Advertisement

समुद्राखालचा रोमांचक थरार


समुद्राखालचा रोमांचक थरार
SHARES

हिंदी चित्रपटांना युद्धपट हा जॉनर काही नवा नाही. स्वातंत्र्योत्तर काळापासून ते आतापर्यंत आपण युद्धपट पाहत आलो आहोत. या युद्धपटांमध्ये प्रामुख्याने अवकाशातल्या आणि जमिनीवरच्या लढाईला महत्त्व देण्यात आलं होतं. परंतु, युद्धामध्ये जमिनीखालच्या लढाईलाही खूप महत्त्व असतं. कारण इथं नुसती ताकद कामाची नसते, तर इथलं युद्ध हे प्रामुख्यानं डोक्यानं खेळलं जातं. अशीच एक लढाई 1971 मध्ये भारत-पाकिस्तानमध्ये लढली गेली होती. बऱ्यापैकी अज्ञात राहिलेली ही लढाई आता द गाझी अटॅक या नावानं रुपेरी पडद्यावर आली आहे. संकल्प रेड्डी या नव्या दमाच्या दिग्दर्शकानं हे अवघड शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला असून त्यात तो बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. प्रेक्षकांच्या दृष्टीनं पूर्णतः नवीन असणारं समुद्राखालच्या लढाईचं विश्व या चित्रपटातून पाहायला मिळतं. लेखन, दिग्दर्शन, तंत्र आणि कलावंतांच्या अभिनयाच्या जोरावर हे विश्व पाहणं हा सुखद धक्का आहे.
चित्रपटाची गोष्ट अगदी सहजसोपी म्हणावी लागेल. 1971 च्या नोव्हेंबरमध्ये पाकिस्ताननं बंगालच्या उपसागरात बांगलादेशाच्या दिशेनं गाझी नावाची एक पाणबुडी सोडली. विशाखापट्टणम हे या पाणबुडीचं टार्गेट होतं. या पाणबुडीची चाहूल लागल्यामुळे तिला तोंड देण्यासाठी भारतीय नौदलातर्फे तीन अधिकाऱ्यांची एक टीम बनविण्यात येते. लेफ्टनंट कमांडर अर्जुन वर्मा (राणा डग्गूबाती), कॅप्टन रणविजय सिंग (के. के. मेनन) आणि एक्झिक्युटिव्ह ऑफिसर देवराज (अतुल कुलकर्णी) या तीन अधिकाऱ्यांचा त्यात समावेश असतो. हे तिघेही अधिकारी आपल्या टीमसह आयएनएस विक्रांतद्वारे गाझीच्या शोधमोहिमेवर निघतात. या मोहिमेची थरारक कहाणी म्हणजे हा चित्रपट आहे.
संकल्प रेड्डी यांनीच हा चित्रपट लिहिला असून, तो दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट कठीण असण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याची पार्श्वभूमी. आजवरचे सर्व युद्धपट हे मैदानावर किंवा हवेत लढले गेले होते. चित्रपटाच्या दृष्टीनं हवा असलेला सर्व थरार अशाप्रकारच्या युद्धात सहजगत्या उपलब्ध होता. पाण्याखालची लढाई ही डोक्यानं खेळली जाते. मात्र हुशारीची लढाई पडद्यावर चितारणं ही नेहमीच अवघड गोष्ट असते. मात्र उत्तम पटकथा, मोजकेच संवाद, नेटके दिग्दर्शन आणि कलावंतांच्या अभिनयाच्या जोरावर संकल्प रेड्डी यांनी बाजी मारली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन यांच्या व्हॉईसओव्हरद्वारे दिग्दर्शकानं विषयाला थेट हात घातला आहे. संपूर्ण चित्रपटभर कुठेही फापटपसारा जाणवत नाही, हे या चित्रपटाचं आणखी एक बलस्थान आहे. गाझी युद्धनौकेचा शोध घेण्यासाठी आयएनएस विक्रांतवरील घटनाक्रम चित्तवर्धक आहे. मुळात नौदल आणि पाणबुडीच्या कामकाजाची आपणास फारशी माहिती नसते. त्यामुळे इथला सगळा घटनाक्रम प्रेक्षकासाठी पूर्णतः नवीन आणि रंजक आहे. विक्रांतवरील तीन अधिकाऱ्यांचे डावपेच, त्यांच्यातील मतभिन्नता आणि त्यावर मात करीत त्यांनी साधलेलं लक्ष्य हा छान जमलेला प्रवास आहे. नाही म्हणायला काही त्रुटी या चित्रपटात नक्कीच आहेत. पाणबुडीचा अंतर्गत भाग आणि काळोखाखाली बुडालेल्या समुद्रामुळे दृश्यात्मक पातळीवर हा चित्रपट फार काही मनाला भिडत नाही. तसेच व्हीएफएक्सची दृश्यंही म्हणावी तेवढी ताकदीनं घेतलेली नाहीत. कलावंतांमध्ये राणा डग्गूबाती, के. के. मेनन आणि अतुल कुलकर्णी या तिघांनीही आपापल्या भूमिका ठाशीव करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. या तिघांमधील अभिनयाची झुंज पाहणं हीदेखील एक आनंदाची गोष्ट आहे. तापसी पन्नू आणि ओम पुरी यांच्या व्यक्तिरेखा अगदीच लहान आहेत. चित्रपटाचा तांत्रिक दर्जा चांगला आहे. गाण्यांना वाव नसल्यामुळे चित्रपटात एकही गाणं टाकलेलं नाही ही चांगली गोष्ट आहे. चित्रपटाचं पार्श्वसंगीत लक्षात राहणारं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा