Advertisement

Exclusive: पुलंच्या साहित्याचे अधिकार नेमके कुणाकडे? 'लोकमान्य सेवा संघा'चाही दावा

आयुका या संस्थेने पुलंच्या साहित्याचे हक्क आपल्याकडे असल्याचं म्हणत 'नमुने' या हिंदी मालिकेवर ५० लाख रूपयांचा दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला 'लोकमान्य सेवा संघ' ही सेवाभावी संस्थादेखील पुलंच्या साहित्याचे अधिकार आपल्याकडे असल्याचं म्हणत आहे.

Exclusive: पुलंच्या साहित्याचे अधिकार नेमके कुणाकडे? 'लोकमान्य सेवा संघा'चाही दावा
SHARES

प्रतिभासंपन्न लेखनशैलीच्या बळावर मराठी साहित्याला एका वेगळ्याच उंचीवर नेणारे साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचे अधिकार नेमके कुणाकडे आहेत? हे कोडं अद्याप सुटलेलं नाही. 'मुंबई लाइव्ह'ने दिलेल्या बातमीनुसार पुण्यातील 'इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फाॅर अॅस्ट्राॅनाॅमी अॅन्ड अॅस्ट्रोफिझीक्स'(आयुका) या संस्थेने पुलंच्या साहित्याचे हक्क आपल्याकडे असल्याचं म्हणत 'नमुने' या हिंदी मालिकेवर ५० लाख रूपयांचा दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला 'लोकमान्य सेवा संघ' ही सेवाभावी संस्थादेखील पुलंच्या साहित्याचे अधिकार आपल्याकडे असल्याचं म्हणत आहे. त्यामुळे पुलंच्या साहित्याचे स्वामित्व हक्क नेमके आहेत कुणाकडे? हा प्रश्न अजून अनुत्तरीतच आहे.


पेच कुठून सुरू?

पुलंच्या पत्नी सुनीता पुरुषोत्तम देशपांडे यांच्या निधनानंतर निर्माण झालेला स्वामित्व हक्काचा पेच अद्याप सुटलेला नाही. 'आयुका'ने 'नमुने' या मालिकेवर दावा केला असला, तरी लोकमान्य सेवा संघाच्या म्हणण्यानुसार पुलंच्या साहित्याचे अधिकार त्यांच्याकडे आहेत. सदर प्रकरणाबाबतचा खटलाही न्यायालयात सुरु आहे. यात 'चांदी' आणि 'म्हैस' या दोन सिनेमांमध्ये वाद असून, 'लोकमान्य सेवा संघ' यात प्रतिवादी आहे. याखेरिज 'गोळाबेरीज' या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या वेळीही लोकमान्य सेवा संघाने प्रदर्शनावर आक्षेप घेतला होता.


मोबदलाही घेतला

'गोळाबेरीज' चित्रपटाचे निर्माते देवदत्त कापडिया यांनी त्यावेळी 'लोकमान्य सेवा संघा'ला ६ लाख रुपये दिल्याचं ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितलं. इतकंच नव्हे, तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'लोकमान्य सेवा संघा'ने 'म्हैस'च्या निर्मात्यांकडूनही १ लाख ७५ हजार रुपये घेतल्याचं समजत आहे. पण 'आयुका'ने पुलंच्या साहित्याचे स्वामित्व हक्क आपल्याकडे असल्याचा दावा केल्याने हा गुंता आणखी वाढला आहे.



पैशांची मागणी

‘गोळाबेरीज’चे निर्माते देवदत्त कापडीया यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 'लोकमान्य सेवा संघा'ला पैसे दिल्याचे मान्य केलं. ते म्हणाले की, पुलंसारख्या थोर व्यक्तिमत्वाच्या साहित्यावर सिनेमा बनवताना खूप अभिमान वाटला, पण जेव्हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी काॅपीराईट अंतर्गत पैशांची मागणी करण्यात आली, तेव्हा खूप दु:ख झालं. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी २ दिवस अगोदर हा प्रकार घडल्याने आमच्याकडे चाॅईस नव्हता. त्यामुळे पुलंच्या साहित्याच्या काॅपीराईटचा प्रश्न सुटण्याची गरज आहे. नाहीतर भविष्यात पुलंच्या साहित्यावर सिनेमे बनवण्याचं धाडस कुणीही करणार नाही.


'असे' मिळाले हक्क

'लोकमान्य सेवा संघा'चे सचिव मनोज निरगुडकर ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना म्हणाले की, पुलंचं 'लोकमान्य सेवा संघा'वर खूप प्रेम होतं. पुलंच्या इच्छेनुसार त्यांच्या पश्चात २३ डिसेंबर १९९९ रोजी ‘पु. ल. देशपांडे ट्रस्ट’चं लोकमान्य सेवा संघामध्ये विलीनीकरण करण्यात आलं आणि पुलंच्या साहित्याचे काही हक्क आमच्याकडे आले. त्याबाबतची कागदपत्रं आमच्याकडे आहेत. त्याच बळावर आम्ही 'गोळाबेरीज'चे निर्माते कापडिया आणि 'म्हैस'चे दिग्दर्शक शेखर नाईक यांच्याकडून स्वामित्व हक्कासंदर्भात पैसे घेतले.

या संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकण्याकरीता २ दिवसांपासून 'आयुका'चे निरंजन अभ्यंकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे पुलंच्या साहित्याच्या स्वामित्व हक्काबाबतची लढाई कधी संपणार आणि त्यांच्या साहित्यावर मुक्तपणे कलाकृती तयार करण्याचं स्वातंत्र्य लेखक-निर्माता-दिग्दर्शकांना कधी मिळणार? हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.



हेही वाचा-

Exclusive: पुलंच्या साहित्याचा परवानगीविना वापर; नमुने मालिकेवर 'आयुका'चा ५० लाखांचा दावा

सागर देशमुख साकारणार पुलं



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा