Advertisement

लेखक लेक मृणालवर भारी!

खरं तर स्वदिग्दर्शनाखाली मुलाला लाँच करावं अशी मृणाल यांची इच्छा होती, पण विराजसही काही कमी नाही. आपण लिहिलेल्या सिनेमाची पहिली कथा आईनेच दिग्दर्शित करावी असं त्याला वाटत होतं. अखेर माय लेकरांच्या या प्रेमळ स्पर्धेत विराजसनेच बाजी मारत पहिल्यांदाच मराठी सिनेमाची पटकथा लिहिलीय. ‘ती अँड ती’ हा विराजसच्या लेखणीतून अवतरलेला पहिला मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

लेखक लेक मृणालवर भारी!
SHARES

आपले आवडते कलाकार सध्या काय करताहेत याचं जसं चाहत्यांना कुतूहल असतं, तसंच त्यांच्या मुलांबाबत जाणून घेण्याचीही चाहत्यांची इच्छा असते. त्यामुळे तुम्ही अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांचे चाहते असाल, तर ही बातमी वाचून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. त्याचं असं आहे की मृणाल यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘ती अँड ती’ या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सध्या वेगात सुरू आहे. यातील खास बात म्हणजे या सिनेमाची कथा लिहिलीय ती त्यांचा चिरंजीव विराजसने.


मृणाल यांच्यावर मात

खरं तर स्वदिग्दर्शनाखाली मुलाला लाँच करावं अशी मृणाल यांची इच्छा होती, पण विराजसही काही कमी नाही. आपण लिहिलेल्या सिनेमाची पहिली कथा आईनेच दिग्दर्शित करावी असं त्याला वाटत होतं. अखेर माय लेकरांच्या या प्रेमळ स्पर्धेत विराजसनेच बाजी मारत पहिल्यांदाच मराठी सिनेमाची पटकथा लिहिलीय. ‘ती अँड ती’ हा विराजसच्या लेखणीतून अवतरलेला पहिला मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


अभिनयात आधीच पदार्पण

खरं तर अभिनय करणं हे विराजससाठी नवीन नाही. या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या ‘हॅस्टेल डेज’ या सिनेमात त्याने अभिनय केला आहे. ‘ती अँड ती’च्या माध्यमातून प्रथमच त्याने सिनेमाचं लेखन केलं आहे. हा अनुभव विराजसने ‘मुंबई लाइव्ह’शी शेअर केला.


खरं तर ‘ती अँड ती’च्या निमित्ताने मी पहिल्यांदाच रोमँटिक-कॅमेडी हा प्रकार हाताळला आहे. आईनेही यापूर्वी कधीही अशा प्रकारच्या जाॅनरच्या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं नाही. त्यामुळे आम्हा दोघांसाठीही हा सिनेमा एक वेगळाच अनुभव देणारा ठरला आहे. या सिनेमाच्या लेखनासाठी ‘ती अँड ती’मध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या पुष्कर जोगसोबत राहिलो. त्याच्यासोबत राहून स्टोरी आणि त्याच्या कॅरेक्टरची बांधणी केली. त्यानंतर सिनेमाची पटकथा लिहिली. या कामी आईचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं. पुण्याहून मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर रोज रात्री घरी बसून आईसोबत कोणतातरी वर्ल्ड सिनेमा किंवा मालिका पाहतो. त्याचाही बराच फायदा झाला.
- विराजस, लेखक, ती अँड ती


घरातंच बाळकडू

मृणाल या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री असल्याने विराजसला बालपणापासून घरातच अभिनयाचं बाळकडू मिळालं. पुण्यात राहात असताना पहिलीपासूनच विराजसच्या आई-बाबांनी त्याला प्रोत्साहन दिलं. विविध स्पर्धा तसंच नाट्यस्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केलं. इथूनच विराजसच्या अंगी असलेले अभिनयाचे गुण खुलू लागले.

लेखनाच्या आवडीबाबत विराजस म्हणाला की, ''दर उन्हाळ्यात आई माझ्याकडून मराठी, हिंदी आणि इंग्राजीचं प्रत्येकी एक पान लिहून घ्यायची. इथंच खऱ्या अर्थाने माझ्यातील लेखकाला प्रोत्साहन मिळालं. त्यानंतर बारावीत असताना मित्रांच्या साथीने मी थिएट्रान एन्टरटेन्मेंट नावाची संस्था सुरू केली. त्यावेळी कुणाला तरी अभिनय, कुणाला तरी लेखन, तर कुणाला तरी दिग्दर्शन करावंच लागे. मी लेखनाची बाजू सांभाळली. त्यातून आत्मविश्वास दुणावत गेला. संहिता ही कोणत्याही कलाकृतीचा आत्मा असते हा विचार माझ्या मनावर अशा प्रकारे कोरला गेला की लेखनाचा आणखी अभ्यास करण्यासाठी सुभाष घईंच्या व्हिसलींग वुड्समध्ये २ वर्षे फिल्म रायटिंगचा कोर्स केला. यादरम्यान आई दिग्दर्शनाकडे वळल्याने तिलाही असिस्ट करण्याची संधी मिळाली. आपण ज्याप्रमाणे पहिला पगार आई-बाबांच्या चरणी अर्पण करतो त्याप्रमाणे माझ्या पहिल्या पटकथेचं दिग्दर्शन आईने करावं ही इच्छा होती. ती ‘ती अँड ती’ या सिनेमाच्या निमित्ताने पूर्ण झाली.''


भंवर’ नाटकाचं कौतुक

या सिनेमापूर्वी विराजसने लिहिलेल्या ‘भंवर’ या नाटकाचं देश-विदेशात कौतुक झालं आहे. पृथ्वी थिएटरच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या थास्पो स्पर्धेमधील १०२ नाटकांपैकी पहिल्या पाच नाटकांमध्ये ‘भंवर’ची निवड झाली. इतकंच नव्हे तर या नाटकाने थास्पोमध्ये पाच पुरस्कारांवरही नाव कोरलं. याखेरीज ग्रँड सोलो थिएटर फेस्टिव्हलमध्ये ‘भंवर’ने प्रथम क्रमांक पटकावला. बल्गेरियातील इंटरनॅशनल थिएटर स्पर्धेसाठी आशियातून ‘भंवर’ या एकमेव नाटकाची निवड झाली होती.

विराजसने लिहिलेल्या ‘अनाथिया’ या हारर-कामेडी नाटकाने राजा परांजपे करंडकमध्येही बाजी मारली. ‘ती अँड ती’च्या निमित्ताने विराजस प्रथमच लेखक म्हणून समोर येणार आहेच, त्यासोबतच प्रथमच त्याने फुल फ्लेज असिस्टंट म्हणून काम केलं आहे. हा अनुभव लेखक-अभिनेता-दिग्दर्शक अशा विविध रूपात विराजसला नक्कीच समृद्ध् करणारा ठरेल.

‘ती अँड ती’ या सिनेमात सोनाली कुलकर्णी, पुष्कर जोग आणि प्रार्थना बेहरे यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाचं संपूर्ण चित्रीकरण लंडनमध्ये करण्यात आलं आहे. सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं असलं तरी पुष्कर सध्या बिग बासमध्ये असल्याने तो बाहेर आल्यावर पुढील कामाला सुरुवात होणार आहे.



हेही वाचा-

'तृषार्त' ८ जूनला चित्रपटगृहात

प्रेक्षकांची 'विश' पूर्ण करणारी 'बकेट लिस्ट'!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा