राज ठाकरेंच्या हस्ते FU चं म्युझिक लाॅंच

  मुंबई  -  

  अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी केलेल्या ट्विटमुळे जबरदस्त सेन्सेशन निर्माण झालेल्या ‘FU’  या सिनेमाच्या संगीत अनावरणाचा सोहळा राज ठाकरे यांच्या हस्ते मुंबई येथे नुकताच पार पडला. अतिशय रॉकिंग अशा गाण्याच्या दमदार सादरीकरणामुळे कार्यक्रमाला वेगळीच शोभा आली. या भव्य सोहळ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण कलाकारांसह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.

  ‘FU’ या चित्रपटाची निर्मिती कट टू कट प्रोडक्शन, महेश मांजरेकर, अभय गाडगीळ, महेश पटेल आणि दिनेश किरोडियन यांनी केली आहे. तर दिग्दर्शन स्वतः महेश मांजरेकर यांचे आहे. ‘FU’ चे संगीत ताज्या दमाचे संगीतकार विशाल मिश्रा आणि समीर साप्तीस्कर यांनी केले आहे. तरुणाई म्हणजे सळसळता उत्साह, जिगरी यारी, रोमान्स्,  स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द आणि बंडखोरीची भाषा देखील. ‘FU’ या चित्रपटाचे संगीतदेखील असेच उत्साही, रोमँटिक आणि प्रसंगी बंडखोरदेखील आहे. या चित्रपटातील विविधरंगी, विविधढंगी अशी एकूण १४ गाणी आहेत जी एक से बढकर एक गायकांनी गायली आहे. चित्रपटात सोनू निगम, श्रेया घोषाल, अवधूत गुप्ते, प्राजक्ता शुक्रे, बेनी दयाल, सुखविंदर सिंग , नीती मोहन, जोनिता गांधी अशा अनेक गायकांनी गाणी गायली आहेत. आणि या चित्रपटाच्या संगीताचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात सलमानची मैत्रीण युलीया वन्तूर हिने देखील एक गाणे गायले आहे.

  ताज्या दमाचे संगीत असलेल्या या चित्रपटातील कलाकारदेखील ताज्या दमाचे आणि अतिशय उत्साही आहेत. चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे आकाश ठोसरचा हा सैराट नंतर पहिलाच चित्रपट असून त्याचा लूकदेखील अतिशय यूथफूल आणि ट्रेंडी असा आहे. आकाशसोबतच चित्रपटात संस्कृती बालगुडे, वैदेही परशुरामी, सत्या मांजरेकर, मयुरेश पेम, शुभम किरोडियन, माधव देवचक्के इत्यादी कलाकार आहेत. तरुणाईला भुरळ पाडतील अशी रॉकिंग गाणी असणारा हा चित्रपट २ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.