Advertisement

'काळी माती'मध्ये बैल पोळयाचं गाणं...


'काळी माती'मध्ये बैल पोळयाचं गाणं...
SHARES

सुमधूर गीत-संगीतानं सजलेल्या सिनेमांतील कथा पहायला प्रेक्षकांना खूप आवडतं. ३९९ पुरस्कार पटकावत विश्वविक्रम करणाऱ्या 'काळी माती' या आगामी मराठी चित्रपटात एका शेतकऱ्याची कथा पहायला मिळणार आहे. दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांनी या चित्रपटात ज्ञानेश्वर बोडके या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा सादर केली आहे. शेतकरी आणि बैलांचं नातं अतूट असतं. हाच धागा पकडून हेमंतकुमार यांनी या चित्रपटात बैल पोळ्याचं गाणं सादर करण्यात आलं आहे. आजवर कोणत्याही मराठी चित्रपटात बैल पोळ्यावर आधारित गाणं पहायला मिळालं नसल्यानं 'काळी माती' या चित्रपटाचं हे एक नावीन्य आहे.


भारत, सिंगापूर, मलेशिया, फ्रान्स, युरोप, लंडन, अमेरिका आदी जगभरातील फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या 'काळी माती'च्या दिग्दर्शनासोबत निर्मितीची धुराही हेमंतकुमार यांनीच सांभाळली आहे. या चित्रपटामध्ये ओमप्रकाश शिंदे, एतशा संझगिरी, दीक्षा भोर, भगवान पाचोरे, पूनम पाटील, पी. के. वाघमारे आदींच्या भूमिका आहेत. यात ओमप्रकाशनं ज्ञानेश्वर बोडकेंची भूमिका साकारली आहे. गीतकार कल्याण उगळे यांनी बैल पोळा गीत लिहिलं असून, अविनाश-विश्वजीत या संगीतकार जोडीनं त्यावर स्वरसाज चढवला आहे. डॅा. गौरी कवी आणि प्रियांका मित्रा यांनी हे गाणं गायलं आहे. पुण्याजवळ असलेल्या खेडमध्ये हे गाणं शूट करण्यात आलं आहे. 'सण आला बैल पोळ्याचा...' हे या गाण्याचे बोल आहेत. क्लासिकल, लोकनृत्य, लावणी आणि लेझीम यांची सांगड घालण्यात आली आहे. यासाठी मोठी रांगोळी काढण्यात आलेली असून, संपूर्ण परिसर पताकांनी सजवण्यात आला आहे. कोरिओग्राफर लॉलीपॉप यांनी या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे.

'काळी माती' या चित्रपटातील बैल पोळ्याच्या गाण्याच्या प्रसंगासोबतच एकूणच या गाण्याबाबत हेमंतकुमार म्हणाले की, या चित्रपटात बैल पोळ्याच्या सणाच्या निमित्तानं सर्व गावकरी एकत्र येतात आणि बैलांची पूजा केली जाते. बैलांना खाऊ घातलं जातं. त्यानंतर छान पारंपरीक नृत्य केलं जातं. लावणी नृत्यासारखाच हा प्रकार ग्रुपमध्ये सादर केला जातो. या गाण्यात बरेच गावकरी व बैलही आहेत. अशा पद्धतीचं बैल पोळा या सणावरील गाणं आजवर कोणत्याही चित्रपटात आलेलं नाही. 'काळी माती' या चित्रपटाचा विषय शेतकरी असून, बैल हा शेतकऱ्याचा खरा साथीदार आहे. शेतकरी आणि बैल हे दोन अविभाज्य घटक आहेत. बैल पोळा या एकाच सणाला बळीराजा बैलाची पूजा करतो. जो बैल पूर्ण वर्षभर सतत काम करतो, त्याला एक दिवस विश्रांती दिली जाते, त्याला सजवलं जातं, त्याचा सन्मान केला जातो, पूजा केली जाते. हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या चित्रपटाचा गाभा शेतकरी असल्यानं बैल पोळ्याचा प्रसंग डोळ्यांसमोर ठेवून हे गाणं तयार करण्यात आलं. या गाण्याचं चित्रीकरणही खूप छान पद्धतीनं करण्यात आलं आहे.

चित्रपटाची पटकथा मयूर आडकरनं लिहीली असून, संवाद अनिल राऊत आणि हेमंतकुमार महाले यांचे यांचे आहेत. डीओपी सुरेश सुवर्णा आणि राजा फडतरे यांनी आपल्या जाणकार नजरेतून या चित्रपटाचं छायालेखन केलं आहे. संकलन सुभीराज यांनी केलं आहे. 'काळी माती' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा