Advertisement

क्रेझी फॉर किशोर!


क्रेझी फॉर किशोर!
SHARES

काही वर्षांपूर्वी किशोर कुमारच्या पुण्यतिथीला (हा शब्द लिहिताना प्रचंड त्रास होतो) त्याचे सुपुत्र आणि पार्श्वगायक अमित कुमारची मुलाखत घेण्याचा योग आला होता. गप्पांच्या ओघात ‘गाना न आया, बजाना न आया दिलबर को अपना बनाना न आया’ या किशोरने गायलेल्या ओळींचा संदर्भ देत ‘मिश्किल’ किशोरने ही त्याच्या चाहत्यांची उडवलेली टर वाटते, असं म्हणून गेलो. अगदी मनापासून. ज्याच्या गात्या गळ्याने, धसमुसळ्या स्टेज परफॉर्मन्सेसने, धम्माल अंगविक्षेपांनी चाहत्यांचं भावविश्व बहरुन टाकलं, तोच किशोर गाण्यात तरी स्वतःबद्दल असं कसं म्हणू शकतो?


...यूं ही नहीं दिल लुभाता कोई
किशोर कुमारच्या नावापुढे पार्श्वगायक, संगीत दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, परफॉर्मर, अवलिया... हे सर्व लिहावं लागणं हा त्याच्यातल्या अभिजाततेचा आणि त्याचा नामोल्लेख आदरार्थी करणं म्हणजे त्याच्याबद्दल माझ्यासारख्या त्याच्या असंख्य चाहत्यांना वाटणाऱ्या पराकोटीच्या आत्मीयतेचा अपमान आहे. मला अजूनही आठवते ती सकाळ. 14 ऑक्टोबर, 1987. मी पाचव्या इयत्तेत होतो. आदल्या संध्याकाळी, म्हणजे 13 ऑक्टोबरला दूरदर्शनवर किशोरच्या गाण्यांचा विशेष कार्यक्रम सादर झाला होता. गृहपाठाशी झटापटी करत संपूर्ण कार्यक्रम अधाशासारखा पाहिला होता. शाळेत जाताना रस्त्यात वर्गमित्र, समीर सावंत दिसला. काल किशोरचा प्रोग्राम मस्त होता, नं? त्याने कार्यक्रम पाहिलाच असेल, हे गृहित धरून मी विचारलं. ''हो. गेला किशोर.'' उत्तरादाखल त्याच्या आवाजात खिन्नता. गेला म्हणजे नेमकं काय झालं, हे लक्षात यायला वेळ लागला आणि नंतर दिवसभर शाळेत, अभ्यासात, खेळात, टीव्हीत मन रमलं नाही.


का घडावं असं? किशोर हा वयाच्या बाबतीत माझ्या दोन पिढ्या आधीचा. त्यानं पृथ्वीवरची ‘मुसाफिरी’ संपवली, तेव्हा मृत्यू म्हणजे काय? हे नीटसं कळतही नव्हतं. किशोर गेला, म्हणजे काहीतरी भयंकर झालं, याची टोचणी लावणारी जाणीव मात्र होती. त्याची गाणी ऐकून कान तयार झाला होता. ऑडिओ कॅसेटचा जमाना तो. किशोर कुमार सोलो, हरफनमौला किशोर, किशोर के दर्दभरे गीत, लता-किशोर, किशोर-आशा, यॉडलिंग हिटस् अशा वैविध्यपूर्ण गाण्यांचा नजराणा कॅसेटरुपात माझ्याकडे होता किंबहुना आजही आहे. मला हवी ती गाणी दादरच्या बापट म्युझिक स्टोअरमधून (आजही बापटांचं दुकान तिथेच आहे. दादर पश्चिमेच्या ‘नक्षत्र’ मॉलच्या आत) भरून घेत असे. ही ड्युटी मी वडिलांना नेमून दिली होती. एकुलता एक असण्याचा मी त्या वयात उचललेला हा सर्वात मोठा गैरफायदा! किशोर गेल्यानंतर त्याच्या गाण्यांची श्रवणभक्ति नव्याने सुरु झाली. किशोर थोडा थोडा उलगडतोय, असं उगीच वाटत होतं.

अब चाहे माँ रुठे या बाबा
पुढेही हा क्रम सुरुच राहिला. माझा एक वर्गमित्र सुरेश शेलार तेव्हा शाळेला बुट्टी मारून नव्या चित्रपटांचे प्रिमियर शो पाहण्यासाठी प्रसिद्ध (बदनाम नाही, प्रसिद्धच) होता. याच सुरेशने आज बेस्टमध्ये   नोकरी करता करता एका लघुपटाचं दिग्दर्शन केलं. या लघुपटाला दक्षिण अफ्रिकेतला एक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला. असो, विषयांतर झालं. शाळेला बुट्टी मारण्याची माझी हिंमत कधीच झाली नाही. पण ती कसर कॉलेजमध्ये भरुन काढली. किशोरच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्याच्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम विलेपार्लेतल्या दीनानाथ नाट्यगृहात सादर व्हायचा होता. भरीस भर म्हणून त्याच दिवशी प्रभादेवीतल्या रवींद्र नाट्यमंदिरात ‘अनसुलझा किशोर’ भेटणार होता. दोन्ही कार्यक्रमांची वेळ वेगवेगळी. पार्ल्यातला कार्यक्रम सकाळी आणि प्रभादेवीतला संध्याकाळी. काय करणार? एक कार्यक्रम अटेंड करुन दुसऱ्याला नाही गेलो, तर आयोजकांना किती वाईट वाटेल, असा विचार (इथे स्माइली आहे, असं गृहित धरा) करुन मी दोन्ही कार्यक्रम अटेंड केले. त्यादिवशी पहिल्यांदाच कॉलेजला आणि त्यानंतर अकाउंटसच्या क्लासला दांडी मारली. मी माझ्या किशोरप्रेमाचं अकाउंट टॅली करत होतो. माझ्या पहिल्या दांडीचा कारक किशोरच. हे घरीसुद्धा सांगितलं. तडी पडली. पण चलता है, किशोरसाठी... इतना तो चलता है...


पंथी हूं मैं इस पथ का...
माध्यमक्षेत्रात आलो आणि खऱ्या अर्थाने किशोरचे निरनिराळे पदर उलगडत गेले. पूर्ण किशोर अजूनही कळलेला नाही. भिनलेला नक्की आहे. त्याच्या तऱ्हेवाईकपणाचे असंख्य किस्से आपण ऐकले, वाचले आहेत. ते मी नव्याने सांगणं म्हणजे किशोरवेडाच्या बाबतीत सचिन तेंडुलकर असणाऱ्या तुम्हा सर्वांना स्ट्रेट ड्राइव्हमधली तांत्रिकता समजावून सांगण्यासारखं आहे. त्यामुळे त्याच्या गाण्यातली, सादरीकरणातली, अदाकारीतली, हळवेपणातली, एकाच वेळी चिकट आणि दानशूर वृत्तीतलीही मेख सांगत राहिलो तर विस्तारभयाचा धोका आहे.


साधारण सन 2000 चा सुमार. एका वृत्तवाहिनीत काम करत असताना तिथल्या रसिक आणि विशेष म्हणजे जाणकार कॅमेरामन आशिष मांजरेकरसोबत गिरगावातल्या त्याच्या घराजवळ चर्चा करत होतो. किशोर मोठा की रफी? मुळात हा प्रश्न मनात आणण्याचीही आमची पात्रता नाही. हे मी जाणून आहे. कुठे ते प्रतिभेचे उत्तुंग पर्वत आणि कुठे आम्ही चर्चा करणारी ढेकळं. आशिषने त्याच्या बाबांचं एक निरीक्षण सांगितलं. चित्रपट ‘अभिमान’. चित्रपटात पार्श्वगायक असलेल्या अमिताभ बच्चनच्या व्यक्तिरेखेला प्रसिद्धीच्या शिखरावर असताना किशोरचा प्लेबॅक आहे. 

प्रतिभेने त्याच्यापेक्षा सरस असलेल्या जया बच्चनसोबत पार्टीत गाणं गातानाचं युगलगीत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात रेकॉर्ड झालं. अमिताभच्या म्हणजे चित्रपटातल्या सुबीर कुमारच्या कारकिर्दीची उतरंड सुरू होता होता अमिताभला रफी आणि किशोरचा सर्वच बाबतीत ज्युनियर मनहर उधासचा आवाज. काकांच्या म्हणजे आशिषच्या बाबांच्या मते संगीत दिग्दर्शक एस डी बर्मन यांनी चित्रपटाच्या कथानकाची जातकुळी ओळखत अमिताभच्या व्यक्तिरेखेचा आलेख पार्श्वगायकातल्या बदलाच्या अंगाने रेखाटला. अर्थात ग्रेट ठरवण्यातला हा निकष काही जणांनी नाकारलाही. पण हे घडतंच. ज्याप्रमाणे राज कपूर सरस की दिलीप कुमार हे ठरवताना ‘अंदाज’ चित्रपटातल्या एकेका सीनची उजळणी राज आणि दिलीपप्रेमी करतात, त्यातलातच हा प्रकार. विशेष म्हणजे एकमेकांचं श्रेष्ठत्व बुलंद कुवतीचे हे दोन्ही कलावंत एकमेकांसमोर आणि परोक्षही खुल्या मनाने मानत राहिले.


किशोर कुमारविषयीच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणं, हे आपलं आद्य कर्तव्य आहे, हे मी तेव्हा मानत आलो, आजही मानतो. एरवी, कुठल्याही कार्यक्रमाचं वार्तांकन झाल्यानंतर तिथून सटकणारा मी किशोरचं व्यक्तिचित्रण करणाऱ्या पुस्तकाची विक्री कार्यक्रमस्थळी होणार आणि पुस्तकाच्या कमी प्रती शिल्लक राहिल्या आहेत, हे लक्षात आल्यानंतर रांगेत उभा राहून पुस्तक विकत घेतलं. तेव्हा सेल्फीचा ट्रेंड नव्हता. असता तर मौलिक ऐवज हातात आल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरचे आनंदापलीकडचे भाव टिपणारा सेल्फी नक्कीच काढला असता.

कालातीत किशोर...
आजच्या काळाशी किशोर किती सुसंगत आहे, हे मी कसं सांगणार? पण सेल्फीचा उल्लेख केलाच आहे, तर इतकं नक्की म्हणू शकतो की वेगवेगळ्या वयात किशोरगीतं अंतरंगाची सेल्फी ठरत आली आहेत. यात अजिबात अतिशयोक्ती नाही.


सुरुवातीच्या काळात किशोरने सैगलच्या शैलीत गाणी गायली. किशोरची नक्कल कुमार सानूने केली. कुमार सानूची नक्कल आज केंद्रात मंत्री असलेल्या पार्श्वगायक बाबुल सुप्रियोने केली. म्हणजेच सैगलची नक्कल बाबुल सुप्रियो करतो. जेव्हा पहिला कोन, दुसऱ्याशी आणि दुसरा तिसऱ्याशी एकरुप असतो, तेव्हा पहिला कोन हा तिसऱ्याशी एकरुप असतो. कोनाच्या एकरुपतेचं हे प्रमेय पाठ करण्यासाठीही मला किशोरचीच मदत घ्यावी लागली.


किशोरप्रेम म्हणजे काय? हे अजूनही लक्षात आलेलं नाही. मजकूराच्या सुरुवातीला अमित कुमारच्या मी घेतलेल्या मुलाखतीचा उल्लेख आहे. त्याच मुलाखतीत अमित कुमारकडून किशोरनं गायलेलं एक अप्रकाशित गीत कळलं. वयाची बंधनं झुगारुन किशोर नावाच्या अजनबी प्रेमाची लागण कशी होते? या प्रश्नाचं उत्तर मात्र की काय होतं याचं प्रत्ययकारी वर्णन या गाण्यांच्या ओळीत आहे.

प्यार अजनबी है, जाने कहा से आए
कब जीवन में फूल खिलाए, कब आंसू दे जाए...

आज किशोरने वयाची 88 वर्ष पूर्ण केली असती, असं म्हणून अज्ञाताच्या प्रवासाला गेलेल्या किशोरची स्मृती बळजबरीने जागवायला नकोच. कारण तो जिवंतच आहे. 4 ऑगस्ट ही त्याची जयंती नव्हे, त्याचा वाढदिवस आहे. किशोरच्याच भाषेत... क्या समझे बांगडू...



हेही वाचा

शाहरुख, अनुष्का उडाले 'फुर्रss'!

उफ्फ ! ये अदा...


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा