सचिन पिळगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार

 Malabar Hill
सचिन पिळगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार

मलबार हिल - पाच दशकांच्या कलाप्रवासात अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पार्श्वगायक, उत्तम नर्तक अशा विविधांगी भूमिकांमधून रसिकांचं मनोरंजन करणाऱ्या सचिन पिळगावकर यांना त्यांच्या रुपेरी पडद्यावरील प्रदीर्घ कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्कार 2017 ने गौरवण्यात येणार आहे. मलबार हिल सिटीझन्स फोरमच्या वतीने दिला जाणारा हा पुरस्कार येत्या 1 एप्रिलला नेपियन्सी रोडवरच्या प्रियदर्शिनी पार्कमध्ये निर्माता, दिग्दर्शक आणि मुंबईचे माजी नगरपाल किरण शांताराम यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. या सोहळ्याची लज्जत वाढवण्यासाठी 'श्री महाराष्ट्र देशा' या मराठमोळ्या सांस्कृतिक आविष्काराचं सादरीकरण होणार आहे. संतोष परब यांची संकल्पना आणि दिग्दर्शन असलेल्या या कार्यक्रमानं आजवर देशभरातल्या रसिकजनांची वाहवा मिळवली आहे.

मराठी, हिंदी, गुजराती कलाविश्व गाजवणारे मराठी मातीतले कलावंत सचिन पिळगावकर यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान आणि मराठी गीत-नृत्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन हा आग्रह करणारे मलबार हिलमधील बहुतांश ज्येष्ठ नागरिक मराठीप्रेमी गुजरातीभाषिक आहेत, हे महत्त्वाचं. या सोहळ्याचं आयोजन मलबार हिल सिटीझन्स फोरम यांच्या वतीने किसन जाधव आणि सुशिबेन शाह यांनी केलं आहे.

Loading Comments