Advertisement

EXCLUSIVE : ‘क्राइम पेट्रोल’मध्ये मंगेशचा पोलिसी खाक्या

‘क्राइम पेट्रोल’च्या सुरुवातीपासूनच या शोचं सूत्रसंचालन अनूप सोनीने केलं आहे. पण आता अनूपची जागा मंगेशने घेतली आहे. मंगेशची ही पहिलीच हिंदी मालिका असून, यात तो पोलिसी भूमिकेतही दिसत आहे.

EXCLUSIVE : ‘क्राइम पेट्रोल’मध्ये मंगेशचा पोलिसी खाक्या
SHARES

भगवानदादांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या ‘एक अलबेला’ या सिनेमाने अभिनेता मंगेश कदमच्या करियरला खऱ्या अर्थाने कलाटणी दिली आहे. या सिनेमात विद्या बालनसोबत दिसलेल्या मंगेशची पावलं आता हिंदीकडे वळली आहेत. ‘क्राइम पेट्रोल’ या गाजलेल्या गुन्हेगारी मालिकेच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मंगेशकडं सोपवण्यात आली आहे.

‘क्राइम पेट्रोल’च्या सुरुवातीपासूनच या शोचं सूत्रसंचालन अनूप सोनीने केलं आहे. पण आता अनूपची जागा मंगेशने घेतली आहे. मंगेशची ही पहिलीच हिंदी मालिका असून, यात तो पोलिसी भूमिकेतही दिसत आहे. आपल्या हिंदीतील या पहिल्या वहिल्या पावलाबाबत मंगेशने ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझीव्ह बातचीत करत ‘क्राइम पेट्रोल’च्या सूत्रसंचालनामागील रहस्य उलगडलं.

अनूपच्या जागी मंगेश

‘क्राइम पेट्रोल’च्या सुरुवातीपासून अनूप सोनी यांनी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. आता ही जबाबदारी माझ्याकडे आली आहे. हिंदीत मी प्रथमच काम करत आहे. अशातच त्यात एका गाजलेल्या शोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी असल्याने खूप काळजी घ्यावी लागत आहे.


दुहेरी जबाबदारी

अनूप केवळ या शोचे होस्ट होते. पण माझ्या बाबतीत तसं नाही. निर्माते राकेश सारंग आणि सोनी वाहिनीने माझ्याकडे दुहेरी जबाबदारी सोपवली आहे. या शोचा होस्ट तर मी आहेच, पण त्या जोडीलाच यातील घटनांमध्ये पोलिस अधिकारी बनून मी गुन्हेगारांचा शोध घेत आहे. त्यामुळे एकाच मालिकेत डबल गेम खेळावा लागत आहे.


छोट्या पडद्यावर प्रथमच पोलिस

लवकरच प्रदर्शित होणाऱ्या दिग्दर्शक गिरीश मोहिते यांच्या ‘लालबत्ती’ या सिनेमात मी पोलिस साकारला आहे. छोट्या पडद्यावर मात्र प्रथमच पोलिसांची भूमिका करत आहे. ‘लालबत्ती’च्या निमित्ताने घेतलेलं पोलिसांचं ट्रेनिंग आणि महाराष्ट्रातील मोठमोठ्या पोलिस अधिकाऱ्यांशी घेतलेल्या भेटीगाठींचा फायदा ‘क्राइम पेट्रोल’मधील पोलिस साकारताना होत आहे.


मराठमोळ्या ठेक्यात हिंदी

‘क्राइम पेट्रोल’चं सूत्रसंचालन करताना मी अस्खलित हिंदी बोलतो. पण एखाद्या घटनेच्या माध्यमातून जेव्हा मी गुन्ह्याचा छडा लावत असतो, तेव्हा महाराष्ट्रीयन पोलिसाप्रमाणे मराठमोळ्या ठेक्यात हिंदी बोलतो. कारण हाच नवीन बदल करण्यामागील मूळ हेतू आहे. त्यामुळे ड्युटीवर असताना माझी बोलीभाषा काहीशी मराठमोळी आहे.


पोलिसही माणूस आहे

कित्येकदा पोलिसांचं करप्ट रूपच जगासमोर आणलं जातं. पण सर्वजण तसे नाहीत. माणुसकीला जपत, आपलं कर्तव्य नेटाने बजावत देशसेवा करणारे पोलिसही मी पाहिले आहेत. शेवटी ते देखील माणूसच आहेत. त्यामुळे माणसाप्रमाणे त्यांच्यातही गुण आणि दोष असणारच. त्यामुळे सर्वानी त्यांच्या चांगल्या बाजूंकडं लक्ष केंद्रित केलं, त्यांच्या त्यागाला सलाम केला तर हळूहळू सर्वांचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल.



हेही वाचा-

शेक्सपिअरच्या नाटकावर विश्वास जोशींचा ‘घ्ये डब्बल’

अजय देवगणच्या ‘तानाजी’च्या शूटिंगचा शुभारंभ




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा