कोल्ड प्लेसाठी आता फुकटात मैदान नाही

  Pali Hill
  कोल्ड प्लेसाठी आता फुकटात मैदान नाही
  मुंबई  -  

  मुंबई - कोल्ड प्ले म्युझिकल कार्यक्रमासाठी फुकटात मैदान मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्याबरोबर आयोजकांनी मैदानाचे क्षेत्रफळ कमी केले आहे. या संबंधीचा अर्ज एमएमआरडीएकडे सादर झाल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं मुंबई लाईव्हला दिली आहे.

  19 नोव्हेंबर रोजी एमएमआरडीए मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मैदानाचे 75 टक्के भाडे माफ करण्यात आले होते. सरकार कोल्ड प्लेवर इतके मेहरबान का, कोट्यवधीच्या महसुलावर पाणी का असं म्हणत यावरून चांगलाच वाद सुरु झाला होता. मुंबई ग्राहक पंचायतीने तर मुख्यमंत्र्यांनाच साकडे घालत भाडे माफ न करण्याची मागणी केली होती. त्यानुसार एमएमआरडीएचे अध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमासाठी आयोजकांना मैदानाच्या भाड्याची संपूर्ण रक्कम भरावी लागेल असे जाहिर केले आहे. त्यामुळे आता आयोजकांनी ही रक्कम भरली तर त्यांना मैदान देण्यात येणार असल्याचंही या अधिकाऱ्यानं सांगितले आहे. कोल्ड प्लेसाठी पाच हजार ते पाच लाख रुपये इतके तिकिट आकारण्यात येत आहे. असं असताना भाड्याच्या रक्कमेत सवलत देण्याबरोबरच करमणूक करही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष अँड. शिरीष देशपांडे यांनी स्वागत केले आहे. तर आता भाडे माफी मागे घेतल्यानंतर करमणूक करातील माफीही मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.