जिद्द आणि हिंमतीची कथा..'पूर्णा'!

 Mumbai
जिद्द आणि हिंमतीची कथा..'पूर्णा'!
Mumbai  -  

मुंबई - हरियाणाचे कुस्तीपटू महावीर सिंग फोगाट यांच्यावर आधारीत 'दंगल', महेंद्र सिंग धोनीचा क्रिकेटर बनण्याचा प्रवास मांडणारा 'धोनी द अनटोल्ड स्टोरी', 'मेरीकोम' अशा चित्रपटांमध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे ती म्हणजे 'पूर्णा'. 'पूर्णा' हा वास्तविक घटनेवर आधारीत चित्रपट आहे. 'पूर्णा' अशा मुलीची कथा आहे जिने अवघ्या १३ वर्षाच्या वयात एव्हरेस्ट सर केले. १३ वर्षाच्या मुलीने जिद्द आणि हिंमतीच्या जोरावर कशा प्रकारे समस्यांचा सामना करत एव्हरेस्ट सर केले हे या चित्रपटात मांडण्यात आले आहे.

तेलंगणातल्या आदिवासी भागात राहणाऱ्या एका शेतकऱ्याची १३ वर्षांची मुलगी पूर्णा मालावत ( अदिती इनामदार ) आणि प्रिया ( एस. मारिया ) या दोघा बहिणींची ही कहाणी. घरची परिस्थिती हालाखीची.. त्यामुळे शिक्षणासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. शिकण्याची आवड पण दोघींना कुटुंबियांचा पाठिंबा नाही. मुलगी वयात आली की तिचे लग्न लावून द्यावे या मानसिकतेत जगणारे तिचे कुटुंब. याच मानसिकतेला कंटाळून दोघी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतात. पण त्यांचा प्लॅन फसतो. पूर्णाची बहीण प्रियाचे लहान वयातच बळजबरीने लग्न लावून दिले जाते. पण पूर्णा शिकण्याची जिद्द सोडत नाही. समाजकल्याण मंडळाच्या निवासी शाळांमध्ये शिकण्यासाठी पूर्णा घर सोडते. या शाळेत ती प्रवेश करते पण तिला शाळेत स्थिर होण्यास वेळ जातो. या शाळेतूनही ती पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण प्रवीणकुमार ( राहुल बोस ) तिची समजूत काढतो आणि ती पुन्हा शाळेत येते. राहुल बोस 'आयपीएस'मधील नोकरी सोडून शिक्षण क्षेत्रात काही चांगले करायचे या हेतून समाजकल्याण मंडळाच्या शाळांची परिस्थिती बदलण्याचे ठरवतो. या शाळेमध्ये त्याला पूर्णा भेटते. पूर्णात असणाऱ्या गुणवत्तेला प्रवीणकुमार दिशा देतो. एकूणच आदिवासी पाडा ते एव्हरेस्ट सर करण्यापर्यंतचा तिचा प्रवास यात मांडण्यात आला आहे. कशाप्रकारे पूर्णा एव्हरेस्ट सर करण्याचा विचार करते? एव्हरेस्ट सर करताना तिला कराव्या लागणाऱ्या आव्हानांचा कशाप्रकारे तिने सामना केला, यासाठी तुम्हाला चित्रपटच पाहावा लागेल.

अदिती इनामदारने 'पूर्णा'च्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. तर संवेदनशील आणि हटके भूमिका साकारणाऱ्या राहुल बोसने नेहमीप्रमाणे उत्तम अभिनयाचे दर्शन घडवले आहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी या चित्रपटाला दिलेली गाणी खरच प्रेरणादायी आहेत. 'कुछ पर्वत हिलाए तो बात है' हे गाणे एक वेगळाच जोश जागवते. चित्रपटातील काही भागांचे चित्रण हे खरच बर्फाळ भागात जाऊन केले आहे. गिर्यारोहण करणारी चिमुकली, बर्फ खचणारी बर्फाळ भागात चित्रीत केलेली दृश्य खरच अंगावर काटा आणारी आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो.

कलाकार - अदिती इनामदार, एस मारिया आणि राहुल बोस

रेटिंग - ४/५

Loading Comments