६ गुण : बाकी शून्य!

 Mumbai
६ गुण : बाकी शून्य!
Mumbai  -  

१४ एप्रिल रोजी रिलीज झालेला मराठी सिनेमा '६ गुण' हा आहे. नावावरूनच आपल्याला समजतंय की शिक्षणाशी संबंधित हा सिनेमा असेल. विद्या सर्वदे हा गावातील शाळेत पहिला येणारा मुलगा आहे. आईच्या कडक शिस्तीत त्याचा अभ्यास होतो. आईच्या शिस्तीमुळे विद्या फक्त घरात आणि अभ्यासातच गुरफटतो. पण अभ्यासात त्याच्याहूनही पुढे जाणारा राजू् जेव्हा त्याच्या वर्गात येतो, तेव्हा आपण मागे पडत जातोय हा ताण, त्या ताणातून निर्माण झालेली भीती आणि त्या भीतीतून निर्माण झालेले वाईट विचार, या सगळ्यातून जाणारा मार्ग हे असणार आहे '६ गुण' मध्ये.

सिनेमाची सुरुवात पाहताना पुढे काहीतरी चांगलं घडत जाईल असं वाटत असतानाच सिनेमा अधिकाधिक कंटाळवाणा वाटायला लागतो.

सिनेमात दाखवलेली कडक शिस्तीची विद्याची आई जरा अतीच वाटते. म्हणजे किती कडक शिस्त असावी, याचं मूल्यमापन करताना बहुधा विचार केला नसावा असं वाटतं. अगदी तासा-तासाला हिशोब सांगणारी आई नंतर नकोशी वाटू लागते. अभ्यासात गुण कमी मिळाले म्हणून दूर राहत असलेल्या स्वतःच्या बाबांशीही बोलायचं नाही, यासारख्या बऱ्याच गोष्टी जरा अतीच वाटू लागतात.

सिनेमा पुढे जात असताना मूळ प्रश्न मागे राहून बाकीच्याच गोष्टींवर जास्त भर दिल्यासारखं वाटू लागतं. सिनेमाचा मूळ विषय शिक्षण असतानाही सुरवातीला काही वेळ या विषयावर बोललं जातं. मात्र नंतर आपण कबड्डी खेळावर बनवलेला सिनेमा पाहायला आलोय की  काय, असं वाटायला लागतं. सिनेमाचा पहिला आणि दुसरा हे दोन्ही भाग प्रेक्षकांची निराशाच करतात.

सिनेमात नावाजलेले कलाकार असतानाही त्याचा काही उपयोग झालेला पाहायला मिळत नाही. विद्या सर्वदे म्हणजे अर्चित देवधर ह्याने त्याचा रोल ठीकठाक केलाय असं म्हणावं लागेल. त्याच्या आईची भूमिका साकारलेली अमृता सुभाष हिचा अभिनय पाहताना खरचं प्रश्न पडतो की, श्वास, किल्ला, अस्तु अशा सिनेमांमध्ये आपली छाप सोडलेली ती हीच अमृता का? विदयाच्या बाबांची भूमिका सुनील बर्वेने साकारली आहे. शेवटच्या भागातली अगदी काही मिनिटांचीच भूमिका आहे आणि त्याने ती चांगली निभावली आहे.

सिनेमात दिसणाऱ्या सर्व मुलांचे अभिनय खूप अती वाटू लागतात. म्हणजे शाळेतल्या मुलांची गोष्ट असूनही ती बघवेनाशी होते. शाळेत शिकणाऱ्या मुलांचे विद्याच्या आईशी बोलतानाचे संवाद तर लेखक ते शाळेतल्या मुलांसाठी लिहिलेले संवाद आहेत हे विसरला तर नाहीये ना असं वाटू लागतं. सिनेमा खूप चांगला होऊ शकला असता पण चांगला विषय आणि चांगले कलाकार असूनही सिनेमा पुरता फसलाय.

एकंदरीतच सिनेमात बघण्यारखं काहीच नाहीये. '६ गुण' चा ट्रेलर बघून जर सिनेमा पाहायचा बेत आखला असेल तर कदाचित तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो.

Loading Comments