Advertisement

स्टंट करताना दुखापत झाली, पण आत्मविश्वास वाढला - नुपूर दैठणकर


स्टंट करताना दुखापत झाली, पण आत्मविश्वास वाढला - नुपूर दैठणकर
SHARES

‘शो मस्ट गो आॅन’ म्हणत आजवर बऱ्याच कलाकारांनी दुखापतग्रस्त होऊनही कॅमेरा फेस केल्याची अनेक उदाहरणं आहेत. याच कलाकारांच्या पावलावर पाऊल ठेवत आजच्या पिढीतील बरेच वाटचाल करत आहेत. ‘बाजी’ या मालिकेत हिराची भूमिका साकारणाऱ्या नुपूर दैठणकरने दुखापत होऊनही आपलं काम चोख बजावलं आहे.


पुन्हा केला कॅमेरा फेस

‘बाजी’ या मालिकेच्या कथानकात लोहा हिराला ओलीस ठेवून स्वतःची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात असतो. तेव्हा तो हिराच्या गळ्याला विळी लावून तिला जेरबंद करतो आणि दरवाज्याकडे घेऊन जाण्यास सांगतो. या झटापटीत हिराला गळ्याला दुखापत झाली. भोर येथील वाड्यात या मालिकेचं चित्रीकरण सुरू होतं. दुखापत झाल्यावर तातडीने तिच्यावर उपचारही झाले, पण हिराची भूमिका साकारणाऱ्या नुपूर दैठणकरने न घाबरता आत्मविश्वासाने पुन्हा कॅमेरा फेस केला.


एका धाडसी मुलीची भूमिका

या घटनेविषयी नुपूर म्हणाली, ही भूमिका एका धाडसी मुलीची आहे. ही तलवार आणि दांडपट्टाही चालवते. त्यामुळे या मालिकेत मी घोडेस्वारीपासून पहिल्या मजल्यावरून खाली उतरण्यापर्यंत सगळे स्टंटस केले आहेत. या शॉटच्या वेळेसही हातातली विळी अजिबात धारदार नव्हती, वरून आमच्या फाईटच्या टीमनं त्याला ट्रांस्परंट प्लास्टिकही चिटकवलं होतं, पण झटापटीत ही दुखापत झाली. त्यानंतर दिग्दर्शक संतोष कोल्हेसर आणि सगळी टीम क्षणात धावून आली. लगेच प्राथमिक उपचार झाले. उलट यानंतर माझा स्टंट करतानाचा आत्मविश्वास दुपटीने वाढला.


मालिकेत पुढे काय?

लोहाचा मृत्यू हा ‘बाजी’च्या कथानकातला एक महत्वाचा टप्पा असल्याचंही नुपूरने सांगितलं. त्यामुळे या मालिकेत पुढे काय पाहायला मिळतं याबाबत उत्सुकता वाढली आहे. या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केलं असून, झी मराठीवर ही मलिका सोमवार ते शनिवार रोज रात्री साडेदहा वाजता प्रसारीत होते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा