आणखी एका सीक्वेलची भर


आणखी एका सीक्वेलची भर
SHARES

मुंबई - सध्या दिवस सीक्वेल्सचे आहेत. दर महिन्यागणिक एखादा तरी सीक्वेल झळकताना दिसतो आहे. विशेष म्हणजे पहिल्या कलाकृतीची दुसऱ्या कलाकृतीला सर येत नाही, हे वारंवार सिद्ध होत असले तरी सीक्वेल्सची संख्या कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. या संख्येत केवळ भर घालण्याचं काम 'कमांडो 2' या चित्रपटानं केलं आहे. विदेशातून काळा पैसा बाहेर काढण्याची मोहीम म्हणजे हा चित्रपट आहे. परंतु, लेखक-दिग्दर्शकानं केंद्र सरकारनं गेल्या नोव्हेंबरमध्ये सुरू केलेल्या निःश्चलनीकरण मोहिमेशी या चित्रपटाचा संबंध जोडला आहे. या मोहिमेचं महत्त्व लक्षात घेऊन ऐन वेळी या मोहिमेला देशभक्तीचा मुलामा देऊन त्यावर आपल्या चित्रपटाची पोळी भाजण्याचा प्रकार दिग्दर्शकानं केला आहे. मात्र निःश्चलनीकरणाची मोहिमेचा गरम तवा केव्हाच थंड झाल्यामुळे चित्रपटाचा जराही प्रभाव जाणवत नाही. मलेशियातील काही थरराक स्टंट दृश्यं सोडल्यास चित्रपटात पाहावं असं काहीच नाही.

विदेशात असलेली विकी चढ्ढानामक व्यक्ती भारतामधील काही लोकांच्या सहाय्याने काळा पैसा पांढरा करीत असते. या चढ्ढाचा तपास लावण्यासाठी केंद्र सरकारतर्फे भावना रेड्डी (अदा शर्मा), एसीपी बख्तवार (फ्रेडी दारूवाला), झाकीर हुसेन (सुमीत गुलाटी) आणि शरद पांडे ही टीम पाठविण्यात येणार असते. या टीमपैकी शरद पांडेच्या जागी ऐनवेळी करणचा (विद्युत जमावाला) समावेश होतो. गृहमंत्री अभया शर्माचा करणवर विश्वास नसतो. त्यामुळे करणवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ती बख्तवारकडे सोपविते. मलेशियाला गेल्यानंतर या टीमला विकी चढ्ढा आणि त्याची पत्नी मारिया (इशा गुप्ता) भेटते. इथून पुढे मग एकापाठोएक एक अशी नवनवीन रहस्यं बाहेर पडू लागतात. त्याचा शेवट होऊन काही लाखो भारतीय गरीब लोकांच्या बॅंक खात्यांमध्ये लक्षावधी रुपये जमा होतात.

पिंकसारखा संवेदनशील लिहिणाऱ्या रीतेश शहा यांनी केलेलं ढोबळ लेखन चित्रपटाच्या ऱ्हासास कारणीभूत आहे. मूळ चित्रपट केवळ काळा पैसा बाहेर काढण्यासंदर्भात असला तरी गेल्या काही महिन्यांमधील घडलेल्या घडामोडींचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. परंतु, तो नुसताच फसलेला नसून अगदी हास्यास्पद वाटतो. चित्रपटाची लांबी दोन तासांची असली तरी तो प्रचंड कंटाळवाणा वाटतो ते लेखन आणि दिग्दर्शनातील कल्पकतेच्या अभावामुळे. टीव्ही मालिकांचा मोठा अनुभव असलेल्या देवेन भोजानीचा दिग्दर्शनाचा हा पहिलाच प्रयत्न आहे. परंतु, चित्रपट माध्यमावर त्याची थोडीही पकड जाणवत नाही. चित्रपटाचा पूर्वार्ध काही थरारक स्टंट दृश्यांमुळे पाहावासा वाटतो. परंतु, उत्तरार्धात सगळीच गडबड झाली आहे. लेखनाच्या आघाडीवर फसलेला हा चित्रपट थोडा फार सावरलाय तो तंत्रज्ञांनी. चित्रपटात फक्त एक गाणं असून तेही चित्रपटाच्या श्रेयनामावलीवेळी येतं. मात्र प्रसाद साष्टे यांचं पार्श्वसंगीत चांगलं झालंय. चिरंतनदास यांच्या कॅमेऱ्यानं फ्रॅंझ स्पिलहॉस यांचे स्टंटस पाहणाऱ्याला थरारक वाटतील याची काळजी घेतली आहे. कलावंतांमध्ये विद्युत जमावालनं अभिनयाच्या फंदात न पडता आपलं सगळं लक्ष स्टंट दृश्यांवर केंद्रीत केलं आहे. अदा शर्मा, फ्रेडी दारूवाला यांची कामगिरीही यथातथाच. थोडक्यात स्टंट दृश्यांची आवड असणारे वगळता इतरांसाठी या चित्रपटात काहीही नाही.

संबंधित विषय