Advertisement

हृतिक रोशनचा प्रभावी 'आखरी रास्ता'…


हृतिक रोशनचा प्रभावी 'आखरी रास्ता'…
SHARES

संजय गुप्ता हा दिग्दर्शक आपल्या पाश्चिमात्य हाताळणीसाठी प्रसिद्ध आहे. प्रामुख्याने रहस्य आणि थरार हे त्याच्या चित्रपटांचं प्रमुख वैशिष्ट्य असलं तरी आजवर लक्षात राहणारा चित्रपट देण्यात तो अपयशी ठरला होता. मात्र ही उणीव काबीलच्या रूपानं त्यानं भरून काढलीय. पूर्वीच्या काही चित्रपटांमध्ये लेखनाच्या पातळीवर जी गफलत झाली होती, ती या वेळी त्यानं दूर केलीय. आजवर अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला नायकाकडून वापरलं गेलेलं रीव्हेंज ड्रामाचं अस्त्र या चित्रपटातही पाहायला मिळतं. या चित्रपटाचे निर्माते राकेश रोशन यांनी आपल्या यापूर्वीच्या काही चित्रपटांमध्ये हाच फॉर्म्युला वापरला होता. मात्र हे अस्त्र लेखक-दिग्दर्शक-तंत्रज्ञ आणि कलावंतांनी अगदी खुबीनं वापरलंय. म्हणूनच ते परिणामकारक झालं आहे. 1986 मध्ये प्रदर्शित झालेला आखरी रास्ता तसेच खून भरी माँग या दोन चित्रपटांचा काबीलवर मोठा प्रभाव जाणवतो. परंतु, सरतेशेवटी चित्रपटामधील घटनाक्रम पाहणाऱ्याला अडीच तास गुंतवून ठेवतो, हेच त्याचं मोठं यश आहे. चित्रपटाचं कथानक अतिशय साधे आणि सोपे आहे.

रोहन (हृतिक रोशन) आणि सुप्रिया (यामी गौतम) या दोन अंध व्यक्तींची एकमेकांशी ओळख होते, काही दिवसांत प्रेम जमतं नि ही प्रेमकहाणी विवाहात परावर्तित होते. रोहन एका कार्टुन मालिकेतील पात्रांसाठी वेगवेगळे आवाज काढण्याचं काम करीत असतो. रोहन ज्या ठिकाणी राहत असतो, तिथं राज्य असतं ते अमितचं (रोहित रॉय). त्याचा मोठा भाऊ माधव (रोनित रॉय) हा राजकारणातील एक मोठं नाव असतं. त्याबळावरच अमितची गुंडगिरी चालू असते. रोहन आणि सुप्रिया आपल्या विवाहानंतर काहीच दिवसांमध्ये या गुंडगिरीला बळी पडतात. रोहन आणि सुप्रियाच्या अंधत्वाचा गैरफायदा घेऊन अमित आपल्या एका साथीदारासह तिच्यावर बलात्कार करतो. या घटनेनं रोहन आणि सुप्रियाचं आयुष्य उद्धवस्त होते. हे दोघंही पोलीस यंत्रणेकडे न्याय मागण्याचा प्रयत्न करतात. परंतु, तिथं त्यांच्या पदरी निराशाच पडते. आणखी काही दिवसांनी अमितकडून अत्याचाराचा तसाच प्रकार पुन्हा घडल्यामुळे सुप्रियाला आत्महत्या करण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही. इथून मग सुरू होतो रोहनचा सूडाचा प्रवास.

आखरी रास्ता आणि काबीलमधील मोठं साम्य म्हणजे पोलीस यंत्रणेला उघड आव्हान देऊन नायकानं खलनायकांचा बदला घेणं. त्यामुळे नावीन्याच्या दृष्टीनं या चित्रपटाच्या कथानकात काहीच वेगळं पाहायला मिळत नाही. विजयकुमार मिश्रा आणि संजय गुप्ता यांनी साधारण कथेची उणीव भरून काढलीय ती बांधीव पटकथेमध्ये. त्याला उत्तम साथ दिलीय ती संवाद लेखक संजय मासूम यांनी. चित्रपटाच्या पहिल्या अर्ध्या तासात रोहन आणि सुप्रिया यांची प्रेमकहाणी अत्यंत हळूवारपणे दाखवलीय. सुप्रियाच्या आत्महत्येनंतर सुडानं पेटलेल्या रोहननं आपल्या अंधत्वावर मात करीत प्रतिस्पर्ध्यांना लोळवण्यासाठी आखलेले डावपेच थरारक आहेत. चित्रपटाचा शेवटदेखील अत्यंत वेगवान आणि रोमहर्षक झालाय. अर्थात त्याचं क्रेडिट स्टंट दिग्दर्शक श्याम कौशल यांचं आहे. काबीला परिणामकारक बनविण्यात चित्रपटाची तांत्रिक टीम कारणीभूत आहे. सुदीप चटर्जी आणि अयांका बोस यांचं छायाचित्रण अव्वल दर्जाचं आहे. सलिम-सुलेमान यांचं पार्श्वसंगीत मध्यंतरानंतर आपली छाप उमटवतं. नव्या संगीताच्या लाटेमुळे थोड्याशा बाजूला पडलेल्या राजेश रोशन यांनी चित्रपटाच्या मूडनुसार संगीत दिलं आहे. चित्रपटातील प्रेमाची हळुवार गाणी छान जमली आहेत. रोशन यांनीच याराना चित्रपटातील सारा जमाना… गाण्याचं या चित्रपटात रीमेक केलं आहे. हृतिक रोशनने अत्यंत सहजतेने रोहनची भूमीका साकारली आहे. अंध व्यक्तीचे हावभाव नेमके हेरत त्यानं ही व्यक्तिरेखा कमालीच्या उंचीवर नेऊन ठेवली आहे. रोमँटिक दृश्यांबरोबरच स्टंट दृश्यांवरही त्यानं आपला प्रभाव उमटवला आहे. हृतिकला कमालीची साथ दिलीय ती रोहित रॉय आणि रोनित रॉय यांनी. या दोघांनी साकारलेल्या खल व्यक्तिरेखा परिणामकारक झाल्यात. यामी गौतमही छोट्याशा व्यक्तिरेखेत लक्षात राहते. दंगलनंतर गिरीश कुलकर्णींनी पुन्हा एकदा आणखी एका हिंदी चित्रपटावर आपली छाप उमटवली आहे. थोडक्यात थरार प्रिय असणाऱ्या चित्रपट रसिकांसाठी हा चित्रपट चांगलाच अनुभव आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा