Advertisement

प्रत्येकानं पूर्ण करायलाच हवं असं 'रिंगण'!


प्रत्येकानं पूर्ण करायलाच हवं असं 'रिंगण'!
SHARES

राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट 'रिंगण' रिलीज झालाय. चौथी इयत्तेत शिकत असणारा अभिमन्यू मगर म्हणजेच आबडू आणि त्याचा बाप अर्जुन मगर म्हणजेच त्याचा अण्णा या बाप लेकाची ही कथा. आबडू लहान असतानाच त्याच्यावरचं आईचं छत्र हरवतं. पण अबडूला त्याची आई त्याला कायमची सोडून गेली आहे हे सांगण्याचा धीर त्याच्या वडिलांना होत नाही.  या दोघांनाही एकमेकांशिवाय जिवाभावाचं असं कोणीच नाही. पण आबडूला मात्र त्याची आई त्याला सापडणार आणि ती पुन्हा त्याच्याकडे येणार यावर विश्वास असतो.

बरीच वर्ष पडलेला दुष्काळ, पैशांची चणचण आणि त्यातच वाढत जाणारं सावकाराचं कर्ज या सगळ्यांमध्ये होणारी घुसमट त्यातून आत्महत्या करुन बाहेर पडणं हा एकच मार्ग अण्णाला दिसतो. पण जेव्हा जेव्हा त्याच्या मनात आत्महत्येचा विचार येतो, तेव्हा त्याला समोर आबडू दिसायला लागतो. आपण मेलो तर आबडूचं काय होणार? या काळजीने तो आत्महत्येचा विचार बदलतो. सावकार अण्णाला पन्नास हजार जमवून देण्यासाठी एका वर्षाची मुदत देतो. आपल्या ओळखीच्या लोकांकडे जाऊन पैशाची मदत मागायची आणि स्वतःची जमीन- घर सोडवायचं असं अण्णा ठरवतो आणि अबडूला घेऊन घराबाहेर पडतो. इथूनच सुरु होतो 'रिंगण'चा खरा प्रवास.



अण्णा आणि आबडू जिथे जिथे मदत मागायला जातात, तिथे तिथे त्यांच्या हाती निराशा पडते. पण तो खचत नाही. प्रवासात भेटलेला एक जण त्याला सांगतो 'पंढरपूरला जा, विठ्ठलाचं दर्शन घे, तो नक्की मार्ग दाखवेल'. सगळे प्रयत्न संपल्यावर अण्णा पंढरपूरला जायचं ठरवतो. या प्रवासात त्यांची सामानाची, मोटार सायकलची चोरी होते. अण्णा पूर्णपणे खचतो. आता पैसे कसे आणि कुठून आणायचे? या विचारात असतानाच त्याला एक छोटं काम मिळतं. आहे ते काम करायचं आणि कसंही करुन पन्नास हजार कमवून सावकाराला द्यायचे, असं अण्णा ठरवतो. 



त्याचदरम्यान त्याला समजतं कि त्याची गावची जमीन काही लोकं कटकारस्थान करुन हडप करतायत. सावकाराने दिलेली एका वर्षाच्या मुदतीची कागदपत्रही त्याच्याकडे नसल्याने आता कसा यातून मार्ग काढायचा या विचारात असतानाच आपण जिथे काम करतोय त्याच मालकाचे पैसे चोरायचे आणि गावाला पन्नास हजार घेऊन जायचे असं तो ठरवतो. पालखीच्या दिवशी तो गल्ल्यातले पन्नास हजार चोरतो आणि गावी पळून जायचं ठरवतो. पण तेव्हाच आबडूमुळे सर्व गोष्टी बदलतात. कथेला अनपेक्षित वळण मिळतं. आता त्यावेळी आबडू काय करतो? आणि या प्रवासाचा शेवट कसा होतो? हे पाहण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षच 'रिंगण' पाहावा लागेल.


या सिनेमात अण्णाच्या भूमिकेत दिसणारे शशांक शेंडे आणि अबडूच्या भुकेच्या दिसणारा साहिल जोशी या दोघांनीही त्यांच्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिलाय. बाप आणि लेकाच्या नात्याचं सुंदर चित्रण या सिनेमात पाहायला मिळतं. शेतकऱ्यांचं दुःख, कर्जाचा डोंगर आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्या करण्यापलीकडचा मार्ग या सिनेमात उत्तम प्रकारे मांडलाय. 


शशांक शेंडेने साकारलेला बाप प्रत्येकाला आपल्या बापाची आठवण करुन देईल. स्वतःवर कितीही संकटं आली, तरी आपल्या पोटच्या पोराला त्याची झळ लागू न देणारा बाप मनात एक वेगळीच जागा निर्माण करतो. साहिल जोशीबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. निरागस चेहरा, खरा वाटणारा अभिनय यात साहिल प्रेक्षकांकडून १०० पैकी १०० गुण मिळवणार यात शंका नाही. साहिलने याआधी कधी अभिनय केला नाही यावर विश्वास बसत नाही. आपल्या आईला शोधण्याची त्याची धडपड पाहताना ते निरागस पोर मन जिंकून घेतं. 



या बाप-लेकाचे काही प्रसंग पाहताना तर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहात नाही. हा सिनेमा हसवतो, रडवतो आणि या सगळ्यातून एक महत्त्वाचा संदेशही देऊन जातो. 'चमत्कार घडत नाहीत, ते आपण घडवायचे असतात', यावर विश्वास ठेवायला हा सिनेमा भाग पडतो. सिनेमा संपल्यानंतरही हा सिनेमा, त्यातील बाप-लेकाची जोडी मनातून आणि डोक्यातून बराच वेळ जात नाही. यातच सिनेमाचं यश लक्षात येतं. सिनेमातली 'देव पहिला' आणि 'विठ्ठला' ही दोन्ही गाणी उत्तम जमली आहेत. 



बाप-लेकाची सुंदर कथा,  सुटसुटीत मांडणी, साधा आणि खरा वाटणारा अभिनय, या सगळ्या गोष्टींनी रंगलेला मकरंद माने दिग्दर्शित आणि सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाच्या राष्ट्रीय पुरस्काराबरोबरच इतरही अनेक मानाचे पुरस्कार मिळवलेला हा सिनेमा एकदा तरी नक्की पहावा असाच आहे!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा