Advertisement

रहस्यमय कथेतून सामाजिक संदेश देणारा 'लपाछपी'


रहस्यमय कथेतून सामाजिक संदेश देणारा 'लपाछपी'
SHARES

मराठी भाषेत गूढ आणि रहस्यमय चित्रपटांचं प्रमाण  हिंदीच्या तुलनेत कमी आहे. काही महिन्यांपूर्वी 'कनिका' नावाचा मराठी गूढ सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण प्रेक्षकांवर तो आपली छाप पाडू शकला नाही. आता त्या नंतर बऱ्याच महिन्यांनी 'लपाछपी' हा सिनेमा प्रदर्शित झालाय. सिनेमाची सुरुवातच काहीतरी गूढ पाहायला मिळणार याची जाणीव करून देते. तुषार आणि नेहा लग्न झालेलं जोडपं. नेहा आठ महिन्यांची गरोदर. घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकत नाही म्हणून कर्ज देणारी व्यक्ती काही गुंडांकरवी तुषारला मारहाण करते. स्वतःच्या जीवावर बेतलेल्या संकटाची झळ पत्नी, नेहापर्यंत येऊ नये म्हणून तुषार तिला स्वतःच्या अतिशय विश्वासातल्या वाहनचालक भाऊरावच्या गावी घेऊन येतो. भाऊऱावच्या गावातल्या घरातूनच सुरू होतो 'लपाछपी'चा खेळ.

 भाऊराव आणि त्याची पत्नी तुळसाबाईसोबत नेहा आणि तुषार त्या घरात वास्तव्याला सुरुवात करतात. काही दिवसांनी तीन मुलं दिसणं, एक विशिष्ट गाणं ऐकू येणं असे विचित्र भास नेहाला व्हायला लागतात. ही केवळ सुरुवात असल्याची जाणीव तुळसाबाई नेहाला करून देते. दिसणाऱ्या मुलांसोबत बोलायचं नाही, त्यांच्यापाठोपाठ जायचं नाही अशा सल्ल्यांची यादी तुळसाबाई नेहासमोर ठेवते. नेहा आपल्या म्हणणं गांभिर्यांने घेत नाही, हे लक्षात आल्यानंतर तुळसाबाई तिला जे सांगते ते कोणत्याही साध्यासरळ व्यक्तीला हादरवून टाकण्यासाठी पुरेसं आहे. तुळसाबाईच्या म्हणण्यानुसार तिची जाऊ कावेरीने तुळसाबाईच्या तीन मुलांना आईपासून दूर नेलं. स्वतःच्या नवऱ्याला म्हणजे तुळसाबाईच्या दीराला जीवे मारलं. रक्त गोठवणारं आणखी एक क्रौर्य हे की, गरोदर कावेरीने स्वतःच्या आठ महिन्याच्या गर्भाला अघोरी पद्धतीने संपवलं आणि स्वतःचाही जीव घेतला . कावेरीच्या मृत्यूनंतर तुळसाबाईची तिन्ही मुलं विहीरीत बुडून मृत्यूमुखी पडली. हे गंडांतर तेवढ्यावरच टळलं नाही. तुळसाबाईच्या म्हणण्यानुसार, या घटनेनंतर त्या घरात प्रत्येक स्त्री अपत्यहीन राहिली. कावेरीचा आत्मा त्या घरातल्या मुलांचा जीव घेतो, या भीतीने तुळसाबाईनेही स्वतःच्या सुनेला मुलबाळ होऊ दिलं नाही. गरोदर नेहाचं होणारं अपत्यही सुरक्षित नसल्याचं  तुळसाबाई सांगते. 


तुळसाबाईच्या तोंडून ही कहाणी ऐकल्यानंतर  तिला धीर देणाऱ्या नेहासमोर कालांतराने वेगळंच वास्तव येतं. आतापर्यंत प्रेमाने वागणाऱ्या तुळसाबाईचं खरं रुप भलतंच आहे, हे तिला जाणवतं. सतत होणाऱ्या भासामुळे ती हादरते. ती स्वतःच्या घरी परतण्यासाठी तुषारच्या मागे लकडा लावते. विचित्र बाब म्हणजे आताशा तुळसाबाईच्या वागण्याबोलण्यातही नकारात्मक बदल झालेला असतो. इथून  कथानक वेगळं वळण घेतं. एकापाठोपाठ एक अनपेक्षित घटना घडत जातात. त्यातून नेहा सावरते का? नेहाच्या बाळाचं काय होतं? तुषारचं काय होतं? तुळसाबाईचं खरं रुप कोणतं? कोण खेळतं नेहासोबत लपाछपी? तुळसाबाईने सांगितलेली कहाणी नक्की खरी आहे का? खरंच भुताटकी आहे की आणखी काही? या प्रश्नांची उत्तरं 'लपाछपी'त शोधावी लागतील. 


लपाछपीचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच चित्रपटाबद्दल उत्कंठा वाढली होती. अपेक्षेप्रमाणे कथानकात गूढरम्यता राखण्यात चित्रपट बऱ्यापैकी यशस्वी ठरलाय. रहस्यमय किंवा थरारपटांचं वैशिष्ट्य म्हणजे पार्श्वसंगीत. कथानकाला अनुरूप पार्श्वसंगीत ऐकायला मिळतं. अगदी उसाच्या मळ्यात ऐकू येणारा आवाजही खराखुरा वाटतो. चित्रपटातले बरेच प्रसंग प्रेक्षकांना खुर्ची घट्ट  पकडायला लावतात, यात चित्रपटाचं यश आहे. गतिमानता राखत पुढे काय होईल? याबद्दल उत्सुकता ताणण्यातही चित्रपट यशस्वी ठरतो. विशाल फुरिया या दिग्दर्शकाने आपल्या पहिल्या प्रयत्नात प्रभावी मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. पूजा सावंतला अतिशय ताकतीची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली आहे.लौकिकार्थाने चित्रपटाचा नायक असलेल्या विक्रम गायकवाडला चित्रपटात करण्यासारखं काहीच नाही. लपाछपीत लक्षणीय वाटते ती उषा नाईक यांनी साकारलेली तुळसाबाईची व्यक्तिरेखा. उषा नाईक यांनी तुळसाबाई अक्षरशः जिवंत केली आहे. चित्रपटात 'एक खेळ लपाछपीचा' हे एकमेव गाणं आहे. एक गाणं म्हणजे फक्त दोन ओळी. वातावरणातली भयावहता वाढवण्याच्या कामात पार्श्वभूमीवर ऐकू येणारं हेच गाणं महत्त्वाचं काम करतं. चित्रपट संपल्यानंतर हेच गाणं डोक्यात घुटमळत राहतं. आणखी एक गोष्ट. चित्रपटाचं लोकेशन.विशेषतः सिनेमात दिसणार घर आणि ऊसाचा मळा हे जणूू चित्रपटातीलच एक कलाकारच आहे असं वाटण्याइतका कथानकाशी एकरुप होतो. या लोकेशनसाठी दिग्दर्शकाला पैकीच्या पैकी मार्क.   


चित्रपटाच्या पूर्वार्धाच्या मानाने उत्तरार्ध रटाळ वाटतो. आतापर्यंत सामाजिक संदेश देणारे अनेक चित्रपट आपण पाहिले आहेत. पण भयपटाच्या वेष्टनात सामाजिक संदेश देण्याचा कथा-पटकथाकार विशाल कपूर, विशाल फुरियाचा प्रयत्न उल्लेखनीय म्हणायला हवा. अपवाद वगळता रहस्यमय चित्रपटाला 'रिपीट ऑडीयंस' फारसा नसतोच. लपाछपीला सुद्धा तो मिळण्याची शक्यता कमी आहे. पण किमान एकदा खेळावी अशी ही लपाछपी अवश्य आहे.  

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा