Advertisement

'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी


'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी
SHARES

उमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा कोणती अभिनेत्री घेणार? याकडे बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. आता प्रेक्षकांची ही उत्कंठा संपणार आहे. कारण, नाट्यरसिकांकडून अनेक तर्कवितर्क केल्या जाणाऱ्या या भूमिकेसाठी, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचं नाव निश्चित झालं आहे.


स्वानंदीच्या नावाची अधिकृत घोषणा

विलेपार्ले येथील दिनानाथ नाट्यगृहात नुकत्याच पार पडलेल्या या नाटकाच्या २७५ व्या प्रयोगानंतर उमेश-स्पृहाद्वारे करण्यात आलेल्या फेसबुक लाईव्हमधून स्वानंदीच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात या नाटकामधून स्पृहाऐवजी स्वानंदी उमेशबरोबर रंगभूमी शेअर करताना दिसून येणार आहे.


काय म्हणाली स्पृहा?

चांगलं बुकिंग घेत असलेल्या खूप कमी मराठी नाटकांमधील एक असणाऱ्या या नाटकातील नव्या प्रणोतीबद्दल बोलताना स्पृहाने अशी माहिती दिली की, 'या नाटकाचा २७५ वा प्रयोग हा माझा शेवटचा प्रयोग असून, यापुढे स्वानंदी टिकेकर माझी भूमिका करताना तुम्हाला दिसेल. माझ्या काही प्रोफेशनल कमिटमेंटमुळे मला हे नाटक सोडावं लागत आहे. पण, हे नाटक आजच्या काळाचं महत्वाचं नाटक आहे. या नाटकाचा विषय खूप महत्त्वाचा असल्यामुळे, माझ्या नसण्याने एक चांगला विषय बंद होणं योग्य नाही. त्यामुळे या नाटकाच्या पुढील प्रवासात माझ्या जागेवर स्वानंदी टिकेकर हा नवा चेहरा तुमच्यासमोर येणार आहे. माझ्या भूमिकेवर जसे भरभरून प्रेम केले अगदी तसेच प्रेम तुम्ही स्वानंदीवर देखील कराल, अशी मी आशा करते'.


'डोण्ट वरी बी हॅप्पी' नाटकातील या महत्वपूर्ण बदलाबद्दल उमेश म्हणतो 'स्पृहा एक मेहनती अभिनेत्री असून, तिच्यासोबतचा पार केलेला या नाटकाचा दीर्घ प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय आहे'. शिवाय प्रणोतीच्या भूमिकेतील स्वानंदी हुशार आणि कुशल अभिनेत्री असून, तिच्यासोबत काम करायला आपण खूप उत्सुक असल्याचं'ही त्यानं सांगितलं.

पती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने मराठी रंगभूमीवर यशस्वी कामगिरी केली आहे. अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकातील उमेश- स्पृहाची जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये हिट ठरली होती. त्यामुळे स्पृहाने गाजवलेल्या या भूमिकेला न्याय देण्याचं आव्हान स्वानंदीवर असणार आहे.


प्रणोतीची भूमिका चॅलेंजिंग

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना स्वानंदी म्हणते, 'प्रणोतीची भूमिका माझ्यासाठी खूप चॅलेन्जिंग जरी असली तरी, नाटकाच्या संपूर्ण टीमकडून मिळत असलेल्या प्रोत्साहनामुळे मला या भूमिकेसाठी कोणत्याही प्रकारचं दडपण आलं नाही. उलट मी या भूमिकेचा आनंदच अधिक लुटत आहे. माझं एवढंच उद्दिष्ट असेल की, या नाटकाची स्क्रिप्ट आणि पटकथेला मी योग्य न्याय देऊ शकेन. उमेश आणि स्पृहा अभिनयाच्या बाबतीत कमालीचं असून, हे दोघेही मला खूप प्रिय आहेत. त्यामुळे या दोघांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मला कायम राखायचा आहे.'

'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातून लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या स्वानंदीने यापूर्वीच आपल्या अभिनय कौशल्याद्वारे प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. शिवाय सुमित राघवनसोबत '१०३' या नाटकाद्वारे तिने रंगभूमीदेखील गाजवली असल्याकारणामुळे, स्वानंदी नाट्यरसिकांना आपल्या अभिनयाद्वारे 'डोण्ट वरी बी हॅप्पी' ठेवण्यास नक्कीच यश मिळवेल अशी आशा आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा