Advertisement

Exclusive : वॅाचमन बनला नायक-दिग्दर्शक!

२६ आॅक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पाटील’ या चित्रपटासाठी संतोष मिजगर यांनी अतोनात कष्ट घेतले आहेत. ऐन उमेदीच्या काळात मिजगर यांनी पाहिलेलं चित्रपट बनवण्याचं स्वप्न साकार झालं आहे. मिजगर यांचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे.

Exclusive : वॅाचमन बनला नायक-दिग्दर्शक!
SHARES

जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर कोणतंही स्वप्नं साकार करता येऊ शकतं हे आजवर असंख्य यशस्वी व्यक्तींनी दाखवून दिलं आहे. चित्रपटसृष्टीतही याची बरीच उदाहरणं पाहायला मिळतात. शिखरावर पोहोचण्याचं स्वप्न सर्वच पाहतात, पण जे स्वप्नांना मेहनतीची साथ देतात तेच यशस्वी होतात. एखाद्या इमारतीचा वॅाचमनही चित्रपटाचा नायक होऊ शकतो हे जर कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही, पण ‘पाटील - ध्यास स्वप्नांचा’ या आगामी मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक-अभिनेता संतोष मिजगर याचं मूर्तिमंत उदाहरण आहेत.



दिग्दर्शनासह भूमिका

२६ आॅक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘पाटील’ या चित्रपटासाठी संतोष मिजगर यांनी अतोनात कष्ट घेतले आहेत. ऐन उमेदीच्या काळात मिजगर यांनी पाहिलेलं चित्रपट बनवण्याचं स्वप्न साकार झालं आहे. मिजगर यांचा प्रवास अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे. दिग्दर्शनासोबतच त्यांनी या चित्रपटात त्यांनी शीर्षक भूमिकाही साकारली आहे. ‘पाटील’च्या निमित्ताने ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझीव्ह संवाद साधताना मिजगर यांनी मागे वळून पाहत भूतकाळातील आपल्या जीवनावर दृष्टिक्षेप टाकला आणि या चित्रपटाबाबतही सांगितलं.

खेडेगावातील बालपण

नांदेडमधील नेवरवाडी या गावामध्ये बालपण गेलं. तिथंच या चित्रपटाचं चित्रीकरणही केलं आहे. बालपणापासूनच चित्रपट पाहण्याचा छंद होता. या छंदाचा परिणाम शिक्षणावर मात्र होऊ दिला नाही. फळ्यावरही चित्रपटच दिसायचा. मनात चित्रपटाचा छंद आणि डोक्यात शिक्षणाचे विचार जागृत ठेवून आयटीआय केलं. 


आई-वडिलांची इच्छा

वडील शेतकरी असले तरी शिक्षक आणि गावचे सरपंच असल्याने त्यांनी शिक्षणाचं महत्त्व मनावर कोरलेलं होतं. त्यामुळे चित्रपटाचा छंद कधी शिक्षणावर भारी पडू दिला नाही. ग्रॅज्युएशन केल्यावर मी सरकारी नोकरी करावी अशी आई-वडिलांची इच्छा होती. अशातच मला देहरादूनला मारुतीमध्ये नोकरी लागली. तिथे गेलो, पण मन रमत नसल्याने मुंबईत आलो.


वॅाचमन ते नायक

मुंबईत आल्यावर आई-वडिलांकडे पैसे मागायचे नाही असा ठाम निश्चय केला. त्यामुळे सुरुवातीला अंधेरीतील लोखंडवालामधील एका इमारतीत वॅाचमनची नोकरी केली. व्हिडीओ पार्लरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचा छंद जोपासत होतोच. मला कोणत्याही परिस्थितीत मुंबईत टिकून राहायचं होतं. त्यासाठी कुरीयरमध्येही काम केलं. एका मित्राचं हॅाटेलही सांभाळलं. ज्या इमारतीत वॅाचमन होतो तिथंच आज माझं आॅफिस आहे.


फिल्मसिटीत गेलो पण...

गप्प बसून जमणार नाही, काहीतरी करायचंच या निर्धाराने एक दिवस फिल्मसिटीमध्ये पोहोचलो.  पण मला आत प्रवेश दिला गेला नाही. निराश झालो नाही. असा एक दिवस उजाडेल ज्या दिवशी या फिल्मसिटीमध्ये येणारा प्रत्येक माणूस माझ्या दारातूनच जाईल असा निश्चय केला. आज फिल्मसिटीच्या गेटवरच माझं अॅाफिस आहे. अनुभवातून शिकत गेलो.


सुरुवातीला असिस्टंट

दिग्दर्शक बनायचं असल्याने दिग्दर्शक पितांबर काळे यांच्याकडे ‘लग्नाचा धुमधडाका’ या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्याच जोडीला बालाजी टेलिफिल्म्समध्येही काम केलं. हे करत असताना दिग्दर्शक बनणं इतकं सोपं नसल्याची जाणीव झाली. त्यामुळे इतरही व्यवसाय करत राहिलो. ट्रॅव्हल्सचा व्यवसाय केला. इव्हेन्ट मॅनेजमेंट सुरू केलं. परदेशातही बरेच कार्यक्रम केले. यातून पैसे उभे केले.


आई-वडील की प्रेम?

चित्रपट बनवण्याचा निर्धार पक्का असल्याने प्रथम कथा लिहिली. आई-वडील आपल्या मुलांसाठी जी स्वप्नं पाहतात, ती पूर्ण करणं मुलांचं कर्तव्य असतं. मुलंही त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी धडपडतात, पण जेव्हा प्रश्न प्रेमाचा येतो, तेव्हा आई-वडील की प्रेम? हा पेच त्यांच्यासमोर उभा राहतो. अशा प्रसंगी काय करायला हवं ते या चित्रपटात पहायला मिळेल. जीवापेक्षाही जास्त मोलाच्या असणाऱ्या बऱ्याच मित्रांच्या मदतीमुळे हा चित्रपट पूर्ण करू शकलो.


हा ‘पाटील’ वेगळा

चित्रपटांमध्ये बऱ्याचदा पाटील खलनायक दाखवण्यात आला आहे. पाटीलकी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली देणगी आहे. हा पाटील त्या तत्त्वांनुसार वागणारा आहे. अडीअडचणीला मदतीला धावणारा आहे. याला प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. आपल्या मुलांच्या भावनाही समजून घेणारा आहे. यात शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे एस. आर. एम. एलियन, यश आदी कलाकारांसोबत डॉ. जगदीश पाटील (कोकण आयुक्त), झी टीव्हीचे सुभाष चंद्र गोएंका दिसणार आहेत.



हेही वाचा -

सलीम-सुलेमानचा मराठी चित्रपटसृष्टीतील ‘प्रवास’ सुरू

‘वी आर प्रेग्नंट’ म्हणत परतली सुपरहिट जोडी!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा