Advertisement

मराठी नाट्य परिषद निवडणूक - मोहन जोशींचा अर्ज बाद

नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्याबरोबरच तुषार दळवी, सुनील तावडे, अशोक शिंदे यांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहेत. या जाहीर झालेल्या यादीमुळे निवडणुकीने नाट्यमय वळण घेतले आहे.

मराठी नाट्य परिषद निवडणूक - मोहन जोशींचा अर्ज बाद
SHARES

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची सोमवारी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्याबरोबरच तुषार दळवी, सुनील तावडे, अशोक शिंदे यांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले आहेत. या जाहीर झालेल्या यादीमुळे निवडणुकीने नाट्यमय वळण घेतले आहे.


या कालावधीत होणार निवडणूक

२०१८ ते २०२३ या कालावधीसाठी नाट्यपरिषदेची निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला. ९ ते १८ जानेवारी या कालावधीत उमेदवारांनी अर्ज सादर करायचे होते. १९ जानेवारीला आलेल्या अर्जांची छाननी करण्यात आली आणि छाननी केलेल्या अर्जानुसार २२ जानेवारीला पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. येत्या ४ मार्चला मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल ७ मार्चला जाहीर करण्यात येणार आहे.


हे उमेदवार ठरले उपात्र

२२ जानेवारीला जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, तुषार दळवी, सुनील तावडे, अशोक शिंदे यांचे उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आले आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत या सर्वांच्या नावापुढे अपात्र असे नमूद करण्यात आले आहे.
मोहन जोशी २००३ पासून नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान आहेत. मात्र, मतदार यादीत नाव नसलेल्या व्यक्तीकडून अनुमोदक म्हणून सही करून घेतल्याचा फटका त्यांना बसला आहे.


योगेश सोमणांचे मोहन जोशींना पत्र

तर दुसरीकडे लेखक अभिनेते योगेश सोमण यांनी अध्यक्ष मोहन जोशी यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आनंद, खेद, दु:ख व्यक्त केले आहे. १५ वर्षांची अध्यक्षीय कारकीर्द असताना आपला उमेदवारी अर्ज बाद कसा झाला? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. साधा उमेदवारी अर्ज भरता येत नसेल, तर असाच अनागोंदी कारभार परिषदेत केला जात होता का? असा सवालही योगेश सोमण यांनी उपस्थित केला आहे. गेली काही वर्ष मोहन जोशी यांच्या अध्यक्षपदावरून वाद रंगला आहे. अभिनेते योगेश सोमण जवळपास ३० वर्ष कलाक्षेत्रात कार्यरत आहेत.
संबंधित विषय
Advertisement