Advertisement

कोण बनणार ‘भाई’?


कोण बनणार ‘भाई’?
SHARES

निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता असं बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले महेश मांजरेकर सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या कादंबरीवर सिनेमा बनवण्यासाठी सज्ज झाले आहेत.


एक नवं आव्हान

सध्या मराठी ‘बिग बॅास’मुळे चर्चेत असलेले महेश मांजरेकर महाराष्ट्राचं लाडकं अद्वितीय व्यक्तिमत्व असलेल्या पु. ल. देशपांडे उर्फ भाई यांच्या जीवनावर सिनेमा बनवत आहेत. पुलंना अवघा महाराष्ट्र ‘भाई’ या नावाने ओळखतो. त्यामुळे मांजरेकरांनीही आपल्या सिनेमाचं शीर्षक ‘भाई - व्यक्ती की वल्ली’ असं ठेवलं आहे. दिग्दर्शनासोबतच महेश मांजरेकर मुव्हीज, ग्रेट मराठा एन्टरटेन्मेंट कंपनी, फाळकेज फॅक्टरी - अ फिल्म मॅनेजमेंट कंपनी या बॅनरखाली मांजरेकर ‘भाई’ सिनेमाची निर्मितीही करणार आहेत.


यापूर्वीही झाले प्रयत्न

आजवर बऱ्याच मराठी दिग्दर्शकांनी पुलंचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या कथा रुपेरी पडद्यावर चितारण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू फार कमी दिग्दर्शकांच्या पदरी यश आलं. क्षितीज झारापकरने ‘गोळाबेरीज’मध्ये निखील रत्नपारखीला पुलंच्या रूपात सादर केलं. दिग्दर्शक शेखर नाईक यांनी ‘म्हैस’ या सिनेमात जितेंद्र जोशीला, तर सागर नाईक यांनी ‘चांदी’ या सिनेमात पुलंची म्हैस ही कथा सादर केली. पण हे सिनेमे यश-अपयशापेक्षा वादामुळेच जास्त चर्चेत राहिले.


सारं काही गुलदस्त्यात

निखीलने साकारलेल्या पुलंनंतर भविष्यात ही व्यक्तिरेखा कोणता कलाकार साकारणार याबाबत उत्सुकता होतीच. मांजरेकरांच्या ‘भाई’मुळे ती शिगेला पोहोचली आहे. या सिनेमाची घोषणा अद्याप व्हायची असल्याने सारं काही गुलदस्त्यात आहे. कलाकारांपासून-तंत्रज्ञांपर्यंत सर्वच टिमची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.


मांजरेकरांमुळं वाढल्या अपेक्षा

महेश मांजरेकरांनी आजवर मराठीसह हिंदी सिनेसृष्टीला बरेच चांगले सिनेमे दिले आहेत. अलीकडच्या काळात प्रदर्शित झालेल्या त्यांच्या ‘नटसम्राट’ला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यामुळे मांजरेकरांच्या नजरेतून पुलं पाहणं ही प्रेक्षकांसाठी एक वेगळीच पर्वणी ठरणार आहे. त्यामुळेच या सिनेमाकडून अपेक्षाही वाढल्या आहेत.हेही वाचा -

लीला करणार अमृताची इमेज ब्रेक

‘कान’नंतर ‘सिडनी’मध्ये ‘मंटो’ची वर्णी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा