राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'रिंगण' 30 जूनला होणार प्रदर्शित

 Mumbai
राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'रिंगण' 30 जूनला होणार प्रदर्शित
Mumbai  -  

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या मैदानात विजयाची पताका फडकवणारा 'रिंगण' अखेर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. सुखाच्या आणि प्रेमाच्या शोधात निघालेल्या बाप-लेकाचा प्रवास दाखवण्यात आलेला 'रिंगण' हा सिनामा 30 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 

63 व्या राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवलेल्या 'रिंगण' या सिनेमाने 53 व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पदार्पण (दिग्दर्शक), सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायाचित्र दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट बालकलाकर या पुरस्करांवर आपले नाव कोरले. त्याशिवाय कान्स, स्टट्टगर्ट (जर्मन), लंडन, टोरांटो या काही मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही या चित्रपटाने आपलं वेगळेपण दाखवून दिलं.

आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाबरोबरच बोधपूर्ण निर्मिती असावी या उद्देशाने या सिनेमाची निर्मिती केली असल्याची प्रतिक्रिया निर्माते विधी कासलीवाल यांनी दिली. मकरंद माने दिग्दर्शित, लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित 'रिंगण' 30 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loading Comments