'सलमान सोसायटी'च्या शेवटच्या सत्राला सुरुवात

हा चित्रपट बाल शिक्षणावर भाष्य करणारा असल्यानं या चित्रपटात काम करणाऱ्या बालकलाकारांच्या शिक्षणाचाही आमच्या टिमनं विचार केला. त्यामुळंच परीक्षांच्या कालावधीत चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अभिनयामुळं मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये हाच यामागचा हेतू होता.

SHARE

सलमान हे नाव जरी उच्चारलं तरी लगेच डोळ्यांसमोर बाॅलीवूड स्टार सलमान खानचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. मराठीतही मागील काही दिवसांपासून सलमानच्या नावाचा गाजावाजा सुरू आहे. सलमानच्या नावाचा समावेश असलेलं शीर्षक असलेल्या 'सलमान सोसायटी' या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या वेगात सुरू आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाच्या अखेरच्या सत्राचा शुभारंभ करण्यात आला आहे.


बच्चे कंपनी खुश 

काही दिवसांपूर्वी 'सलमान सोसायटी' चित्रपटाच्या शूटिंगचं दुसरं शेड्युल आटपाडी येथं सुरू करण्यात आलं होतं, पण बालकलाकारांच्या परीक्षांमुळं ते काही दिवस पुढे सरकवण्यात आलं होतं. या चित्रपटात काम करणाऱ्या बालकलाकारांची परीक्षा संपली आता असून, त्यांना उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानं नव वर्षाच्या शुभारंभी 'सलमान सोसायटी'च्या शेवटच्या सत्राच्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात आल्यानं या चित्रपटातील बच्चे कंपनी सध्या भलतीच खुश आहेत.


बाल शिक्षणावर भाष्य 

'सलमान सोसायटी'चं दिग्दर्शन करणाऱ्या कैलाश पवार यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट बाल शिक्षणावर भाष्य करणारा असल्यानं या चित्रपटात काम करणाऱ्या बालकलाकारांच्या शिक्षणाचाही आमच्या टिमनं विचार केला. त्यामुळंच परीक्षांच्या कालावधीत चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अभिनयामुळं मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये हाच यामागचा हेतू होता. आता परीक्षा संपल्यानं मुलं बिनधास्तपणं आपलं काम एन्जॅाय करतील आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून बरंच काही शिकण्याचाही प्रयत्न करतील असा विश्वास वाटतो.


पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया

बालशिक्षणावर आधारित असलेल्या या चित्रपटाचं कथानक 'पढ़ेगा इंडिया तो बढ़ेगा इंडिया' या टॅगलाईनभोवती गुंफण्यात आलं आहे. शांताराम भोंडवे, वैशाली चव्हाण, रेखा जगताप हे निर्माते प्राजक्ता एण्टरप्राईजेसच्या बॅनर अंतर्गत चित्रपटाची निर्मिती करत आहेत. यात पुष्कर लोणारकर, शुभम मोरे आणि विनायक पोतदार मराठी प्रेक्षकांच्या परिचयाचे असलेले बालकलाकार मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय या चित्रपटात गौरव मोरे, नम्रता आवटे संभेराव, वनिता खरात, नरेंद्र केरेकर आणि तन्वी शिंदे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत.


दिवाळीपूर्वी प्रदर्शित 

पुष्करनं यापूर्वी 'एलिझाबेथ एकादशी', 'बाजी', 'रांजण', 'चि. व चि. सौ. कां.', 'फिरकी' आणि 'टीटीएमएम' या चित्रपटात अभिनय केला असून, शुभम मोरेनं 'रईस' या हिंदी चित्रपटात बालपणीचा शाहरुख खान साकारला आहे. याखेरीज 'हाफ टिकिट', 'फास्टर फेणे' या चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. विनायकनं 'हाफ टिकिट', 'ताजमहल' आणि 'येरे येरे पैसा'मध्ये भूमिका केल्या आहेत. त्यामुळं तीन गाजलेल्या बालकलाकारांची दंगा-मस्तीही 'सलमान सोसायटी'च्या निमित्तानं प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. मुंबई, नवी मुंबईसह आसपासच्या भागात चित्रीत होणारा हा चित्रपट यंदा दिवाळीपूर्वी प्रदर्शित करण्याची योजना आखण्यात आली आहे.हेही वाचा -

२३ वर्षांनी एकत्र आले शिवाजी साटम आणि अलका कुबल

…आणि जॅकीनं केलं थुकरटवाडीच्या भिडूचं कौतुक!
संबंधित विषय
ताज्या बातम्या