Advertisement

'स्वरमानस'ची १५ वर्षांची सुरेल वाटचाल


SHARES

शब्द आणि सुरांच्या अद्वितीय गुंफणीतून गीतांची तेजोमयी मालिका प्रज्वलित होत स्वरांचा उत्कट आविष्कार शुक्रवारी रसिकांनी अनुभवला. अाबालवृद्धांनी सुरेल मैफल सजवली. शिवाजी पार्क परिसरातल्या सावरकर सभागृहात सजलेल्या या अद्भुत स्वरमैफलीमध्ये रसिकजन दंगून गेले.

निमित्त होतं- स्वरांची मैफल सजवणाऱ्या 'स्वरमानस'च्या दीड दशकांच्या सुरेल प्रवासपूर्तीचं. चिमुकल्यांचं बोट धरून सुरू झालेला हा प्रवास. प्रवास निखळ आनंदाचा. प्रवास आत्मानंदाचा. या प्रवासात बच्चे कंपनींला साथ मिळाली ती ताई, आई, मावशी आणि आजींची. यासर्वांच्या सुरात सूर मिसळाच्या कामात पुरुष मंडळी तरी कशी आणि का मागे राहतील? हसत-खेळत 'स्वरमानस'नं १५ वर्षांचा पल्ला गाठला. मानसी केळकर तांबे यांच्या अथक परिश्रमाचं फलित म्हणजे 'स्वरमानस'. सामाजिक भान जपणारी अशीही 'स्वरमानस'ची ओळख. कमला मेहता स्कूल फॉर अ ब्लाइंड यांच्याशी 'स्वरमानस'चं नातं काहीसं असंच. एवढंच नाही तर, शिबिरं, शिक्षक प्रशिक्षण वर्ग असे अनेक उपक्रम मानसी केळकर-तांबे यांनी राबवले आहेत.

१५ वर्षांचा हा प्रवास खूप चांगला होता. लहान मुलांपासून या प्रवासाला सुरुवात केली होती. आता माझी टीम खूप मोठी झाली आहे. यात युवकांपासून वृद्धांपर्यंत सर्वच सहभागी झाले आहेत. दोन दिवसांत मी गाण्याची इनसाइड देते. याशिवाय आम्ही एक्सप्रेशन, व्हॉईस मॉड्युलेशन, परफॉर्मन्स, कॉन्फिडन्स आणि ब्रिदींग टेक्निक आम्ही शिकवतो. संगीत ही खूप चांगली थेरपी आहे. गाणं शिकलं तर तुमचे विचार सकारात्मक होऊ शकतात.

-मानसी केळकर-तांबे, संचालिका


रांगोळी आणि मेंदीमध्ये डिझाइन असतं. पण मानसीच्या क्लासमध्ये येऊन मला कळलं की, संगीतातही डिझाइन असतं. इतक्या सुंदर पद्धतीनं ती गाणं डिझाइन करून शिकवते. त्यामुळे संगीताचं ज्ञान नसणाऱ्या माणसालाही गाणं सहज समजतं. गाणं गाताना तुमच्या चेहऱ्यावर नेहमी नेहमी स्मितहास्य असावं. तसंच गाणं गाताना योग्य हावभाव हवेत, हे मानसी नेहमी शिकवते. नवनव्या घेऊन तिने 'स्वरमानस' सुरू केले आहे.

भक्ती कुलकर्णी, विद्यार्थिनी

मानसी केळकर तांबे यांच्या १५ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर 'स्वरमानस'ची शुक्रवारी वेबसाईट लाँच करण्यात आली. आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, अंकुश चौधरी, पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी, केदार शिंदे आणि अनेक मान्यवर या सांगितिक कार्यक्रमाला उपस्थित होते.

गाण्याशी माझा खूप जुना संबंध आहे. कारण मी सर्वात खूप बेसुरा गातो. 'महाराष्ट्राची लोकधारा'मध्ये मी डांस करायचो. बाबा जेव्हा गायचे तेव्हा मी, केदार, भरत, संतोष आम्ही मागे कोरस करायचो. मला फक्त लीप मुव्हमेंट करायला लागायची. मी तंद्रीत गायला लागलो की, बाबा माझ्याकडे तशाच तंद्रीत बघायचे. त्यांना कळायचं की, एकच मुलगा बेसुरा गातो तो म्हणजे मी. निदान माझ्या मुलानं सुरात गावं यासाठी मी त्याला 'स्वरमानस'मध्ये पाठवलं.

-अंकुश चौधरी, अभिनेता

पार्श्वगायिका साधना सरगम यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला चार चाँद लागले. 'मुंबई लाइव्ह'ने या सुरेल कार्यक्रमाच्या माध्यम सहयोग्याची भूमिका निभावली. संस्थेच्या संचालिका मनिषा सबनीस या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिल्या.

"मानसी स्वत: चांगलं गाते. ती अभिनय आणि नृत्यही शिकली आहे. ती खूप टॅलेंटेड आहे. मानसी जे करतेय ते खूप चांगलं, खूप वेगळं आहे. आपण गाणं ऐकतो, गातो. का? तर आनंद मिळावा, यासाठी. 'स्वरमानस'मुळे हाच आनंद ती सर्वांना देत आहे. फक्त पंधरा नाही तर अनेक वर्ष 'स्वरमानस'नं सर्वांना आनंद देत रहावं, हीच माझी इच्छा आहे."


- साधना सरगम, पार्श्वगायिका

दीडज दशकांचा सुरेल टप्पा ओलांडणा-या 'स्वरमानस'ला आता नवी ध्येयं खुणावत आहेत. येत्या काही वर्षांत अधिकाधिक चांगले सांगितिक उपक्रम घेऊन 'स्वरमानस'ची टीम रसिकजनांच्या भेटीला येत राहणार आहे. 'स्वरमानस'चा सुरेल प्रवास असाच दिमाखात सुरू राहणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा