अशी इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळे मराठी कलाकारांनाही रिअॅलिटी शोचं व्यासपीठ मिळेल आणि मराठी प्रेक्षकांनाही मराठी बिग बाॅसमध्ये आपल्या आवडत्या कलाकारांना बघण्याचा आनंद घेता येईल, असं रितेशने म्हटलं होतं. त्यामुळे रितेशच जर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. याआधी तामिळ बिग बॉसचं अभिनेता कमल हसन, तर कन्नड भाषेतील बिग बॉसचं अभिनेता सुदीप याने सूत्रसंचालन केलं होतं.हेही वाचा

'सारेगमप'चा विजेता नचिकेत लेलेला मिळालेली 'ही' सर्वात मोठी कॉम्प्लिमेंट!


संबंधित विषय