Advertisement

ये क्या हो रिया है?

अँकर... बोलतच असतो, “सीबीआयच्या तपासातला एक महत्त्वाचा दुवा आमच्या हाती लागलेला आहे… हा रियाचा कुत्राच रियाचं सत्य आपल्याला सांगेल… या प्रकरणातलं सत्य उजेडात आणण्यासाठी आम्ही त्याला पळवून आणलंय… आता आपण त्याला सुशांतचा फोटो दाखवू…”

ये क्या हो रिया है?
SHARES

टीव्हीवर एका बावरलेल्या कुत्र्याचा चेहरा आणि एका न्यूज अँकरचा चेहरा… 

अँकर कुत्र्याकडे बोट दाखवून जोरजोराने भुंकत- आय मीन बोलत- असतो. हा पाहा रियाचा कुत्रा. तुम्ही रियाचा कुत्रा टीव्हीवर पहिल्यांदाच पाहताय, फक्त आमच्या चॅनेलवर. आमचं चॅनेल आहे सगळ्यात देशभक्त, सगळ्यात विश्वासार्ह, सगळ्यात हुशार.

यावर कुत्रा नापसंतीदर्शक मान डोलावून काही निषेधाची कुंईकुंई करुन पाहतो... पण या चॅनेलवर तारस्वरात ओरडणाऱ्या पॅनेलचर्चकाचा आवाजही कधी प्रेक्षकापर्यंत जात नाही, त्यांना अँकरचं भुंकणंच- आय मीन बोलणं- ऐकावं लागतं, तिथे या कुत्र्याच्या कुंईकुंईची काय कथा...

अँकर... बोलतच असतो, “सीबीआयच्या तपासातला एक महत्त्वाचा दुवा आमच्या हाती लागलेला आहे… हा रियाचा कुत्राच रियाचं सत्य आपल्याला सांगेल… या प्रकरणातलं सत्य उजेडात आणण्यासाठी आम्ही त्याला पळवून आणलंय… आता आपण त्याला सुशांतचा फोटो दाखवू…”

कुत्रा फोटोजवळ जाऊन शेपूट हलवू लागतो, अँकर त्या कुत्र्याला सुशांतचा कसा लळा लागला होता, याची कहाणी अर्धा तास अश्रुपात करत ऐकवतो, नंतर तो रियाचा फोटो मागवतो, कुत्रा रियाच्या फोटोकडे पाहून भुंकायला लागतो, अँकर लगेच विजयी मुद्रेने सांगू लागतो, “कुत्र्याने निकाल दिलेला आहे. सुशांत किती चांगला माणूस होता आणि रिया किती वाईट आहे, हे या कुत्र्याने आताच सिद्ध केलेलं आहे. खरंतर आता सीबीआयला तपास करण्याचीही गरज नाही. कुत्र्यासारख्या सगळ्यात इमानदार जनावराने आपल्या चॅनेलवर स्पष्टपणे सांगितलेलं आहे की रियानेच सुशांतचा खून केलाय… आता न्यायालयीन कारवाई वगैरेमध्ये वेळ न घालवता तिला ताबडतोब जाहीर फाशी दिली पाहिजे… आज दुपारी बारा वाजताच दिली पाहिजे… आताच आम्ही हॅशटॅग सुरू करतोय… हँग रिया… बिकाॅज द नेशन वाँट्स टु हँग रिया…” 

…हा कार्यक्रम तुम्ही पाहिलात का तुमच्या लाडक्या न्यूज चॅनेलवर… नाही, मग कदाचित अजून प्रसारित झाला नसेल, अजून कुत्रा सापडला नसेल… पण आता झालेला नाही म्हणून यापुढे हा कार्यक्रम प्रसारित होणार नाही, याची खात्री कुणीही देऊ शकणार नाही… श्रीदेवी कशी मरण पावली हे सांगताना स्टुडिओमध्ये बाथटब आणून त्यात झोपून दाखवणारे हे लोक रियासारखी दिसणारी एखादी मुलगी स्टुडिओत आणून तिला फासावर लटकवूनही दाखवू शकतील…

हेही वाचा - वो तो है सटकेला!

…आणि आपण ते पाहू…

…आपण ते पाहतो, म्हणूनच चॅनेल्स हे दाखवतात… असं चॅनेल्सचे कर्तेधर्ते सांगतात…

चॅनेल्स हे दाखवतात म्हणूनच आपण हे सगळं पाहतो, असा प्रेक्षकांचा दावा असतो…

…दोन्हींतलं काय खरं?

…सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचं प्रकरण पाहा… सुरुवातीला इतक्या उमद्या कलाकाराला इतक्या आकस्मिकपणे जीवन संपवावंसं वाटलं, याची अनेकांना हळहळ वाटली होती… तेव्हा चर्चा हिंदी सिनेमातली घराणेशाही, सुशांतसारख्या कलावंताला काम न मिळणं यावर केंद्रित झाली होती. तो घराणेशाहीचाच बळी आहे, असं न्यूज चॅनेलांनी ठरवून टाकलं होतं… (त्यांना रोज सकाळी असं काहीतरी सनसनाटी ठरवायला लागतं… मग त्या काठीने दिवसभर भुई धोपटत फिरायचं असतं…) लाॅकडाऊन नसतानाच्या काळात कुठेही माती उपसणारा बुलडोझर तासन्तास पाहात बसणे हा ज्यांचा राष्ट्रीय टाइमपास होता ते लोक सध्या दिवसाला दोन जीबी फ्री मिळणारा पॅक ‘मारून’ (हे गांजा किंवा गावठी दारू ‘मारण्या’सारखंच असतं) यांच्यामागे तीच भुई धोपटत फिरत असतात… तेव्हा कंगना रणौत ही मानसोपचारांची नितांत गरज असलेली अभिनेत्री (जी महेश भटच्या आशीर्वादाने पुढे आली आणि अध्ययन सुमनपासून हृतिक रोशनपर्यंत ‘घराणेशाही’तून आलेल्या स्टार्सची खरी-खोटी गर्लफ्रेंड बनण्यात जिला कधी कमीपणा वाटला नव्हता) आणि तिच्या विचारांचे कैवारी घराणेशाहीवर आणि सलमान खानवर दोषारोप करण्यात मग्न होते… यासंदर्भात अनेकांना चौकशीसाठी बोलावलं गेलं, मात्र त्यातून काही फार मोठं निष्पन्न झालं नाही आणि प्रकरण थंड होत गेलं… सुशांतच्या मृत्यूनंतर ४० दिवसांनी पुन्हा या सगळ्या प्रकाराने उचल खाल्ली… बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुशांत हा बिहारी असल्याचा साक्षात्कार त्या निवडणुकीतल्या हितसंबंधी पक्षांना झाला… महाराष्ट्रातल्या एकेकाळच्या मित्रपक्षावर सूड घेण्याची उत्तम संधी चालून आली… मग हिंदी सिनेमाला लाजवेल अशी एक बलात्कार आणि खुनाखुनीची कहाणी सगळीकडे प्रसृत झाली… तिच्या आधारे सत्ताधाऱ्यांच्या मुलांच्या ‘उर्ध्वविश्वा’च्या रक्तरंजित कहाण्या सांगणारे लेख आणि बातम्या यांचं सिंचन केलं गेलं आणि या रोपट्याने समाजमनात मूळ धरलं…

इथे एक किस्सा सांगावासा वाटतो… १४ आॅगस्टच्या संध्याकाळी काही कामानिमित्त एका घरगुती उपकरणदुरुस्ती दुकानात गेलो असताना दुकानदार एका गिऱ्हाईक बाईला तावातावाने आणि आपणच तपास केल्याइतक्या ठामपणे सांगत होता, “त्याला कुत्र्याचा पट्टा वापरून ठार मारलंय आत्महत्या नाही, खून आहे हा खून…” 

त्याला विचारलं, “उद्या तुझं दुकान चालू आहे का?” 

तो म्हणाला, “माहिती नाही. उद्यापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंची दुकानं उघडणार आहेत, असं ऐकलंय. पण अजून काही निश्चित कळलेलं नाही.”

त्याला त्या प्रश्नाचा रोख आणि अर्थ कळला नव्हता… आपल्याला आपल्या दुकानाच्या बाबतीत, आपल्या जीवनवास्तवाच्या बाबतीत काय घडणार आहे, याबद्दल काही माहिती नाही आणि आपण कुठल्यातरी चॅनेलवरच्या, व्हाॅट्सअॅपवरच्या कहाण्यांच्या आधारावर इतक्या ठामपणे काहीतरी सांगतो आहोत, यात काही विसंगती आहे, हे त्याला लक्षात येत नव्हतं…

त्याचं सोडा, तुमच्या-आमच्या लक्षात येतंय का? 

काही आठवड्यांपूर्वी तुम्ही धडधडत्या छातीने रोजची कोरोनारूग्णांची आकडेवाढ पाहात होतात… आता आपण जगात सगळ्यात वेगाने कोरोनावाढ दाखवतो आहोत आणि रोज नवे विक्रम नोंदवतो आहोत, याची आपल्याला माहिती आहे का? 

काही वर्षांपूर्वी आपण डिझेल आणि पेट्रोलच्या भावांबद्दल इतके संवेदनशील होतो की महागडं इंधन सरकारने सबसिडी देऊन पुरवल्यावरही आपल्याला तो अन्यायच वाटत होता. आता या इंधनांचे दर कोसळलेले असताना सहा वर्षांपूर्वीपेक्षा अधिक दराने आपण पेट्रोल-डिझेल खरेदी करतो आहोत, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि मुंबईची लाइफलाइन असलेली रेल्वे बंद असताना… ते आपल्यापर्यंत येतंय का?

ही फक्त दोन उदाहरणं झाली… पाच कोटी लोकांची नोकरी गेली आहे, म्हणजे किमान दहा कोटी लोकांचे रोजगार हिरावले गेले असतील, देशाच्या प्रगतीचा वेग कधीच गोठून गेला आहे, येणारा काळ कठीण आहे, संसदीय लोकशाहीचा एकेक पाया पोखरला जातो आहे, राज्यं आणि केंद्र सरकार यांच्यातला संघर्ष कुठेतरी संघराज्याच्या अस्तित्त्वाला धक्का लावण्याच्या पातळीपर्यंत चिघळत चालला आहे, हे सगळं आपल्याला दिसतंय का?

…बहुदा दिसत नाहीये… दिसलं असतं तर आपण भयचकित होऊन ओरडलो असतो, ‘ये क्या हो रिया है?’…

…पण हे कळण्यासाठी आपण खरोखरच्या बातम्या देणारे स्रोत शोधायला हवेत आणि एक भुभू दुसऱ्या भुभूची मुलाखत घेतंय, अशा ब्रेकिंग ‘बातम्या’ दाखवणारी चॅनेलं टीव्हीवर दिसताच तो स्विच आॅफ करायला शिकलं पाहिजे… जमेल काय? (cbi investigation and media trials in sushant singh rajput suicide case )

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा