EXCLUSIVE : निखिल राऊत अाता शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या ‘फर्जंद’ या सिनेमात निखिल राऊतने किसना नावाच्या मावळ्याची भूमिका साकारली होती. शिवरायांचे गुप्तहेर असलेल्या बहिर्जी नाईक यांचा हा खास मााणूस असलेला निखिल आता सोनी मराठी वाहिनीवरील ‘गर्जा महाराष्ट्र’ या मालिकेत शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

SHARE

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी आपल्यालाही मिळावी, असं बऱ्याच मराठी कलावंतांचं स्वप्न असतं. पण सर्वच शिवराय होऊ शकत नाहीत हे देखील खरं आहे. काही खास कलाकारच या भूमिकेसाठी बनले आहेत. यामुळेच मराठी सिने, नाट्य आणि मालिकांच्या इतिहासात फार मोजक्या कलाकारांना शिवाजी महाराज साकारण्याचं भाग्य लाभलं आहे.

 रंगभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारण्याचं ‘चॅलेंज’ स्वीकारलेल्या निखिल राऊतसाठी मात्र ही संधी चालून आली आहे. त्यामुळे रंगभूमीवर सावरकर साकारणारा निखिल टीव्हीवर छत्रपती शिवाजी महाराज बनलेला पहायला मिळणार आहे. यावर ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझीव्ह बातचीत करताना निखिलने यापूर्वी साकारलेल्या शिवरायांचं गुपितही उघड केलं.


किसना ते शिवराय

काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या ‘फर्जंद’ या सिनेमात निखिलने किसना नावाच्या मावळ्याची भूमिका साकारली होती. शिवरायांचे गुप्तहेर असलेल्या बहिर्जी नाईक यांचा हा खास मााणूस असलेला निखिल आता सोनी मराठी वाहिनीवरील ‘गर्जा महाराष्ट्र’ या मालिकेत शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.


शिवाजी महाराज अवतरणार

महाराष्ट्राच्या मातीत अनेक रत्न जन्माला आली. त्यांची कथा या मालिकेत पहायला मिळत आहे. प्रतिमा जोशी यांचं दिग्दर्शन आणि जितेंद्र जोशीचं सूत्रसंचालन असलेल्या या मालिकेत ८ आॅक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज अवतरणार आहेत. याच मालिकेसाठी निखिलने शिवरायांचा वेष धारण केला आहे.


यापूर्वीही साकारले शिवराय

शिवाजी महाराज साकारणाबाबत निखिल म्हणाला की, शिवाजी महाराज साकारण्याची ही माझी पहिलीच वेळ नाही. यापूर्वी रंगभूमीवर महाराज साकारले आहेत. ‘जाणता राजा’ या नाटकात बालशिवाजी साकारले होते. याशिवाय पथनाट्यांमध्येही महाराज सादर केले आहेत. प्रणित कुलकर्णी यांच्या ‘शिवबा ते शिवराय’ या महानाट्यातही मी छत्रपतींची भूमिका साकारली होती.


श्रद्धास्थान आणि अस्मिता

शिवाजी महाराज हे माझं श्रद्धास्थान आहेत. महाराष्ट्राची अस्मिता असलेली ही व्यक्तिरेखा साकारताना एक वेगळाच हुरूप येतो. यापूर्वी चंद्रकांत, सूर्यकांत, डाॅ. अमोल कोल्हे, चिन्मय मांडलेकर या काही कलाकारांनी नेटकेपणाने साकारलेले शिवाजी महाराज रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे मला महाराज साकारण्याची संधी मिळणं हा शिवाजी महाराजांचाच आशिर्वाद मानतो.


महाराजांचे अप्रकाशीत पैलू

आजवर न पाहिलेले महाराज या मालिकेत दिसतील. स्त्रियांच्या संरक्षणार्थ खरं तर स्वराज्याची ठिणगी पडली आणि नंतर एक वादळ उठलं ज्याने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या मालिकेत हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला आहे. महाराजांना आपल्या मावळ्यांच्या पराक्रमाचा अभिमान होता. पण स्त्रियांच्या अब्रूपुढे कोणाचीच गय केली जात नव्हती. स्त्रियांशी बेअदबी करणाऱ्या आपल्याच किल्लेदाराला महाराजांनी कशाप्रकारे शिक्षा केली ते देखील या मालिकेत पहायला मिळेल.


मेकअपची कमाल

कोणतीही व्यक्तिरेखा सजीव करण्यासाठी जशी अभिनयाची गरज असते तशी मेकअपचीही मोलाची साथ असावी लागते. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेटअपमध्ये सादर करण्यासाठी मेकअप आर्टिस्ट विशाल पाठारे यांनी खूप मेहनत घेतली आहे. दशमी क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या मालिकेचं लेखन समीर जोशी यांनी केलं आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=481731648970675&id=261422557227245

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10214591170466459&id=1037701074
हेही वाचा

सुमित उघडणार लागूंच्या अदाकारीचा ‘पिंजरा’

'हे' आहेत संजय जाधवच्या सिनेमातील 'लकी' कलाकार
संबंधित विषय
ताज्या बातम्या