Advertisement

दिग्दर्शनातील नवखेपणानं इरादा फसला


दिग्दर्शनातील नवखेपणानं इरादा फसला
SHARES

‘द गाझी अटॅक’ आणि इरादा या एकाच दिवशी प्रदर्शित झालेल्या दोन चित्रपटांमध्ये बरेच साम्य आहे. द गाझी अटॅकप्रमाणेच इरादा हा चित्रपटदेखील एका नवोदित दिग्दर्शकानं लिहिला आहे. गाझी अटॅकमध्ये पाण्याखालची लढाई दाखवली आहे. इरादामध्येही जमिनीखाली झालेल्या ऱ्हासाचीच लढाई आहे. मात्र पहिला चित्रपट लेखन-दिग्दर्शनातील बारकाव्यांमुळे अगदी छान जमून आलाय. इरादाबाबत तसा सुखद धक्का आपणास बसत नाही. नसिरुद्दीन शाह, अर्शद वारसी ही चांगली जोडी सोबत असूनही नवोदित दिग्दर्शिका अपर्णा सिंग यांना हा चित्रपट खुलवता आलेला नाही. पर्यावरण थ्रीलर हा या चित्रपटाचा मुख्य कथाभाग असला तरी मूळ समस्या संपूर्ण चित्रपटभर आपणास भिडत नाही आणि एक चांगला विषय वाया गेल्याची टोचणी मात्र सतत मनात राहते.
परबजीत वालिया (नसिरुद्दीन शाह) हा लष्करातील अधिकारी. आपली तरुण मुलगी रीयाच्या (रुमाना मोल्ला) अचानक कळलेल्या आजारामुळे तो खचतो. रीयाला कर्करोगानं ग्रासलेलं असतं. या आजाराच्या मुळाचं शोध घेतला असता वालियांच्या हाती धक्कादायक माहिती लागते. रीयाप्रमाणेच पंजाबमधील एका प्रांतातील हजारो लोक या आजाराचे शिकार झाले असतात. त्यामागचं कारण म्हणजे औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि प्रशासनातील भ्रष्टाचाराची कडी. औषधांच्या निर्मितीवेळी घातक रसायने जमिनीत सोडली जातात. हीच रसायने जमिनीखालच्या पाण्यात मिसळतात नि हेच पाणी सर्वसामान्यांच्या घरी पिण्यासाठी येते. त्याचमुळे अनेक जण या रोगास बळी पडलेले असतात. पॅडी शर्मा (शरद केळकर) याची स्वतःची औषध निर्मिती कंपनी असते. राज्याच्या महिला मुख्यमंत्री रमणदीप (दिव्या दत्ता) यांच्या मदतीच्या जोरावर पॅडीनं पंजाबच्या मोठ्या प्रांतात कहर माजवलेला असतो. त्याविरुद्ध परबजीत आपली लढाई सुरू करतो. त्याला साथ मिळते ती प्रशासनामधील अर्जुन मिश्रा (अर्शद वारसी) या अधिकाऱ्याची.
जमिनीखालच्या प्रदूषणाचा विषय नक्कीच महत्त्वाचा आहे. परंतु, तो मांडण्याची दिग्दर्शिकेची शैली अगदीच बाळबोध आणि नीरस आहे. त्यामुळेच एक मोठा प्रश्न पडद्यावर मांडताना वाया गेला आहे. मुळात जमिनीखालचं प्रदूषण, त्यामागं असणाऱ्या औषधनिर्मिती कंपन्या, त्यांना असलेली राजकीय साथ हे पडद्यावर ठळकपणे आलेलं नाही. जे काही पाहायला मिळतं ते अगदी वरवरचं वाटतं. परबजीत वालिया आणि अर्जुन मिश्रा या व्यक्तिरेखा चांगल्या उभारल्या गेल्या आहेत. परंतु, त्याच्याविरुद्ध ज्या खल व्यक्तिरेखा आहेत, त्या अगदीच पोकळ आहेत. किंबहुना पॅडी आणि रमणदीप या दोन व्यक्तिरेखा हास्यास्पद झाल्यात. त्यामुळे परबजीत आणि अर्जुन या व्यक्तिरेखाही कालांतरानं थिट्या पडतात. चित्रपटाची मांडणी बाळबोध असल्यामुळे पुढे काय घडणार याचा आधीच प्रेक्षकाला अंदाज येतो आणि अपेक्षित असलेल्या सर्व वळणांनी वाटचाल करीत हा चित्रपट संपतो.
नसिरुद्दीन शाह आणि अर्शद वारसी यांनी आपापल्या व्यक्तिरेखा चांगल्या साकारल्या आहेत. शरद केळकर, दिव्या दत्ता यांच्या भूमिका लेखनातच फसल्या असल्यामुळे या दोघा कलावंतांच्या अभिनयाला मर्यादा येतात. सागरीका घाटगेनं साकारलेली भूमिका चित्रपटाचा एक महत्त्वाचा पदर असली तरी ती प्रत्यक्ष त्या पद्धतीनं प्रभावी ठरलेली नाही. चित्रपटात एक-दोन गाणी आहेत. ती जराही कथानकाशी सुसंगत नाहीत. थोडक्यात एक चांगला विषय लेखन-दिग्दर्शनातील नवखेपणामुळे वाया गेला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा