सिनिअर मिस्टर एशिया सिद्धांतच्या 'शिवा'चं संगीत प्रकाशित


सिनिअर मिस्टर एशिया सिद्धांतच्या 'शिवा'चं संगीत प्रकाशित
SHARES

आज मराठी चित्रपटसृष्टीत वर्षाकाठी शेकडाभर सिनेमे बनत आहेत. यंदा हा आकडा दीड शतकापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तर या चित्रपटांमधून नवनवीन चेहरेही प्रेक्षकांसमोर येत आहेत नि येणार आहेत. यापैकीच एक असलेल्या सिद्धांत मोरेची मुख्य भूमिका असलेल्या 'शिवा' या मराठी सिनेमाचं संगीत नुकतंच प्रकाशित करण्यात आलं आहे.


तरूण बाॅडीबिल्डरचं चित्रपटात पदार्पण


'शिवा' या सिनेमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आणि आकर्षण आहे सिनेमाचा नायक सिद्धांत. सिद्धांतने वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी जपान येथे 'सिनिअर मिस्टर एशिया' पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार पटकावणारा सिद्धांत भारतातील सर्वात तरूण बाॅडीबिल्डर असून त्याचं 'शिवा'द्वारे मराठी चित्रपटात पदार्पण होत आहे. या सिनेमाचा म्युझिक आणि ट्रेलर लॉंच सोहळा अनोख्या पद्धतीने पार पडला.


अनेकांची उपस्थिती


पत्रकारिता क्षेत्रातील वरिष्ठ मंडळी लोकमतचे संपादक विनायक पात्रुडकर आणि माझी सहेली मासिकाचे संपादक दीपक खेडकर, एसजीएस फिल्म्स्चे निर्माते व्ही. डी. शंकरन, डॉ. संजय मोरे आणि गणेश दारख, दिग्दर्शक विजय शिंदे, दमदार आणि कडक अंदाजात भेटीला येणारा शिवा म्हणजेच सिद्धांत मोरे, गीतकार बाबासाहेब सौदागर तसंच चित्रपटातील इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या 'शिवा' सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा संपन्न झाला.


एक से बढकर एक गाणी


संगीत दिग्दर्शक आदित्य बेडेकर आणि गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी सिनेमाला एकूण ५ गाणी दिली आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांचं 'प्रलय भयंकर...' हे मराठीत गायलेलं इन्स्पिरेशनल सॉंग ऐकण्याचा योग येणार आहे. गायक सागर फडके यांच्या दमदार आवाजातील 'खांद्याला खांदा लावून...' हे गाणं जोशपूर्ण आहे. रुपाली मोघे आणि सागर फडके यांच्या आवाजातील 'एन्जॉय करू...' हे झिंग चढवणारं आयटम सॉंग थिरकायला लावणारं आहे. महाराष्ट्राचा लाडका गायक स्वप्नील बांदोडकर याच्या सुमधुर आवाजात 'साजणी...' या मन मोहणारं आहे. जीवनात चालणारा ऊन सावलीचा खेळ गायक कृष्णा बोंगाने याने त्याच्या आर्त आवाजात नेमकेपणाने सादर केला आहे. त्याने गायलेल्या 'ऊन सावली...' या गाण्याचे बोल हे आयुष्यातील आव्हानात्मक परिस्थितीवर भाष्य करणारे आहेत.


चांगला प्रतिसाद मिळेल


प्रथमच रुपेरी पडद्यावर दिसणाऱ्या सिद्धांतने आपल्या पदार्पणाबाबत सांगताना इतर मुद्द्यांवरही प्रकाश टाकला. तो म्हणाला की, बॉडीबिल्डिंग क्षेत्रातील माझे आदर्श आर्नोल्ड, रॉक यांना पाहिलं तर बॉडीबिल्डिंग प्रमाणे सिनेक्षेत्रातील त्यांची कारकिर्दही यशस्वी आहे. त्यांना मिळालेलं चाहत्यांचं प्रेम माझ्यासारख्या नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरणारं आहे. सिनेमात काम करण्याचा पहिला वहिला अनुभव कायम स्मरणात राहण्याजोगा आहे. शिवा या सिनेमाला देखील असाच उदंड प्रतिसाद मिळेल ही आशा सिद्धांतने व्यक्त केली.


चार वर्षे मेहनत


६ फूट १ इंच उंची असलेल्या सिद्धांतने या सिनेमासाठी तब्बल चार वर्षे मेहनत घेतली आहे. यातील सर्व जीवघेणे स्टंट्स स्वतः केले आहेत. या सिनेमाची कथा सिद्धांतने साकारलेला शिवा आणि त्याच्या एकंदर प्रवासाची आहे. शिवाच्या वडिलांनी दिलेली शिकवण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आचरणात आणत त्याने उत्तम माणूस आणि योद्धा बनून केलेली वाटचाल सिनेमात आहे. सिद्धांतच्या जोडीला या सिनेमात तन्वी हेगडे, योगिता चव्हाण, मिलिंद गुणाजी, योगेश मेहेर, सुनील गोडबोले, प्रकाश धोत्रे, शोभना दांडगे, जीत मोरे, बाबासाहेब सौदागर आणि दक्षिणेतील सुपरस्टार ("आय" सिनेमा फेम) कामराज हे कलाकार आहेत.हेही वाचा - 

हार्दिक-के. एल राहुलच्या वादावर करण जोहरनं सोडलं मौन

नवाजुद्दीन-सान्याच्या 'फोटोग्राफ'चा फर्स्ट लुक!संबंधित विषय