Advertisement

मला टेलिव्हिजनचा विसर पडलेला नाही: सतीश राजवाडे

या शोमध्ये परीक्षकांच्या खुर्चीत बसून सतीश स्पर्धकांना प्रोत्साहीत करण्याचं काम करणार आहे. या निमित्ताने एक सर्कल पूर्ण करत सतीश पुन्हा घराघरांत पोहोचणार आहे. अमृता खानविलकर आणि विठ्ठल पाटील हे दोन परीक्षकही सतीशला साथ देणार आहेत.

मला टेलिव्हिजनचा विसर पडलेला नाही: सतीश राजवाडे
SHARES

बऱ्याच कलाकार-दिग्दर्शकांनी टेलिव्हिजनवर आपली कारकिर्द सुरू करून पुढे चित्रपटांच्या दिशेने वाटचाल केली आहे. दिग्दर्शनासोबतच अभिनयातही तरबेज असलेल्या दिग्दर्शक सतीश राजवाडेनेही छोट्या पडद्यावरून मोठ्या पडद्याकडे झेप घेत यशाला गवसणी घातली आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणाऱ्या ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ या नृत्यावर आधारित असलेल्या रिअॅलिटी शोद्वारे सतीश पुन्हा टेलिव्हिजनकडे वळला आहे.

या शोमध्ये परीक्षकांच्या खुर्चीत बसून सतीश स्पर्धकांना प्रोत्साहीत करण्याचं काम करणार आहे. या निमित्ताने एक सर्कल पूर्ण करत सतीश पुन्हा घराघरांत पोहोचणार आहे. अमृता खानविलकर आणि विठ्ठल पाटील हे दोन परीक्षकही सतीशला साथ देणार आहेत. अमेय वाघ या शोचं सूत्रसंचालन करणार आहे. ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’च्या निमित्ताने पुन्हा टेलिव्हिजनकडे वळण्याचा अनुभव सतीशने ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझीव्ह बातचीत करताना शेअर केला.


इथं काम करायला आवडतं

मी टेलिव्हिजनचा खूप मोठा फॅन आहे. मला इथं काम करायला खूप आवडतं. यापुढेही करत राहीन. मी टेलिव्हीजनमुळे मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचलो असल्याने कुठेही टेलिव्हीजनचा विसर पडलेला नाही. टेलिव्हीजनकडून चित्रपटांकडे आणि आता पुन्हा टेलिव्हीजनकडे आलो याला मी सर्कल पूर्ण झालं असं म्हणणार नाही, तर हे सर्कल पुढे असंच वाढत जाऊ दे असं म्हणेन.


केवळ परीक्षण करणार

मी इथं अभिनय करणार नाही. कारण हा शो मी केवळ जज करतो आहे. मला कितपत नाचता येतं याची चाचपणी नक्कीच करेन. माझा आवडता डान्स म्हणजे गणपती डान्स. बाथरुम सिंगर्स असतात, तसे गणपती डान्सर्स असतात. त्यापैकीच मी देखील एक आहे. मला कोणत्याही स्टेप्समध्ये बंदिस्त होऊन नाचता येत नाही.


अमिताभ-अनिलसारखा डान्सर

मला टायगर श्राॅफचा डान्स बघायला आवडतो. हृतिक रोशन, शाहिद कपूरला पाहायला मजा येते. हे जे सगळेच डान्सर्स आहेत ते अप्रतिम आहेत. त्यामुळे हे अभिनेते आवडतातच, पण माझ्या पद्धतीतील डान्सरबाबत सांगायचं तर अभिताभ बच्चन आणि अनिल कपूर. हे दोघेही डान्स करताना खूप एन्जॅाय करतात. गोविंदा फॅब्यॅुलस डान्सर आहे. डान्स खूप सोपा असल्याचं त्याच्या चेहऱ्यावर जे एक्स्प्रेशन असतं ना त्यात खूप गंमत आहे.


मी शिकवत नाही

या शोमध्ये आलेली मुलं खूप टॅलेंटेड आहेत. त्यामुळे मुलांना मी अजिबत काही शिकवत नाही, तर उलट मीच त्यांच्याकडून शिकतो आहे. मी त्यांचा ओव्हरआॅल परफॅार्मंस, एनर्जी, इम्पॅक्ट याकडे बारकाईने लक्ष ठेवतो आहे. अजूनपर्यंत तरी मला त्यांना काहीतरी वेगळं शिकवावं असं वाटलं नाही. ‘सुपर डान्सर महाराष्ट्र’ या शोमध्ये सहभागी होणारे सर्व स्पर्धक खरोखरच सुपर डान्सर आहेत.


परफेक्ट शॅाट

‘हा माझा परफेक्ट शॅाट आहे’, असं म्हणत मी मनापासून दाद देतो. कदाचित हा माझा तकिया कलाम होईल. जर मला एखाद्या परफॅार्मंसमध्ये काहीच कट करण्यासारख नाही असं वाटलं, तर तो माझ्यासाठी परफेक्ट शॅाट असेल. या शोमधील मुलं खूप तयारीची आहेत. ज्या पद्धतीने ती परफॅार्म करत आहेत, रिहर्सल्स करून मुलं येत आहेत, ते पाहून केवळ हाच प्लॅटफॅार्म नव्हे, तर आज अख्खं जग त्यांच्यासाठी ओपन झालं, असं मी म्हणेन.



हेही वाचा-

'नानांनी असं करायला नको होतं', स्पॅाटबॅाय रामदास बोर्डे

हिंदू-मुस्लीम ऐक्यावर भाष्य करणार ‘सुलतान शंभू सुभेदार’!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा