चिन्मय आणि रसिकाने गाजवला 'कॉलेजकट्टा'

Ghatkopar
चिन्मय आणि रसिकाने गाजवला 'कॉलेजकट्टा'
चिन्मय आणि रसिकाने गाजवला 'कॉलेजकट्टा'
See all
मुंबई  -  

टीव्हीच्या पडद्यावर नियमित दिसणाऱ्या व्यक्तिरेखांबाबत सर्वसामान्य प्रेक्षकांमध्ये कमालीचं कुतूहल असतं. या व्यक्तिरेखा प्रत्यक्षात कशा असतील, त्यांच्या आवडीनिवडी काय असतील हे जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्यात असते. याच उत्कंठेचं शमन करण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेनं पुढाकार घेतला. कोमसापच्या 'युवाशक्ति कॉलेजकट्टा' या उपक्रमांतर्गत अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री रसिका धामणकर यांच्याशी मनसोक्त गप्पांच्या कार्यक्रमाचं आयोजन नुकतंच करण्यात आलं. 

घाटकोपरच्या झुनझुनवाला महाविद्यालयात गप्पांचा हा कार्यक्रम रंगला. ‘नांदा सौख्य भरे’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’ सारख्या मालिकांमधून प्रेक्षकांना माहित झालेला चिन्मय उदगीरकर आणि ‘वहिनीसाहेब’ ही मालिका तसंच ‘ती फुलराणी’ नाटकातल्या भूमिकेसाठी कौतुकपात्र ठरलेली रसिका धामणकर यांना बोलतं करण्याची जबाबदारी कुणाल पाटील आणि मितेश जोशी यांनी सांभाळली. ग्लॅमरविश्वाच्या आजवर रंगवल्या गेलेल्या चित्राचा खरेखोटेपणा उपस्थित श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या कार्यक्रमातून झालं. 

मालिकांच्या सेटवर तसंच रंगमंचावर घडलेल्या गमतीजमती, किस्से सांगणाऱ्या चिन्मय आणि रसिका यांनी आपल्या शाळा-महाविद्यालयातल्या धम्माल आठवणींनाही उजाळा दिला. रसिका धामणकरने सादर केलेली वऱ्हाडी कथेचं सादरीकरण उपस्थितांची दाद मिळवून गेलं.

याप्रसंगी विवेक पिंपुटकर यांनी ‘तरंग’ कथासंग्रहातल्या ‘टीनएजर’ या कथेचं आणि सौरभ नाईक यांनी ‘स्वरमल्हार’ या स्वरचित कथेचं सादरीकरण केलं. किरण यादव यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. विविध महाविद्यालयांमधल्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती नोंदवली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.