Advertisement

सिनेसृष्टीतील ताऱ्यांच्या मनातील 'महिलाराज'

आजची स्त्री केवळ अभिनयापुरतीच मर्यादित राहिलेली नसून, तांत्रिक बाबींमध्येही ती पारंगत झाली आहे. महिला दिनाच्या निमित्तानं 'मुंबई लाइव्ह'शी एक्सक्लुझीव्ह संवाद साधताना सिनेसृष्टीतील ताऱ्यांनी आपल्या मनातील 'महिलाराज'ची व्याख्या सांगितली...

सिनेसृष्टीतील ताऱ्यांच्या मनातील 'महिलाराज'
SHARES

दरवर्षी महिला दिनाचं औचित्य साधत निरनिराळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जातो. आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेल्या महिला सिनेसृष्टीतही मागे नाहीत. आजची स्त्री केवळ अभिनयापुरतीच मर्यादित राहिलेली नसून, तांत्रिक बाबींमध्येही ती पारंगत झाली आहे. महिला दिनाच्या निमित्तानं 'मुंबई लाइव्ह'शी एक्सक्लुझीव्ह संवाद साधताना सिनेसृष्टीतील ताऱ्यांनी आपल्या मनातील 'महिलाराज'ची व्याख्या सांगितली...


सोनाली कुलकर्णी (अभिनेत्री)

आज सर्व गोष्टी कमर्शिअल झाल्या आहेत, पण आपल्याला खऱ्या अर्थानं 'वुमन्स डे' साजरा करायचा असेल, तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीला मान द्या. मग ती तुमची आई, बहिण, पत्नी, मैत्रीण, प्रेयेसी, मुलगी असेल तिला मान-सन्मान द्या. त्यांच्याप्रमाणेच रस्त्यावर चालणाऱ्या अनोळखी मुलीला, स्त्रीलाही तितकाच मान द्या. ज्या दिवशी आपण ते करू त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या देशात रोज महिला दिन साजरा होईल आणि महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण कमी होईल.


अंकुश चौधरी (अभिनेता)

माझ्या मते ३६५ दिवस महिलाराज असतं हे प्रत्येकानं लक्षात ठेवायला हवं. कारण जी जन्म देते ती आई. जी बालपणापासून बरोबर असते ती बहिण. लग्न झाल्यावर साथ देते ती पत्नी. जन्माला येते ती मुलगी. त्यामुळं पुरुषांच्या भोवताली हे महिलाराजच आहे. जे आपल्या चुका सुधारते आणि चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देते. त्यामुळं केवळ एक दिवस नव्हे, तर वर्षातील ३६५ दिवस महिला दिन साजरा केला पाहिजे.


स्वप्ना वाघमारे-जोशी (दिग्दर्शिका)

एरवी रोजच महिला दिन असतो, पण हा दिवस केवळ आठवण करून देण्याचा, साजरा करण्याचा आहे. महिलांचा आदर करणं हे अॅाप्शनल नाही. ते कम्पल्सरी आहे. महिलांना नॅार्मल व्यक्तींप्रमाणं वागवणं महत्त्वाचं आहे. मराठी सिनेसृष्टी खूप प्रेमळ आहे. इथे मला खूप आदर मिळतो. असं असलं तरी इथे स्त्रियांची संख्या खूप कमी आहे. दिग्दर्शक, कॅमेरामन, संकलक, असिस्टंट अशा विविध तांत्रिक पदांवर स्त्रिया काम करू शकतात. त्या इथे का येत नाहीत हे जाणून घ्यायचं आहे. इथे यायला घाबरू नका. आपण स्ट्राँग असलो की कुणीही वाईट वागू शकत नाही. इथं खूप चांगली माणसं आहेत. कदाचित बाहेरच्या जगापेक्षाही जास्त चांगली... महिलांच्या अधिकारांचा इतरांनी जसा आदर करावा तसा महिलांनीही त्याचा अनादर करू नये.


समृद्धी पोरे (दिग्दर्शिका)

पुरुषांना घडवणारी 'ती' क्रिएटर आहे. 'ति'नं त्याला जन्म दिला आहे. म्हणून 'ती' उच्च स्थानी आहे. तिच्याकडे सृष्टी घडवण्याचं सामर्थ्य आहे. एखाद्या गोष्टीत स्वत:ला सामावून घेण्याची शक्ती स्त्रियांकडे असल्यानं प्रत्येक क्षेत्र ती काबीज करू शकते. आजच्या महिलांना सांगेन की, तुम्ही माता आहात. बालकांचं संगोपन करणं म्हणजे वात्सल्याची देणगी फक्त तुमच्याकडे आहे. ते सोडून करियरच्या मागे धावू नका. तुम्ही तुमच्या बाळाला वात्सल्य देऊ शकला नाहीत, तर तुमचंच नुकसान होणार आहे.


गिरीजा ओक (अभिनेत्री)

महिला दिन हा केवळ आपली भावना साजरा करण्याचा चांगला मार्ग आहे, परंतु आपल्याला स्त्रीत्वाचं महत्त्व किंवा उत्सव साजरा करण्यासाठी एखाद्या विशेष दिवसाची गरज लागत असेल तर ते लाजिरवाणं आहे. माझ्या मते, पुरुष किंवा स्त्रिया असा स्वतंत्र विचार न करता आपण एकत्रितपणं समाज म्हणून विचार करण्याची गरज आहे. फक्त दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे, दुसरं काहीही बदलण्याची गरज नाही. 


स्नेहा वाघ (अभिनेत्री)


भारतातील महिलांसाठी काय बदललं पाहिजे तर ते म्हणजे भारतीय महिलांना १०० टक्के रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. केवळ एवढंच नाही तर महिलांसाठी आणि विशेषत: नोकरी करणाऱ्या आयांसाठी काम करण्यासाठीचं योग्य वातावरण असायला हवं. स्त्री शिक्षणाचं प्रमाण वाढवणं आणि स्त्रियांना नेतृत्वासाठी प्रोत्साहन देणंही खूप आवश्यक आहे.


अनुजा साठे (अभिनेत्री)

समाजातील कोणत्याही महिला किंवा तरुणीला समाजासाठी आपल्या स्वप्नांशी तड सोडायला लागू नये. विविधांगी आणि आव्हानात्मक भूमिका करणाऱ्या आम्ही मजबूत महिला आहोत. आम्ही भावनिक असलो तरी भक्कम आहोत. आम्ही निःस्सीम समर्पणाच्या भावनेनं व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात संतुलन राखतो. स्वत:चा विकास घडवण्यासाठी स्त्रीयांनी एकमेकांना साहाय्य करण्याची गरज आहे.


प्राजक्ता माळी (अभिनेत्री)


सकाळी उठवण्यापासून रात्री झोपायला जाईपर्यंत सर्व लहान-सहान गोष्टी आपली आई करते. यात बहीण, काकू, मावशी, आत्या यांचाही सहभाग असतोच. त्यामुळं माझ्यासाठी रोजच महिला दिन आहे. आजच्या स्त्रियांच्या असामान्य कर्तृत्वापुढे रोज महिला दिन साजरा करायचं ठरवलं तरी पुरेसा होणार नाही. आजच्या महिला अकल्पनीय कर्तृत्व गाजवत आहेत. मनोरंजन विश्वातील आदर्श महिला म्हणून मी आलिया भटकडे पाहते. खूप लहान वयात तिनं जे काम केलं आहे ते कौतुकास्पद आहे.


संहिता जोशी (अभिनेत्री)

महिला दिन म्हणजे सर्व स्त्रियांसाठी वाढदिवसच असतो असं मला वाटतं. जसं आपण एखाद्याचा वाढदिवस साजरा करतो तसाच आपण महिला दिनसुद्धा साजरा केला पाहिजे. घरातील पुरुषांनी त्या दिवशी महिलांसाठी काहीतरी खास करून त्यांना गिफ्ट द्यावं. एक साधा चहा जरी त्यांना दिला तरी महिला खुश होतील. आपण सर्वानीच या दिवशी आपल्या आयुष्यात असणाऱ्या महिलांसोबत वेळ घालवावा आणि त्यांना आनंद मिळेल अशा गोष्टी त्याच्यासोबत कराव्यात.


मयुरी देशमुख (अभिनेत्री)

बराच काळ स्त्रियांना महत्वच देण्यात आलं नसल्यानं महिला दिन साजरा करण्याची गरज भासते. आजही अनेक भागात स्त्रियांचं अस्तित्व दबलेलंच आहे. अनेक ठिकाणी महिलांना त्यांच्या कामगिरीचं श्रेय दिलं जात नाही, त्यांना गृहीत धरलं जातं. म्हणूनच हा दिवस साजरा करण्याची गरज आहे. स्त्रियाही समाजातील महत्वाचा घटक आहेत हे विसरता कामा नये. त्यांनाही त्यांचं स्थान दिलं पाहिले. हे कुठेतरी अधोरेखित करायला हवं. महिलांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळायला हवेत.



हेही वाचा -

ये दिवार टुटेगी कैसे? डायनामाईटच्या स्फोटानंतरही नीरव मोदीचा बंगला उभाच!

'इथं' असेल महापौरांचं नवं निवासस्थान



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा