वंदना मिश्र लिखित ‘मी... मिठाची बाहुली’चे अभिवाचन

  Borivali
  वंदना मिश्र लिखित ‘मी... मिठाची बाहुली’चे अभिवाचन
  मुंबई  -  

  मुंबई - जेमतेम पंधरा पावसाळे पाहिलेली एक मराठी मुलगी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवते. अन् पहाता पहाता भाषेची भिंत ओलांडून मुंबईच्या गुजराथी, मारवाडी नाट्यसृष्टीत एक सुप्रसिद्ध गायिका, अभिनेत्री म्हणून मानाचं स्थान मिळवते. त्या म्हणजे सुशीला लोटलीकर म्हणजेच मराठी, गुजराथी आणि मारवाडी रंगभूमीवरील जेष्ठ अभिनेत्री श्रीमती वंदना मिश्र. प्रतिकूल परिस्थितीशी झुंजणाऱ्या एका साध्या पण मानी कुटुंबाचा वारसा जपणाऱ्या वंदना मिश्र यांचा जीवनप्रवास खिळवून ठेवणारा आहे.

  गुरुवार 26 जानेवारीला सायंकाळी 4.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे, मिनी थिएटर बोरीवली (प.) येथे त्यांच्या बहुचर्चित आणि रसिकांनी गौरविलेल्या 'मी..मिठाची बाहुली' या पुस्तकाच्या अभिवाचनाचा प्रयोग सादर होणार आहे. सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री फैय्याज या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. अभिवाचनाची संकल्पना आणि दिग्दर्शन विश्वास सोहोनी यांचे असून सादरीकरण उदय नेने आणि मानसी कुलकर्णी करणार आहेत.

  ‘मी... मिठाची बाहुली’ या त्यांच्या मराठी आत्मचरित्रात त्यांच्या लिखाणातील जिव्हाळा आणि आपुलकीचे सहजसुंदर दर्शन घडते. पक्क्या मुंबईकर असलेल्या मिश्र यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मुंबईचे आणि तत्कालीन समाजजीवनाचे मनोहारी दर्शन ‘मी... मिठाची बाहुली’ पुस्तकात पानोपानी घडवलं आहे. 1944 साली मुंबई गोदीत झालेला स्फोट, ‘चले जाव’ची चळवळ, स्वातंत्र्यासोबत आलेली फाळणी अशा अनेक महत्त्वाच्या घटनांचा दस्तावेज या आत्मचरित्रात आहे.

  या अभिवाचनातून मुंबईची जीवनमूल्य, श्रम–संस्कृती आणि सर्वसमावेशक माणुसकीवर आधारलेली जीवनशैली या वैशिष्ट्यांचा लेखिका वंदना मिश्र यांनी घेतलेला वेध श्रोत्यांना अनुभवता येईल. हा कार्यक्रम सर्व रसिक श्रोत्यांसाठी विनामूल्य असून कार्यक्रमाच्या सन्मानिका तीन दिवस आधी थिएटरवर उपलब्ध असतील.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.