Advertisement

प्रत्येक दिवाळीत 'ते' दिवस आठवतात - मोनालिसा बागल


प्रत्येक दिवाळीत 'ते' दिवस आठवतात - मोनालिसा बागल
SHARES

दिवाळी हा सगळ्यांचाच आवडीचा सण. खरेदी, फराळ या सगळ्याच गोष्टींची आवड प्रत्येकाला असते. खूप दिवस आधीपासूनच या सगळ्याची तयारी सुरु होते. पण हे झालं सामान्य लोकांचं. कलाकारांच्या आयुष्यात मात्र थोडं वेगळं असतं. सतत असणारं बिझी शूटिंग शेड्युल, दिवस-रात्र काम, पण या सगळ्यातूनही कलाकार घरच्यांसाठी कसा वेळ काढतात? दिवाळी कशी साजरी करतात? या गोष्टी 'मुंबई लाइव्ह'शी शेअर केल्या आहेत 'झाला बोभाटा' या सिनेमात दिसलेली आणि लवकरच 'ड्राय डे' या सिनेमात झळकणारी अभिनेत्री मोनालिसा बागल हिने!


दिवाळी म्हटलं की सर्वात आधी तुझ्या डोळ्यांसमोर काय येतं ?

दिवाळी जसा सगळ्यांचा आवडीचा सण आहे, तसाच माझा ही अतिशय आवडता सण आहे. दिवाळी म्हटलं कि माझ्या डोळ्यांसमोर खूप साऱ्या लाईटिंग्स, दिवे, रांगोळी, फटाके हे सगळं येतं.

  

दिवाळीसाठी काय तयारी करतेस आणि किती आधीपासून?

अगदी शेवटच्या वर्षापर्यंत माझी तयारी खूप वेगळी असायची. जवळजवळ १५/२० दिवस आधीपासूनच माझी दिवाळीची तयारी सुरु व्हायची. घरी मला हे करायचंय ते करायचंय अशी मोठी लिस्टच असायची. पण आता वेळ नाही मिळत हे सगळं करण्यासाठी. या वर्षी मी २-३ दिवस आधी घरी आले. त्यामुळे अगदी शॉपिंगपासून सगळच मला करायचंय. आईचा पूर्ण फराळही करून झालाय. त्यामुळे त्यातही मी हातभार लावू शकत नाही. पण हो, जेवढं होऊ शकेल, तेवढं मी नक्कीच करणार आहे.


  


फराळ आवडतो का? कोणता पदार्थ जास्त आवडतो?

हो फराळ आवडतोच. पण फराळातही मला चकली जास्त आवडते. आणि आई अनारसे खूप छान बनवते. त्यामुळे आईच्या हातचे अनारसे मला खूप आवडतात!


फराळ बनवता येतो का?

मला चिवडा, शंकरपाळी आणि करंजी बऱ्यापैकी जमते. हल्ली रेडिमेड पीठ सहज मिळतं. त्यामुळे त्याचे पदार्थ करण्याचा मी प्रयत्न केला होता. पण अर्थात आईच्या हातची चव मला अजून काही जमली नाही. आशा करते की लवकर मला आईसारखा फराळ करता येईल.



फटाके वाजवायला आवडतात का?

हो खूपच. पण हल्ली फटाक्यांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या फटाक्यांमुळे प्रदूषण होणार नाही असे फटाके मला नक्कीच वाजवायला आवडतील. आता जिथे मी सध्या राहतेय, त्या सोसायटीत प्रदूषणामुळे फटाके वाजण्यावरच बंदी घातली आहे. त्यामुळे मला सोसायटीत फटाके वाजवता येणार नाहीत. पण हो, बाहेर जाऊन मला फटाके वाजवायचे आहेत.


सेलेब्रिटी झाल्यानंतर आयुष्यात काय फरक पडला?

खूपच फरक पडलाय. अगदी कालचंच उदाहरण द्यायचं झालं, तर मी आणि माझी आई एका शॉपमध्ये गेलो होतो आणि तिथे एक लहान मुलगी होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि थोड्यावेळाने ती तिच्या आईला ही तीच ताई आहे जी 9x चॅनेल वर दिसते, असं म्हणाली. अशी बरीच उदाहरणं आहेत जिथे लोक तुम्हाला ओळखतात. त्यामुळे तुम्हाला हवं तिथे कधीही फिरता येत नाही. मला पाणीपुरी खूप आवडते. आधी वाटेल तेव्हा मी जाऊन सहज खाऊन येऊ शकत होते. पण आता तसं नाही करता येत. सेलेब्रिटी झाल्यापासून आयुष्यात नक्कीच खूप फरक पडलाय.



या वेळच्या दिवाळीचं काय प्लॅनिंग केलंस?

या वर्षी मला खूप कमी वेळ मिळाला दिवाळीची तयारी करायला. अगदी २ दिवस आधीच मी घरी आले. त्यामुळे सगळ्याच गोष्टी बाकी आहेत. सर्वात आधी मी शॉपिंगला जाणार आहे. कपडे घ्यायचे आहेत. त्याचबरोबर मला कॅण्डल्स आणि इलेक्ट्रॉनिक्सचे दिवे फार आवडतात. त्यामुळं ते ही खरेदी करायचे आहेत. आणि अर्थात माझ्या को अॅक्टर्स आणि मित्र मैत्रिणींसाठी चॉकलेट्स आणि मिठाई घ्यायची आहे.


अशी कोणती आठवण आहे जी प्रत्येक दिवाळीत तुला आठवते?

मी १०वीला असताना माझ्या बाबांचं निधन झालं. पण मला आजही त्या सर्व दिवाळी आठवतात, ज्या मी बाबा असताना साजऱ्या केल्या होत्या. पहाटे उठून उटणं लावून अंघोळ करायची. नवीन ड्रेस घालायचा. आणि फटाके उडवायला जायचं. त्यानंतर मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं. उरलेल्या सुट्टीत गावी जायचं. प्रत्येक वर्षी माझ्या दिवाळीची सुरुवात अशीच व्हायची. आणि ही आठवण सदैव माझ्या लक्षात राहते. आता सगळंच बदललं आहे. घरच्यांपासून लांब राहावं लागतं. शूटमुळे वेळ नाही मिळत. हे सगळं करायला आता आईला मदत करायलाही घरी थांबता येत नाही. आता खऱ्या अर्थी बालपण खूप मिस करते.



सेलेब्रिटी म्हटलं की डाएट आलंच. पण मग दिवाळीत ते कसं पाळणार?

हो. सेलेब्रिटी झाल्यापासून डाएट खूप महत्वाचं झालंय. आईने मला आवडतात म्हणून घरी खूप लाडू केले आहेत. पण घरी आल्यापासून मी एकही लाडू खाल्लेला नाही. फक्त चकली आणि चिवडा यावरच मी ताव मारतेय. आणि मिठाई पण शुगर फ्री असेल तरच ती मी खाते. आता अजून बरेच दिवस मला स्वतःवर संयम  ठेवायचा आहे. आणि मी तो ठेवण्याचा १००% प्रयत्न करीनच.


तुझ्या फॅन्सना 'मुंबई लाइव्ह'च्या माध्यमातून काय संदेश देशील?

मी माझ्या फॅन्सना हेच सांगू इच्छिते, की दिवाळी साजरी करा पण ज्या फटाक्यांनी प्रदूषण होईल, असे फटाके वाजवू नका. फटाक्यांशिवाय ही दिवाळी खूप चांगली साजरी करता येते. त्यामुळे तुम्ही ही तशी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करा. तसेच, सगळ्यांची ही दिवाळी सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावो आणि सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत. १७ नोव्हेंबरला माझा 'ड्राय डे' सिनेमा रिलीज होणार आहे. तो तुम्ही पहा आणि कसा वाटला हे मला नक्की कळवा. सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!



हेही वाचा

अक्षय कुमारच्या लाफ्टर शोमधून मल्लिका दुआसह तिन्ही जजेस आऊट!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा