Advertisement

'नानांनी असं करायला नको होतं', स्पॅाटबॅाय रामदास बोर्डे

‘हॅार्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर नेमकं काय घडलं? त्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मी असलो तरी नाना आणि तनुश्री यांच्यात व्हॅनिटी व्हॅनमध्ये काय घडलं? ते आपल्याला ठाऊक नसल्याचं सांगत बोर्डे यांनी नानांनी तनुश्रीसोबत गैरवर्तन केल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे.

'नानांनी असं करायला नको होतं', स्पॅाटबॅाय रामदास बोर्डे
SHARES

अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्ताने केलेले आरोप खरे असून सेटवर घडलेल्या घटनेचा साक्षीदार असल्याचं सांगत ‘हॅार्न ओके प्लीज’ या चित्रपटासाठी स्पॅाटबॅाय म्हणून काम केलेल्या रामदास बोर्डे यांनी नानांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. 'नानांनी असं करायला नको होतं', असं म्हणत बोर्डे यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखती दरम्यान या प्रकरणावर प्रकाश टाकला आहे.


सेटवर नेमकं काय घडलं?

‘हॅार्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर नेमकं काय घडलं? त्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मी असलो तरी नाना आणि तनुश्री यांच्यात व्हॅनिटी व्हॅनमध्ये काय घडलं? ते आपल्याला ठाऊक नसल्याचं सांगत बोर्डे यांनी नानांनी तनुश्रीसोबत गैरवर्तन केल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. यासोबतच राखी सावंत खोटं बोलत असल्याचंही बोर्डे यांचं म्हणणं आहे. याची साक्ष देण्यासाठी कोर्टात येण्याची तयारीही बोर्डे यांनी दर्शवली आहे. गणेश आचार्य यांनी नानांची बाजू घेत तनुश्रीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचंही बोर्डे यांचं म्हणणं आहे.
बोर्डे यांचा दावा काय?

बोर्डे यांच्या म्हणण्यानुसार ‘हॅार्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर त्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास शुटिंग सुरू झालं. तनुश्रीचे एक-दोन सीन ओके झाले. त्यानंतर नाना व्हॅनिटीमध्ये गेले आणि त्यांनी आपल्या बाॅयकरवी तनुश्रीला व्हॅनिटीमध्ये येण्यासाठी निरोप पाठवला. त्यानुसार तनुश्री नानांच्या व्हॅनिटीमध्ये गेली. त्यानंतर आत काय झालं ते ठाऊक नाही, पण ती व्हॅनिटीतून तावातावानेच बाहेर पडली आणि थेट मास्टरजी म्हणजेच कोरिओग्राफर गणेश आचार्य यांना भेटली.


'आम्ही काही करू शकत नव्हतो'

मोठ्यामोठ्याने नानांबद्दल इंग्रजीमध्ये काहीतरी सांगत होती. त्यावर मास्टरजी आणि चित्रपटाचे निर्माते तिला गप्प बसण्यास सांगत होते, तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत होते, पण ती काही ऐकायला तयार नव्हती. आमच्या वर्करच्या दृष्टिकोनातून तरी मास्टरजी नानांचीच बाजू घेत होते. ती एकटी पडली होती, पण आम्हीही काही करू शकत नव्हतो.


'असं वागायला नको होतं'

नाना खूप मोठे कलाकार आहेत, त्यांच्या मुलीच्या वयाच्या तरुणीसोबत त्यांनी असं वागायला नको होतं, असं आम्हा वर्कर्सना वाटत होतं. माझ्या मते नानांनी १०१ टक्के तनुश्रीचा विनयभंग केला असेलच. इतकं होऊन नाना आपल्या सवयीप्रमाणेच वागत होते. सेटवर २००-३०० वर्कर्स असताना मी तनुश्रीसोबत गैरवर्तन कसं करेन? असं नाना म्हणतात, पण हे सर्व वर्कर्स सेटवर होते, व्हॅनिटीमध्ये नव्हते. व्हॅनिटीमध्ये केवळ नाना आणि तनुश्रीच होते. वर्कर्स आत नव्हते. ज्यावेळी गरमागरमी झाली त्यावेळेस वर्कर्सना काहीतरी गडबड झाल्याचं समजलं.


२ दिवस शुटिंग बंद

या प्रकारानंतर २ दिवस शुटिंग बंद होतं. आम्ही हजार-पाचशे रुपये कमावणारे लोकं आहोत. ती करोडो रुपये कमावणारी माणसं. आमच्यावर तेव्हा दबाव होता. म्हणून १० वर्षे गप्प बसलो, पण आता तनुश्रीने आवाज उठवल्यावर आपणही तिला साथ द्यायला हवी या विचाराने सेटवर घडलेला खरा प्रकार समोर आणण्यासाठी पुढाकार घेत असल्याचंही बोर्डे म्हणाले.


न्यायालयातही सांगेन

तनुश्रीचं नाव देखील तेव्हा जास्त कोणाला ठाऊक नव्हतं. ती नवीन होती. नानांनी तिच्यासोबत असं वागायला नको होतं. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार हे कलाकार नवीन कलाकारांना धीर देत असल्याचं आपल्या २० वर्षांच्या करियरमध्ये पाहिल्याचंही बोर्डे म्हणाले. तिसऱ्या दिवशी शूट सुरू झालं, तेव्हा नाना पुन्हा आपल्याच तोऱ्यात सेटवर आले. तनुश्री मात्र पुन्हा सेटवर आली नाही. जे घडलं ते मी कुठेही बोलायला तयार आहे. मी जे बोललो ते न्यायालयातही सांगण्याची तयारी बोर्डे यांनी दर्शवली आहे.


माफी मागावी

नाना कितीही मोठे अॅक्टर असले, तरी त्यांनी चूक मान्य करून माफी मागावी. या प्रकरणात नानांचीच चूक आहे. महाराष्ट्रातील लोकं त्यांचा आदर्श ठेवतात. त्यामुळे त्यांनी असं वागायला नको होतं. दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं हा नानांच्या वागण्यातील फरक आहे. नानांनी आपल्या जीवनातील सर्वात मोठी चूक केली आहे असं बोर्डे यांचं म्हणणं आहे.हेही वाचा-

नाना पाटेकर, गणेश आचार्यसह दिग्दर्शक, निर्मात्याविरोधात गुन्हा दाखल

तनुश्रीच्या तक्रारीची दखल, महिला आयोगानं नानाला बजावली नोटीससंबंधित विषय
Advertisement