मुंबई - राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर यांची निवड झालीये. या पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक विभागानं केली आहे. 5 लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे.
लीलाधर कांबळी यांनी कलावैभव या नाट्यसंस्थेमार्फत व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. नयन तुझे जादुगर हे नाटक त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरलं. काचेचा चंद्र, सौभाग्य, हिमालयाची सावली, दुभंग, कस्तुरीमृग, वात्रट मेले ही त्यांची गाजलेली नाटकं. फनी थिंग कॉल्ड लव्ह या भरत दाभोळकरांच्या इंग्लिश नाटकातही त्यांनी काम केलं.
चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर हे नाट्यअभिनेते आणि उत्तम गायक म्हणून प्रसिद्ध आहेत. पंडितराज जगन्नाथ या नाटकाद्वारे 1968 मध्ये ते नट म्हणून पुढे आले. त्यानंतर बावनखणी, रक्त नको मज प्रेम हवे, दुरितांचे तिमिर जावो, मदनाची मंजिरी, मंदारमाला, जय जय गौरी शंकर या नाटकांतल्या त्यांच्या भूमिकाही गाजल्या.