Advertisement

स्वप्नांचा प्रवास उलगडणारा ‘ट्रकभर स्वप्नं’


स्वप्नांचा प्रवास उलगडणारा ‘ट्रकभर स्वप्नं’
SHARES

प्रत्येकाचं आपलं एक स्वप्न असतं. ते सत्यात उतरवण्यासाठी जो तो धडपडत असतो. अशाच स्वप्नांचा प्रवास उलगडवणाऱ्या ‘ट्रकभर स्वप्नं’ या सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबईत पार पडला.


मध्यमवर्गीय कुटुंबाचा प्रवास 

आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं. काहींचं हे स्वप्न साकार होतं, तर काहींचं होत नाही. या सिनेमातही घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा प्रवास पाहायला मिळेल. ‘ट्रकभर स्वप्नं’ या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त आणि अभिनेता आदेश बांदेकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील कलाकार तंत्रज्ञ यांच्यासह काही मान्यवर उपस्थित होते.


२४ ऑगस्टला प्रदर्शित

आयकॉनिक चंद्रकांत प्रॅाडक्शन्स प्रा.लि. व आदित्य चित्र प्रा.लि प्रस्तुत आणि प्रमोद पवार दिग्दर्शित ‘ट्रकभर स्वप्नं’ हा चित्रपट २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक प्रमोद पवार यांच्या मेहनतीचं व जिद्दीचं कौतुक करत राजदत्त आणि आदेश बांदेकर यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.


आयटम साँगसह भक्तीगीत

‘ट्रकभर स्वप्नं’च्या या प्रवासात वेगवेगळ्या पठडीतील चार गाणी आहेत. श्रेयस आंगणे या तरुण गीतकार-संगीतकाराने या सिनेमासाठी गीतलेखन केलं असून संगीतही दिलं आहे. सोनू निगम, आनंदी जोशी, ममता शर्मा, आदर्श शिंदे, जावेद अली, अश्मी पाटील आदी गायकांचा सूर या गीतांना लाभला आहे. ‘लुकलुकले स्वप्न…’ हे प्रेमगीत, ‘सेल्फीवाली…’ हे आयटम साँग, मुंबईच्या जीवनावर भाष्य करणारं ‘धडक धडक…’ हे गाणं आणि ‘देवा तुझ्या…’ या भक्तीगीताचा समावेश या सिनेमात आहे.


स्वप्नांचा प्रवास 

ही कथा आपल्या सगळ्यांची आहे असं सांगत आपल्या जगण्याचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या या कुटुंबाच्या स्वप्नांचा प्रवास आपल्याला बरंच काही शिकवून जाईल, असा विश्वास प्रमोद पवार यांनी याप्रसंगी व्यक्त केला. मीना चंद्रकांत देसाई , नयना देसाई या ‘ट्रकभर स्वप्नं’च्या निर्मात्या आहेत. मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, मुकेश ऋषी, मनोज जोशी, स्मिता तांबे, आदिती पोहनकर, विजय कदम, आशा शेलार, वैभवी पवार, प्रेमा किरण, जनार्दन लवंगारे, साहिल गिलबिले, ज्योती जोशी, सतीश सलागरे, सुरेश भागवत, जयंत गाडेकर, दिपज्योती नाईक या कलाकारांच्या या सिनेमात भूमिका आहेत.

 चित्रपटाची पटकथा-संवाद प्रवीण तरडे यांनी लिहिले आहेत. छायांकन राजीव जैन यांनी केलं असून, संकलन प्रशांत खेडेकर यांचं आहे. कलादिग्दर्शन हेमंत भाटकर यांचं आहे. नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केलं आहे.



हेही वाचा -

मेघा, शर्मिष्ठा आणि पुष्कर शिक्षकांच्या भूमिकेत

स्मिता तांबे, अरविंद जगताप यांच्या उपस्थितीत ‘हडळ’ सिनेमाचा मुहूर्त




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा