Advertisement

अमराठी संगीतकारांचा मराठी बाणा


अमराठी संगीतकारांचा मराठी बाणा
SHARES

कलेला भाषा नसते हे खरं आहे. संगिताच्या बाबतीतही हा निमय लागू पडतो. त्यामुळंच भाषेचा काहीही संबंध नसतानाही बरेच गायक-संगीतकार समजत नसलेल्या भाषेतही आपल्या गायनाची जादू दाखवतात. ट्राॅय-आरीफ ही तरुण संगीतकार जोडीही याला अपवाद नाही. मराठी भाषेचा जराही गंध नसताना दोघांनीही मराठी संगीतप्रेमींवर मोहिनी घातली आहे.

‘मुंबई लाइव्ह’शी खास बातचित करताना ट्राॅय-आरीफने आपल्या आजवरच्या प्रवासासोबतच मराठी सिनेसृष्टीशी आलेला संबंध आणि त्यामुळे मिळालेला मान-सन्मान याबाबत मनसोक्त गप्पा मारल्या.


ना संगीताची पार्श्वभूमी, ना प्रशिक्षण

संगीत ही निसर्गानं मानवाला दिलेली विशेष देणगी आहे. ही निसर्गदत्त देणगी ज्यांना लाभली त्यांना कोणत्याही प्रशिक्षणाची गरज भासत नसल्याचं यापूर्वीही अनेकांनी सिद्ध केलं आहे. संगीतकार ट्राॅय-आरीफ यांनाही संगीताची देणगी निसर्गानेच दिली आहे. घरी संगीताची पार्श्वभूमी नाही, कोणीही गॅडफादर नाही, संगीताचं प्रशिक्षण नाही. तरीही आज ट्राॅय-आरीफ मराठीतील आघाडीचे संगीतकार बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.


असं उघडलं मराठीचं दार

हिंदीत सहाय्यक बनून तसंच बँडच्या माध्यमातून लहान-सहान कामं करत असताना आरीफचा भाऊ अब्बासमुळे दोघांची ओळख व्हिडीओ पॅलेसचे संचालक नानुभाई जयसिंघानी यांच्याशी झाली. ट्राॅय-आरीफमधील गुण नानुभाईंनी हेरले आणि दिग्दर्शक आदित्य सरपोतदारच्या ‘क्लासमेट’ सिनेमासाठी दोन गाणी करण्याची संधी दिली. ‘सांग ना…’ व ‘आला रे राजा…’ या दोन गाण्यांनी तरुणाईला वेड लावत ट्राॅय-आरीफ या अमराठी तरुण संगीतकार जोडीने मराठीत पाऊल ठेवलं.


एका मागोमाग एक हिट

‘क्लासमेट’नंतर ‘हाफ तिकीट’, ‘वन वे तिकीट’, ‘बघतोस काय मुजरा कर’, ‘फास्टर फेणे’, ‘व्हॅाट्सअप लग्न’ या मराठी सिनेमांसोबतच ‘थोडी थोडीसी मनमानीयां’, ‘फुल्लू’ या हिंदी, तर ‘सज्जन सिंग रंगरूट’ या पंजाबी सिनेमालाही या जोडीने संगीत दिलं आहे. यात मराठी सिनेमांची संख्या जास्त आहे. झी गौरव, मटा, रेडीओ मिर्ची, संस्कृती कलादर्पण, प्रभात, सकाळ-प्रीमियर, फिल्मफेअर मराठी या पुरस्कार सोहळ्यांसोबतच राज्य पुरस्कार सोहळ्यातही ट्रॅाय-आरीफचं नाव गाजलं.


मराठीचं सेवाव्रत

ट्रॅाय-आरीफ म्हणाले, गाण्यांसोबतच आम्ही दिलेलं पार्श्वसंगीतही रसिकांना आवडत असल्याचा विशेष आनंद होत आहे. आजपर्यंत मराठी सिनेमांतील एखाद-दुसऱ्या गीताला संगीत दिलं आहे. संधी मिळाली तर लवकरच संपूर्ण सिनेमाला संगीत देऊ. अमराठी असूनही मराठी रसिकांनी दिलेला मान-सन्मान कायम स्मरणात राहणारा आहे. भविष्यात खूप काही करायचं असल्याने अशीच साथ लाभावी ही रसिकांकडून अपेक्षा आहे.


आगामी सिनेमे

अरुण साधू यांच्या कथेवर आधारित असलेल्या दिग्दर्शक केदार वैद्य यांच्या ‘झिपऱ्या’ या सिनेमातील ‘धडधडत्या हृदयी...’ या गाण्याला ट्रॅाय-आरीफ यांनी संगीत दिलं आहे. याखेरीज केदारने आपल्या आणखी एका आगामी सिनेमासाठीही दोघांना साइन केलं आहे. या सिनेमाचं शीर्षक अद्याप ठरायचं आहे. 



हेही वाचा - 

कोण बनणार ‘भाई’?

‘कान’नंतर ‘सिडनी’मध्ये ‘मंटो’ची वर्णी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा