Advertisement

'मेहंदी' फेम अभिनेता फराजच्या उपचारांसाठी १५ लाखांची मदत

मेंदूच्या संसर्गामुळे ४६ वर्षीय फराज याच्यावर बंगळुरूच्या विक्रम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. फराज सध्या व्हेंटिलेटरवर आहे.

'मेहंदी' फेम अभिनेता फराजच्या उपचारांसाठी १५ लाखांची मदत
SHARES

९० च्या दशकात 'फरेब' आणि 'मेहंदी' सारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला अभिनेता फराज खान सध्या जीवन-मृत्यूशी संघर्ष करतोय. मेंदूच्या संसर्गामुळे ४६ वर्षीय फराज याच्यावर बंगळुरूच्या विक्रम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. फराज सध्या व्हेंटिलेटरवर आहे.

आर्थिक अडचणीमुळे त्याच्या कुटुंबानं निधी गोळा करणार्‍या वेबसाइटवर मदतीचं आवाहन केलं होतं. फाराजच्या उपचारांसाठी कुटुंबाला २५ लाखांची गरज आहे. मदतीचं आवाहन केल्यानंतर बरेच लोक त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत असलेल्या फराजच्या उपचारांसाठी आतापर्यंत चाहत्यांकडून १५ लाखांची मदत आली आहे. याची माहिती अभिनेत्री पूजा भट्ट हिनं सोशल मीडियावर दिली आहे.

पूजाने लिहिलं की, "फराज खानच्या वैद्यकीय उपचारांसाठी कुटुंबीयांपर्यंत २५ लाखांपैकी १४ लाख ४६ हजार ०४८ रुपयांची मदत पोहोचली आहे. मदतीचा ओघ असाच कायम असू द्या.'' आलिया भट्टची आई सोनी राझदान यांनीही फराजच्या उपचारांसाठी पैसे दिले आहेत.

यापूर्वीही पूजानं फराजच्या उपचारासाठी आर्थिक मदतीची विनंती केली होती. तिनं लिहिलं होतं की, “कृपया ही पोस्ट शेअर करा आणि शक्य असल्यास मदत करा. मी करत आहे, तुम्हीही केली तर मी तुम्हा सर्वांची आभारी असेल.”

ही पोस्ट व्हायरल झाली आणि त्यानंतर सुपरस्टार सलमान खानदेखील मदतीसाठी पुढे आला. त्यानं फराजचं हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी कुटुंबाला आर्थिक मदत केली.

मुंबई मिररशी झालेल्या संभाषणात फाराजचा धाकटा भाऊ फहमान म्हणाला होता, "आम्ही आयुष्यभर सलमान खानचे ऋणी राहू. देव त्याला आनंदी ठेवो आणि त्याला दीर्घायुष्य देवो.”

फंडरेजिंग वेबसाइटवर फराजच्या प्रकृतीविषयी त्याच्या कुटुंबीयांनी माहिती दिली. त्यानुसार, गेल्या एका वर्षापासून त्याची तब्येत खालावत गेल्याचं सांगण्यात आलं. फराजला कफची तक्रार होती, त्यानंतर त्याच्या छातीत संसर्ग झाला.

डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला, पण तोपर्यंत संसर्ग खूप वाढला होता. छातीमधून हर्पिसचा संसर्ग फराजच्या मेंदूपर्यंत पोहोचला आणि तेव्हापासून त्याची प्रकृती अतिशय गंभीर आहे.

फराज खान हा गतकाळातील कॅरेक्टर आर्टिस्ट युसुफ खान ('अमर अकबर अँथनी' फेम जेबिसको) यांचा मुलगा आहे. राणी मुखर्जी स्टारर 'मेहंदी'मध्ये त्यानं मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय त्यांनी 'फरेब', 'पृथ्वी' आणि 'दिल ने फिर याद किया' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.हेही वाचा

DDLJ तील राज आणि सिमरनचा परदेशात उभारला जाणार कांस्य पुतळा

राणा डगुपती आणि पुलकित सम्राटचा हाथी मेरे साथी 'या' दिवशी होणार प्रदर्शित

संबंधित विषय
Advertisement