सप्तसुरांनी बांधते देवीची पूजा - अनुराधा पौडवाल

अनुराधा पौडवाल यांच्या खार येथील दुमजली घरी खूप मोठं देवघर आहे. या देवघरात कालिकामातेची पाषाणाची मोठी मूर्ती आहे. या मुख्य मूर्तीसोबतच इतरही देवीदेवता व संतांच्या मूर्त्या व फोटो आहेत. या सर्वांची दररोज पूजाअर्चा केली जाते. पण नवरात्रोत्सवातील इथला आब काही औरच असतो.

SHARE

देशभरात नवरात्रोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. महाराष्ट्रात या सणाला एक वेगळंच महत्त्व आहे. घराघरात घटस्थापना करून मोठ्या भक्तीभावाने देवीची पूजा केली जाते. गायक-कलाकारांच्या दृष्टीनेही या सणाचं एक वेगळंच महत्त्व आहे. आपल्या सुमधूर गायनाने मंत्रमुग्ध करणाऱ्या तसंच मराठीचा झेंडा देश-विदेशातही फडकावणाऱ्या गायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या घरी हा उत्सव सहकुटुंब साजरा केला जातो.

अनुराधा पौडवाल यांच्या खार येथील दुमजली घरी खूप मोठं देवघर आहे. या देवघरात कालिकामातेची पाषाणाची मोठी मूर्ती आहे. या मुख्य मूर्तीसोबतच इतरही देवीदेवता व संतांच्या मूर्त्या व फोटो आहेत. या सर्वांची दररोज पूजाअर्चा केली जाते. पण नवरात्रोत्सवातील इथला आब काही औरच असतो. पौडवालांच्या घरी नवरात्र कशी साजरी केली जाते आणि आपल्या मनात नवरात्रोत्सवाबद्दल असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत खुद्द अनुराधा पौडवाल यांनी...

खूप मोलाचा संदेश

हा सण सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा आहे. मी एकत्रीत कुटुंबातील असल्याने हा सण कसा साजरा केला जाते हे मी माझ्या सासू-सासऱ्यांकडून शिकले आहे. घरातील मी थोरली सून असल्याने पूर्ण फॅमिलीला एकत्र आणून देवीचा सण साजरा करण्याची जबाबदारी माझ्याकडे असते. त्यामुळे सर्वांना एकत्र घेऊन मी देवीचा दहा दिवसांचा हा सण साजरा करते.


देवीच देते हा संदेश

बंगाली बांधवांच्या देवीचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर तिथे मुख्य देवीची मूर्ती, वरच्या बाजूला शंकर असतात. आजूबाजूला तिचं पूर्ण कुटुंब असतं. यातील प्रत्येकाचं वाहन परस्परविरोधी आहे. कुणाचं मूषक, तर कुणाचं नंदी, कुणाचं मोर, तर कुणाचं साप आहे. ही सर्व विरोधाभासी लक्षणं असली तरी देवी जेव्हा सशक्तपणे उभी ठाकते, तेव्हा कुणाचेही कितीही भिन्न स्वभाव असले तरी तुम्ही हार्मनीने एकत्र यायला हवं असं ती सूचित करते. मी नवरात्रीकडे या दृष्टिकोनातून पाहते.


४५ जणांची फॅमिली

आमची ४५ लोकांची भली मोठी फॅमिली आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र येऊन नवरात्र मोठ्या धुमधडाक्यात साजरी करतो. आज जरी सर्व वेगवेगळे सेटल झालेले असले तरी आजही आम्ही सर्व दहा दिवस एकाच घरात राहतो. मतभेद बाजूला सारून देवीच्या उत्सवाकरता सर्व एकोप्याने एकाच छताखाली नांदतो. एकत्र येतो तेव्हा मागचं सर्व विसरून जातो. नवरात्रीचा मुख्य उद्देश हाच आहे असं मला वाटतं.


घटस्थापना

आमच्याकडे घटावर नारळ ठेवला जात नाही, तर शहाळ्याच्या बाहेरील हिरवा भाग काढून तो घटावर ठेवला जातो. तिचा मळवट भरला जातो. दागदागिन्यांनी तिला सजवलं जातं. दरवर्षी आम्ही देवीसाठी एक नवीन दागिना करतो. सर्व अलंकार घातल्यानंतर खऱ्या अर्थाने तेज येतं आणि ती देवीच्या स्वरूपात विराजमान होते. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करतो. रोज सकाळ-संध्याकाळ पाऊण तास आरती केली जाते.


नेक्स्ट जनरेशन सज्ज

नवरात्रोत्सवाची तयारी आमची नेक्स्ट जनरेशन करते. त्यातील अष्टमीचा एक दिवस आम्ही त्यांना दिला आहे. त्या दिवशी सजावटीपासून खाण्याच्या मेन्यूपर्यंत सर्व जबाबदारी घरातील तरुण मंडळींची असते. सर्वजण यात उत्साहाने सहभागी होतात. अगदी माझी चार वर्षांची नातही यात हिरीरीने सहभागी होते. त्यांच्या मनात देवीबद्दलचा भक्तीभाव रुजावा ही यामागील भावना होती. आज हा हेतू साध्य झाला आहे.


तीच खरी पूजा 

‘आऊंगी आऊंगी मै अगले बरस फिर आऊंगी...’ हे माझं देवीचं महात्म्य वर्णन करणारं पहिलं गाणं होतं. मी जेव्हा गायला लागते तेव्हा तीच खरी देवीची पूजा असते. गाणं गात असताना मी तसं फीलसुद्धा करते. हे स्वर तिनेच दिलेले आहेत, पण माझ्या गळ्यातून येतात. त्यामुळे त्यात दिखावापणा नसतो. स्वर हे अंतर्मनातून आणि भावनेतूनच यायला हवेत आणि तीच खरी पूजा ठरते.


सिद्धकुंजीका स्तोत्र 

सिद्धकुंजीका स्तोत्र मी गायलं आहे. जे लोक सप्तशती रोज वाचू शकत नाहीत त्यांच्याकरता हे खूप चांगलं आहे. खूप शक्तीशाली मंत्र आहे. भाविकांपर्यंत सिद्धकुंजीका स्तोत्र पोहोचावं ही माझीच संकल्पना आहे. कारण मी रोज हे स्तोत्र वाचते. त्यामुळे संगीताच्या माध्यमातूनही लोकांपर्यंत पोहोचायला हवं असं वाटत होतं. दोन वर्षांपूर्वी हे स्तोत्र देवी भक्तांच्या सेवेत सादर केलं आहे.


नृत्य-संगीत देवीची रूपं

दांडीया किंवा गरबा म्हणजे संगीत-नृत्य ही देवीची रूपं आहेत. खरं तर हे नृत्य देवीचं जागरण करण्यासाठी केलं जातं. देवीला संगीत आणि नृत्य आवडत असल्याने ती कोणत्या ना कोणत्या रूपात तिथे वास करत असते अशी भावना त्यामागे आहे. आता त्याला कमर्शिअल रूप देऊन इव्हेन्ट बनवण्यात आलं ही वेगळी गोष्ट आहे.हेही वाचा -

#Metoo: आलोक नाथ अाणखी अडचणीत; संध्या मृदूल यांचाही गैरवर्तनाचा अारोप

Exclusive : वॅाचमन बनला नायक-दिग्दर्शक! 

संबंधित विषय
ताज्या बातम्या