Advertisement

विशाखानं रोवली 'स्वामीधाम कलाश्रय'ची मुहूर्तमेढ

श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ, अंबरनाथ संचालित स्वामीधाम मोग्रज, आनंदवाडी, कर्जत येथे या 'स्वामीधाम कलाश्रय' वृद्धाश्रमासाठी जागा मिळाली आहे. या मान्यताप्राप्त संस्थेच्या अन्नछत्राचं उद्घाटन करण्यात आलं असून, भविष्यात 'स्वामीधाम कलाश्रय' या नावाला साजेशी नाट्य कार्यशाळा, वाचनालय, बागकाम, स्विमिंग पूल, परफॉर्मिंग हॉल, विविध खेळ, विरंगुळा असे विविध उपक्रम राबवण्याचा मानस आहे.

विशाखानं रोवली 'स्वामीधाम कलाश्रय'ची मुहूर्तमेढ
SHARES

आपल्या विनोदी अदाकारीनं संपूर्ण महाराष्ट्राला हसवणारी अभिनेत्री विशाखा सुभेदार लवकरच कलाकारांसाठी वृद्धाश्रम सुरू करणार असल्याची बातमी आम्ही यापूर्वीच आपल्याला दिली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त साधत विशाखानं 'स्वामीधाम कलाश्रय'ची मुहूर्तमेढ रोवली आहे.


कलाकारांसाठी वृद्धाश्रम

कलाकार आपल्या आविष्कारातून प्रेक्षकांना आनंद देत असतो. हाच आनंद कलाकारांना त्यांच्या उतारवयात मिळावा यासाठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एक पाऊल पुढे टाकत 'स्वामीधाम कलाश्रय'ची संकल्पना मांडत ती प्रत्यक्षात उतरवली आहे. नववर्षाच्या शुभमुहूर्तावर 'स्वामीधाम कलाश्रय' या वृद्धाश्रमाची मुहूर्तमेढ मान्यवरांच्या उपस्थितीत रोवण्यात आली. श्रीफळ वाढवून व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून शुभारंभाचा सोहळा पार पाडण्यात आला. 'स्वामीधाम कलाश्रय' संस्थेचे सर्वेसर्वा चिंतामणी रहातेकर काका यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं गेलं. 


आर्थिक पाठबळाचं आवाहन 

लेखक-दिग्दर्शक सचिन गोस्वामी, सचिन मोटे, पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे, सुशील इनामदार, निरंजन कुलकर्णी तसंच या संस्थेच्या कामासाठी विशाखाच्या पाठीशी असणारे महेश सुभेदार, जगदीश हडप, निलेश आंबेकर आदि मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना विशाखा म्हणाली की, अभिनय आणि सामजिक कार्य यांची सांगड घालत समाजासाठी विशेषतः कलाकारांसाठी भरीव काहीतरी करण्याचं खूप दिवसांपासून मनात होतं. श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं 'स्वामीधाम कलाश्रय'ची कल्पना सुचली आणि स्वामींच्याच इच्छेनं रहातेकर काका यांचा सहकार्याचा हात व अनेक मान्यवरांच्या आशीर्वादाचं पाठबळ लाभलं. आता मी हाती घेतलेल्या या कामासाठी प्रत्यक्ष मदतीचा हात देणारी, या कलाश्रयसाठी झटणाऱ्या कलाकार मंडळींची व जनसामान्यांची साथ मला हवी आहे. सामाजिक कर्तव्यभावनेतून या उपक्रमाला अधिकाधिक आर्थिक पाठबळ देण्याचं आवाहन विशाखानं केलं.


कर्जत येथे वृद्धाश्रम

श्री अक्कलकोट स्वामी सेवा मंडळ, अंबरनाथ संचालित स्वामीधाम मोग्रज, आनंदवाडी, कर्जत येथे या 'स्वामीधाम कलाश्रय' वृद्धाश्रमासाठी जागा मिळाली आहे. या मान्यताप्राप्त संस्थेच्या अन्नछत्राचं उद्घाटन करण्यात आलं असून, भविष्यात 'स्वामीधाम कलाश्रय' या नावाला साजेशी नाट्य कार्यशाळा, वाचनालय, बागकाम, स्विमिंग पूल, परफॉर्मिंग हॉल, विविध खेळ, विरंगुळा असे विविध उपक्रम राबवण्याचा मानस आहे. या उपक्रमासाठी आवश्यक त्या कायदेशीरबाबींची पूर्तता सुरु असून vish22377@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधून या उपक्रमाला आर्थिक पाठबळ व नियोजनाच्या काही सूचना असल्यास त्या कळविण्याची विनंती विशाखानं कलाकार व रसिकांना केली आहे.



हेही वाचा - 

'बाळा' करणार चौकार-षटकारांची आतषबाजी!

'सलमान सोसायटी'च्या शेवटच्या सत्राला सुरुवात




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा