Advertisement

मैत्रीच्या धाग्याचा झालेला गुंता 'FU'


मैत्रीच्या धाग्याचा झालेला गुंता 'FU'
SHARES

'फ्रेंडशिप अनलिमिटेड' म्हणजेच 'FU' या सिनेमाच्या नावावरूनच आपल्याला समजतं हा सिनेमा मैत्री या नात्यावर भाष्य करणारा आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणांची ही कथा. तरुण वयात वाटणारं अट्रॅक्शन, प्रेम, मित्रासाठी केलेली मारामारी, कॉलेजमध्ये प्रिन्सिपलचा बसलेला ओरडा आणि त्यामुळे घरच्यांचा खाल्लेला मार, हे अगदी कॉलेजच्या दिवसात जे प्रत्येकाने अनुभवलंय ते सगळं या सिनेमात पाहायला मिळतं.
साहिल(आकाश ठोसर), गटल्या(सत्या मांजरेकर), मॅक (शुभम किरोडिअन), चिली (मयुरेश पेम), रेवती (वैदेही परशुरामी), तारा (संस्कृती बालगुडे) यांची ही कथा.

कॉलेजच्या थिएटरमध्ये मुलामुलींची नृत्य आणि नाटकाची प्रॅक्टिस सुरू आहे आणि ते बसवतोय साहिल! त्या दरम्यान तिथे रेवतीची एन्ट्री होते. साहिल आणि रेवती एकमेकांसमोर येतात. दोघांनाही खूप वर्षांनंतर भेटल्याचा आनंद होतो. इथून सुरू होते सिनेमाची कथा. ते खूप वर्षांनी भेटले आहेत आणि ते वेगळे कसे झाले हे दाखवण्यासाठी आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये हा सिनेमा घेऊन जातो.

कॉलेजमध्ये दंगा मस्ती करणारा या मुलांचा ग्रुप, ज्यात मॅक आणि तारा आधीपासूनच एकमेकांच्या प्रेमात आहेत. गटल्या त्याच्या प्रोफेसरवरच फिदा आहे. साहिल त्याच्या कॉलेजमध्ये नवीन आलेली मुलगी रेवतीच्या प्रेमात आहे. आणि जी मुलगी साहिलला आवडते, तीच त्यांच्या कॉलेजमधल्या अजून एका मुलाला आवडते. अशी टिपिकल गोष्ट या सिनेमात पाहायला मिळते. हे सर्व जण अगदी मोठ्या घरातली श्रीमंतांची मुलं. सगळं सुरळीत मजा मस्ती करत सुरू असताना साहिलला आवडत असणाऱ्या रेवतीला तो हे सांगू शकत नसतो आणि या गोष्टीचा फायदा त्याच्या कॉलेजमध्ये असणारा एक मुलगा उचलतो. आणि तिथेच साहिल आणि रेवतीच फिसकटतं.

दुसरीकडे मॅक ताराला दुसऱ्या मुलाबरोबर पाहतो आणि त्यामुळे तेही एकमेकांपासून दूर जातात. गटल्याला समजतं की त्याला जी प्रोफेसर आवडते ती त्याच्या कॉलेजमधल्याच सरांबरोबर नात्यामध्ये आहे, तेव्हा तोही कोसळतो. या सर्व परिस्थतीत ते सर्व मित्र एकमेकांना कशी साथ देत सावरतात ते या सिनेमात पाहायला मिळतं.

या सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्याला वाटत असेलही ती या मुलांचा रॉकबँड असेल. पण त्याचा सिनेमात काहीही संबंध नाही. तरीही या सिनेमात एकूण १० गाणी आहेत. गरज नसताना अगदी थोड्या थोड्या अंतरामध्ये विनाकारण गाणी रोवण्याचा प्रयत्न केलाय. तिथेच सिनेमा पुढे बघायचा कंटाळा येतो. जसजसा सिनेमा पुढे जातो, तसतशी सिनेमाची लिंक तुटत जाते. म्हणजे आता पाहिलेला सीन थोड्या वेळात विसरून गेल्यासारखं वाटतं. काही सीन सिनेमात का दाखवलेयत? असाच प्रश्न पडतो. आई वडील आपल्या मुलांना क्लासला पाठवण्यासाठी एवढे पैसे भरतात आणि ते पैसे कमावण्यासाठी वडिलांना करावी लागणारी धडपड, हा एवढा इमोशनल सीन पाहूनही आपल्याला हळवं होता येत नाही. कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांना त्या वयात लपून बघावेसे वाटणारे सिनेमे, त्याचं आकर्षण या विषयाला धरून एक सीन चित्रित करण्यात आला आहे. पण तोही मनाला भावत नाही. त्या वयात वाटणाऱ्या आकर्षणाला ही मुलं प्रेम समजतात. या गोष्टींवरही प्रकाश टाकण्यात आलाय. सिनेमात अगदी सीनचे तुकडे तुकडे जोडल्यासारखं वाटतं. काही सीन तर उगाच दाखवल्यासारखे आहेत, ज्याचा सिनेमावर कसलाही परिणाम होणार नाही. सिनेमात गाण्याच्या शब्दांना एकाही कलाकाराच्या ओठांची हालचाल जुळत नाही. म्हणजे गाण्याचे बोल वेगळेच आणि कलाकाराच्या ओठांची हालचाल वेगळीच! आणि हे एवढ्या प्रमाणात आहे, की बघणारा सहज ओळखतो. सिनेमातली गाणी खूप पॉश ठिकाणी भारताबाहेत शूट करण्यात आली आहेत. पण त्याचाही सिनेमावर काही फरक पडत नाही. एवढे कलाकार असतानाही एकही कलाकार आपल्या मनात जागा मिळवत नाही. म्हणजे अगदी आकाशही नाही. आकाशला उगाच एकदम डूड बनवण्याच्या नादात त्याला बोलायला दिलेले इंग्लिश शब्दही नीट उच्चरले गेलेले नाहीयेत आणि ते खूप सहजरित्या कळून येतं. 

सिनेमाच्या शेवटी या मित्रांमधला एक मित्र खूप प्रमाणत सिगारेट ओढल्यामुळे आजारी पडून मरतो, असं दाखवण्यात येतं. तेव्हा तर असं वाटून जातं की सिनेमात नक्की प्रेक्षकांना काय सांगण्याचा प्रयत्न केला गेलाय? काही काही गोष्टींचा संदर्भच लागत नाही. म्हणजे SYJCला शिकणाऱ्या मुलांना प्रोफेसर पट्टीने मारतेय. खूप मारामारी केली म्हणून त्या सर्वांना प्रिन्सिपल त्यांच्या घरच्यांना बोलवून आणायला सांगते. पण त्याचं पुढे काय होतं हे दाखवलंच नाही. १७ वर्षांच्या मुलाला त्याचे वडीलच त्याला बिअर प्यायला बसवतात, या गोष्टीची खरंच गरजं होती का? अशा बऱ्याच गोष्टी डोक्यात प्रश्न निर्माण करतात. आणि या सर्व गोंधळात सिनेमा सुरू कुठे झाला होता हेच आपण विसरतो.

एकंदरीत सिनेमात समजण्यापेक्षा गोंधळून आणि कंटाळवाणं वाटण्यासारखं बरंच आहे. कोणतीच गोष्ट सिनेमात लक्षात राहत नाही. सिनेमा कधी संपतोय याची वाट बघवीशी वाटते. महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमा असूनही सिनेमाचा विषय, सिनेमाची मांडणी, सिनेमातल्या कलाकारांची अॅक्टिंग, काहीच प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी होत नाही.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा