नव्या दोस्तीची नवी गोष्ट ‘दिल दोस्ती दोबारा’...

 Mumbai
नव्या दोस्तीची नवी गोष्ट ‘दिल दोस्ती दोबारा’...
नव्या दोस्तीची नवी गोष्ट ‘दिल दोस्ती दोबारा’...
See all
Mumbai  -  

मुंबई - ‘मस्ती नाय तर दोस्ती नाय’ हा अफलातून फंडा सांगत आपल्या मैत्रीने अवघ्या तरुणाईला वेड लावत सर्वांच्या मनात घर करणारी मालिका म्हणजे ‘दिल दोस्ती दुनियादारी’. या मालिकेचा पहिला सिझन संपल्यानंतर पुढचा सिझन कधी येणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती. त्यांची ही उत्सुकता आता संपणार आहे, कारण ही दोस्ती त्यांच्या भेटीला परत येतेय, पण एका नव्या नावासोबत आणि एका नव्या फ्रेश गोष्टीसह.

‘दिल दोस्ती दोबारा’ असं या नव्या सिझनचं नाव असून येत्या 18 फेब्रुवारीपासून रात्री 10.30 वा. झी मराठीवरुन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘दिल दोस्ती दोबारा’ मालिकेची नवी गोष्ट माजघरात नाही तर एका वेगळ्याच ठिकाणी रंगणार आहे हे ठिकाण आहे एक रेस्टॉंरंट म्हणजेच उपहारगृह. ‘खयाली पुलाव रेस्टॉरंट’ असं त्याचं नाव असून हे सहा जण तिथे एकत्र कसे येणार हे बघणं मजेशीर ठरेल. साहिल, गौरव, पप्या, मुक्ता, आनंदी आणि परी अशा या सहा व्यक्तिरेखा असणार आहेत. हे सहा जण मुंबईत एकमेकांना कसे भेटतात आणि ‘खयाली पुलाव रेस्टॉरंटचा’ प्रवास कसा सुरु होतो त्याची ही गोष्ट.

‘दिल दोस्ती दोबारा’ या नव्या सिझनची निर्मिती संतोष कणेकर यांची अथर्व थिएटर्स अॅंड आर्ट ही निर्मिती संस्था करणार आहे. तर, दिग्दर्शनाची धुरा अद्वैत दादरकर आणि स्वप्निल मुरकर सांभाळणार आहेत. कथा आणि संवाद सुदीप मोडक आणि अभिषेक खणकर यांचे असणार आहेत. समीर सप्तीसकरच्या संगीताने सजलेलं या नव्या मालिकेचं शीर्षकगीतही फ्रेश असणार आहे.

Loading Comments