Advertisement

‘एक सांगायचंय...’ चित्रपटात दिग्गजांची मांदियाळी


‘एक सांगायचंय...’ चित्रपटात दिग्गजांची मांदियाळी
SHARES

एखाद्या नवोदित दिग्दर्शकाच्या पहिल्याच चित्रपटात दिग्गज कलाकार आणि तंत्रज्ञांचं एकत्र येणं हे केवळ त्या दिग्दर्शकासाठीच नव्हे तर प्रेक्षकांसाठीही जणू सुवर्ण कांचन योगच ठरतो. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या लोकेश गुप्तेच्या ‘एक सांगायचंय.... Unsaid Harmony’ या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटासाठी मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील बरेच दिग्गज एकत्र आले आहेत.


मेनन यांचं मराठीत पदार्पण

लोकेशच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाद्वारे हिंदीतील दिग्गज अभिनेता केके मेनन यांनी मराठीत पदार्पण केलं आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने राजेश्वरी सचदेवने पाच वर्षांनी मराठीत पुनरागमन केलं आहे. जवळजवळ १८ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे.


संगीत, ट्रेलर लाँच

आॅस्कर पुरस्कार विजेते साऊंड रेकॅार्डीस्ट रेसूल पुकुट्टी यांनी या चित्रपटाचं ध्वनी आरेखन केलं आहे. अभिनेता जिंतेंद्र जोशीने या चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत. राष्ट्रीय पारितोषिक विजेते संगीतकार शैलेंद्र बर्वे यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. त्यामुळे ‘एक सांगायचंय... Unsaid Harmony’ हा चित्रपट म्हणजे वैशिष्ट्यांचा खजिना आहे. या चित्रपटाचं संगीत आणि ट्रेलर लाँच सोहळा मुंबईतील आॅर्किड हॅाटेलमध्ये पार पडला. या प्रसंगी केके-राजेश्वरी-रेसूल यांच्यासह इतर कलाकार-तंत्रज्ञ उपस्थित होते.


सिनेमाची कथा आवडली

मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याबाबत केके म्हणाले, सिनेमाची कथा मला जेव्हा ऐकवली तेव्हाच ती आवडल्यानं अवघ्या वीस मिनिटात मी होकार दिला. महाराष्ट्रात राहत असल्यानं मराठी भाषा खूप ऐकली आहे. मला मराठी भाषा बोललेली समजते. या सिनेमासाठी मी खास मराठी शिकलो आणि त्यासाठी लोकेशची फार मदत झाल्याचंही केके म्हणाले.

केके आणि राजेश्वरीसह पद्मावती राव, मिलिंद फाटक, अजित भुरे, विनीत शर्मा, शाल्व किंजवडेकर, हर्षिता सोहल, शुभवी गुप्ते, विभव राजाध्यक्ष, अभिजित अमकर, सचिन साळवी आदींच्याही या चित्रपटात भूमिका आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा