Advertisement

छोट्या पडद्यावरील ‘कमांडर’ हरपला, अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन

रमेश भाटकर हे दिवंगत गायक-संगीतकार स्नेहल भाटकर यांचे चिरंजीव. ३ आॅगस्ट १९४९ रोजी जन्मलेल्या रमेश यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत संगीतक्षे त्राकडे वळण्याऐवजी अभिनयात करियर करण्याला प्राधान्य दिलं. १९७७ मध्ये ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या सिनेमाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

छोट्या पडद्यावरील ‘कमांडर’ हरपला, अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन
SHARES

अनोख्या शैलीतील अभिनयाने छोट्या पडद्यावर हेरगिरी करत रसिकांच्या मनात उत्कंठा वाढविणारी भूमिका साकारणारे अभिनेते रमेश भाटकर (७०) यांचं मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं. मागील बऱ्याच दिवसांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते. मुंबईतील नेपेन्सी रोडवरील एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी मृदूला भाटकर, मुलगा हर्षवर्धन आणि सून असा परिवार आहे. भाटकरांच्या जाण्याने रंगभूमी, चित्रपट आणि मालिका या तिन्ही माध्यमांमध्ये यशस्वी कारकिर्द घडवणारा एक हरहुन्नरी नट गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार अाहेत. 


हिंदी सिनेमांमध्येही काम

रमेश भाटकर हे दिवंगत गायक-संगीतकार स्नेहल भाटकर यांचे चिरंजीव. ३ आॅगस्ट १९४९ रोजी जन्मलेल्या रमेश यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत संगीतक्षे त्राकडे वळण्याऐवजी अभिनयात करियर करण्याला प्राधान्य दिलं. १९७७ मध्ये ‘चांदोबा चांदोबा भागलास का’ या सिनेमाद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. तद्नंतर ‘अष्टविनायक’, ‘दुनिया करी सलाम’, ‘आपली माणसं’ यांसारख्या ९० हून अधिक चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना त्यांची वेगवेगळी रूपं पाहायला मिळाली. भाटकर यांची भूमिका असलेल्या ‘माहेरची साडी’ या सिनेमाने मराठी बाॅक्स आफिसवरील सर्व विक्रम मोडीत काढत लक्षवेधी व्यवसाय केला होता. मराठीसोबतच त्यांनी हिंदी सिनेमांमध्येही नशीब आजमावलं होतं.


हेरगिरीवरच्या मालिका

रमेश यांच्या अभिनयाने सजलेली दूरदर्शन वाहिनीवरील ‘हॅलो इन्स्पेक्टर’ ही मालिका खूप गाजली होती. ‘दामिनी’ या मालिकेनं त्यांना एक वेगळी ओळख देण्याचं काम केलं होतं. ‘हॅलो इन्स्पेक्टर’प्रमाणेच झी टीव्हीवरील ‘कमांडर’ आणि डीडी २ वरील ‘तिसरा डोळा’ या त्यांच्या हेरगिरीवरच्या मालिकाही खूप गाजल्या. अलीकडच्या काळात त्यांनी अभिनय केलेली ‘माझे पती सौभाग्यवती’ आणि ‘तू तिथे मी’ या मालिकाही प्रेक्षकांना आवडल्या होत्या.


जीवनगौरव पुरस्कार

रंगभूमीवरून आपली अभिनय कारकिर्द सुरू करणाऱ्या भाटकरांचं नाटकांवर विशेष प्रेम होतं. ‘अश्रूंची झाली फुले’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘अखेर तू येशीलच’, ‘राहू केतू’, ‘मुक्ता’ आदी रमेश यांच्या अभिनयाने सजलेली नाटकं रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणारी ठरली. गत वर्षी पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनामध्ये त्यांचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा