Advertisement

पडद्यामागचे 'बाबा'!


पडद्यामागचे 'बाबा'!
SHARES

प्रत्येकाच्या आयुष्यातला पहिला सुपर हिरो आपले 'बाबा'च असतात. आपल्यातील प्रत्येकाचं आपल्या वडिलांशी एक वेगळं नातं असत. 'फादर्स डे' हा खास बाबांसाठी साजरा करण्यात येणारा दिवस. वडिलांसाठी आदर, सन्मान आणि प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. याच दिवसाचं औचित्य साधून आपण पडद्यावर दिसणाऱ्या सेलिब्रिटीजच्या बाबांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.

'बाबा जवळ असले की कसलीच भीती वाटत नाही'


प्रत्येक मुलीसाठी तिचे बाबा 'स्ट्राँगमॅन' असतात. कधी भीती वाटली की तिला सर्वात आधी तिचे बाबा आठवतात. माझे देखील अगदी तसेच आहे. गंमत म्हणजे माझा आगामी 'लपाछपी' सिनेमा भुताचा आहे. त्यामुळे सिनेमा पाहताना भीती ही वाटणारच! असो. हा निव्वळ योगायोग असला तरी, बाबा जवळ असले की कसलीच भीती वाटत नाही. मी जेव्हा खचते, तेव्हा माझा पहिला फोन हा बाबांनाच असतो. मला लहानपणापासून जेव्हा एकटेपणा वाटला, तेव्हा त्यांनीच मला आधार दिला आहे. आजही एखादी गोष्ट अडखळली की मी लगेच बाबांकडे धाव घेते. त्यांच्या मार्गदर्शनाने माझा आत्मविश्वास वाढीस लागतो. ते नेहमीच मला प्रोत्साहन देण्याचे काम करतात. ते स्वभावाने मितभाषी आहे. त्यामुळे कुणाबरोबर जास्त बोलणे पसंत करत नाहीत. आमच्यातलं बाबा आणि मुलीचं नातं हे अबोल जरी असलं, तरी खूप छान आणि गोंडस आहे.

- पूजा सावंत, अभिनेत्री

'बाबांचा आदर्श घेऊन माझे व्यक्तिमत्व घडवते'


माझे बाबा मुंबई पोलीस खात्यात असल्यामुळे, मला त्यांच्यासोबत जास्त वेळ व्यतीत करता येत नाही. पण जेव्हा ते फ्री असतात, तेव्हा जास्तीत जास्त वेळ त्यांच्याबरोबर घालवणे मी पसंत करते. माझ्या बाबांबद्दल सांगायला गेले तर भरपूर काही आहे. खरं तर... अभिनयक्षेत्रात येण्याचे प्रोत्साहन मला बाबांकडूनच सर्वात आधी मिळाले. आमच्या घरात याआधी कोणीच या क्षेत्राकडे वळले देखील नव्हते. पण बाबांनी माझी आवड लक्षात घेत, यात काम करण्याची मुभा दिली. आईपेक्षा बाबांसोबत माझी जास्त बॉन्डिंग आहे. त्यांच्याशी मी प्रत्येक गोष्ट शेअर करत असते, ते सतत माझ्यासोबत असावेत असे मला वाटते. कधी कधी तर ते वेळ देत नाहीत म्हणून मी त्यांच्यावर रागावते देखील. पण तो अबोला काही वेळापुरताच असतो. माझ्या आगामी 'अंड्याचा फंडा' या चित्रपटाच्या शुटींगमध्ये ते माझ्यासोबत असावेत, असे मला वाटत होते. पण ते प्रत्येकवेळी शक्यच होईल असे नाही, याची जाणीव मला होती. बाबांशी बोलल्याखेरीज मला समाधान लाभत नाही. माझे बाबा मुंबई पोलीस खात्यात असल्याचा मला फार अभिमान असून त्यांच्या कामिगिरीचा आदर्श घेऊन मी माझं व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न करते आहे.

- मृणाल जाधव, बालकलाकार

'....आणि बाबांनी मला झेलले'


माझे बाबा सुनील धबडगावकर म्हणजे प्रेमळ व्यक्तिमत्व. त्यांच्याबद्दल जेवढे काही बोलू तेवढे कमी आहे. माझ्या कामाचे कोडकौतुक त्यांना खूप असते. माझ्या आगामी 'बसस्टॉप' सिनेमाची एक्साईटमेंट माझ्यापेक्षा अधिक त्यांना आहे. मी लहानपणापासूनच शांत स्वभावाची मुलगी आहे. पण कधी कधी खूप अतरंगीपणा करायचे, असे बाबाच बोलतात. 'फादर्स डे' निमित्ताने एक गोष्ट मला शेअर करावीशी वाटते. माझ्या लहानपणीचा एक किस्सा त्यांनीच मला सांगितला होता. तो असा की, मी, आई आणि बाबा डोंबिवली स्टेशनला होतो. त्यावेळी खूप धो-धो पाऊस पडत होता. रेल्वे स्थानकावर खूप गर्दी असल्यामुळे सर्वजण आपापली छत्री संभाळत चालत होते. पाऊस जास्त असल्यामुळे बाबांनी मला खांद्यावर घेतलं होत. मात्र तिथे देखील मला स्टंटबाजी करायची शक्कल सुचली आणि बाबांच्या खांद्यावरुन भरपावसात मी उडी मारली. बाबांनी मला पकडण्याचा प्रयत्न केला, पण मी सटकले. तेवढ्यात त्यांनी छत्री उलटी केली आणि मला छत्रीत झेललं. मी अक्षरशः पडता पडता वाचले होते. त्यानंतर बाबांनी पुन्हा मला त्यांच्या खांदयावर पकडून बसवलं. खूप भन्नाट किस्सा होता तो. मात्र आता जसजशी मोठी होत गेले, स्वतःमध्ये बदल घडवत गेले. माझ्या सर्व धडपडीच्या प्रवासात ते मला सांभाळत आले आहेत आणि आज देखील तितक्याच तत्परतेने मला सांभाळत आहेत.

- रसिका सुनील, अभिनेत्री

'त्यांची मुलगी असल्याचा अभिमान वाटतो'


माझे बाबा एअरफोर्समध्ये होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी त्यांच्यातला परफेक्शनिस्ट असणं आमच्यावर बिंबवलं. माझ्या बाबांकडून मी अनेक गुण आत्मसात केले आहेत. बाबांकडून मिळालेला पहिला गुण म्हणजे स्वावलंबीपणा. सेटवर असताना स्वतःची लहान मोठी कामे करणे, दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून न राहणे हे मी बाबांकडून शिकले आहे. बाबा नेहमी सांगतात, प्रत्येकाने स्वतःची कामे शक्य तेवढी स्वबळावर करायला हवीत. त्यांच्या सर्व शिकवणीचा आता मला खूप फायदा होतो आहे. लहानपणापासूनच त्यांनी मला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य दिलं आहे. मग ते करिअर निवडण्यापासून ते आयुष्यातील महत्वाचे निर्णय घेण्याबाबत असो, बाबा नेहमी माझ्या पाठिशी खंबीर उभे असतात. दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे वक्तशीरपणा. वेळ ही एक आयुष्यातली महत्वाची गोष्ट असल्यामुळे ती पाळायलाच हवी असा अट्टाहास बाबांचा असतो आणि मी देखील त्यांचा हा वारसाच पुढे चालवते आहे. माझ्या शूटींगच्या ठिकाणी, तसेच कुठे फंक्शन असेल, तर मी नियोजित वेळेच्या ५ मिनिटे आधीच तिथे पोहोचलेली असते. त्यामुळे अनेकदा माझं कौतुकदेखील करण्यात आलं आहे. माझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी त्यांची खूप ऋणी आहे. मी त्यांची मुलगी आहे, याचा मला अभिमान वाटतो.

- रीना अगरवाल, अभिनेत्री

'माझे बाबा माझे सुपरहिरो'


माझे बाबा पुरुषोत्तम विनायकराव जाधव माझे प्रेरणास्थान आहेत. मी आज जो काही आहे तो केवळ त्यांच्यामुळेच. मला आजही आठवते की ते मोठे सरकारी अधिकारी असल्याने त्यांच्या नावाचा मी लहानपणी खूप फायदा उचलला होता. आम्ही मूळचे नागपूरकर आणि तिथल्या सावनेर या तालुक्यात ते तहसीलदार होते. त्यामुळे माझी मोठीच ऐश असायची. मित्रांना घेऊन जाऊन कुठेही पैसे न देता खायचो आणि फिरायचोदेखील. गावात सगळे मला जाधव साहेबांचा मुलगा म्हणून ओळखायचे आणि त्याचा मला गर्व देखील होता. पण जसजसा मोठा होत गेलो, बाबांनी मला वळण लावायला सुरुवात केली. त्यांच्या नावावर मी जी काही मौजमजा केली होती, त्या सर्वांची परतफेड माझ्या मागे ते करत असत, हे जेव्हा मला समजले, त्यावेळी त्यांच्याबद्दलचा मला वाटणारा आदर दुपटीने वाढला. त्यानंतर कोणतेही काम स्वतःच्या हिंमतीवर करण्याची शिस्त मला लागली. माझ्या आयुष्यातील महत्वाच्या निर्णयात ते नेहमी माझ्यासोबत असतात. जेव्हा मी बारावीत नापास झालो होतो, तेव्हा सर्वच मला हसत होते. मला तुच्छतेने बघत असायचे. पण वडिलांनी मला खंबीरपणे साथ दिली. 'बारावीची परीक्षा मोठी नाही, तुला अजून खूप काही करायचे आहे आयुष्यात! तू नुसता पास नाही होणार, तर एक दिवस माझं नाव मोठं करणार', असा विश्वास त्यांना होता आणि अजूनही आहे. त्यांच्या प्रेरणेनंतर मी त्या दिवसापासून प्रत्येक गोष्ट मन लावून, जिद्दीने आणि चिकाटीने करतो आणि त्या सर्व गोष्टी सार्थकदेखील होतात. आता तर लोक त्यांना माझ्या नावाने ओळखायला लागले आहेत. श्रेयसचे बाबा म्हणून लोक त्यांना संबोधतात, त्याचा खूप जास्त अभिमान वाटतो. बाबांची ही चिरंतन साथ माझ्यासोबत आहे. ते माझे आधारस्तंभ आणि आयडॉल आहेत. लव्ह यु बाबा, यु आर माय सुपर हिरो!

श्रेयश जाधव, निर्माता, मराठी रॅपर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा