Advertisement

मोदींकडून अफरोज शाहच्या स्वच्छता मोहिमेचे कौतुक


SHARES

तब्बल ८५ आठवड्यांची मेहनत घेतल्यानंतर आज कुठे वर्सोवा समुद्रकिनारा मोकळा श्वास घेतोय. वर्षानुवर्षे साठलेला कचरा, प्लॅस्टिक, प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि उकिरडा यामुळे समुद्रकिनाऱ्यांचा श्वास गुदमरतोय. पण सध्या वर्सोवा समुद्रकिनाऱ्याचा कायापालट झाला आहे. हा समुद्र किनारा पाहून आपण एखादं स्वप्न पाहतोय की काय? असा भास होत आहे. पण हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यामागे हात आहे तो मुंबईतले वकील अफरोज शाह यांचा. 

स्वच्छता मोहिमेसाठी घेतलेल्या पुढाकारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफरोज शाह यांचंं कौतुक केलं आहे. रविवारी 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे त्यांनी अफरोज शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. 


Commended @AfrozShah1 & his team and Reasi in J&K for their contribution towards a clean India. #MannKiBaat https://t.co/WCqPxNroLL

— Narendra Modi (@narendramodi) May 28, 2017


Week 86 of cleanup ends .Dear prime minister congratulates.We pledge to work harder to make our ocean plastic free.https://t.co/mlQ3sMplee pic.twitter.com/AiwTOlgBHR

— Afroz Shah (@AfrozShah1) May 28, 2017

मुंबई बीच क्लीनअपचे पुढचे प्लॅन्स काय आहेत? वर्सोवानंतर कोणत्या बीचवर क्लीनअप मोहीम राबवण्यात येणार आहे? यासंदर्भात अफरोज शाह यांच्याशी केलेली ही दिलखुलास बातचित.

५ जूनला पर्यावरण दिन आहे. तर तुमचं पुढचं प्लॅनिंग काय आहे? मुंबईचे कोणते बीच तुमच्या क्लीनअप लिस्टमध्ये आहेत?
मुंबईत एकूण १९ बीच आहेत. ते सर्वच बीच क्लीनअप करण्याची गरज आहे. हळूहळू आम्ही इतर बीचवरही मोहीम सुरू करणार आहोत. सध्या त्या संदर्भात कुठला आराखडा बनलेला नाही. पण बहुतेक मढ आयलंड किंवा दादर-वांद्रे या बीचवर क्लीनअपला सुरुवात करू. बीचच्या आसपास राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना आम्ही आमच्या मोहिमेत सहभागी करुन घेणार आहोत. स्थानिकांना प्रोत्साहन दिलं तर ते नक्की या कामात आम्हाला हातभार लावतील. अनेक स्थानिक रहिवाशांचे मला कॉल येत आहेत. ते त्यांच्या परिसरात ही मोहीम राबवण्यासाठी उत्सुक आहेत. मुंबईकरांना एकदा कचरा उचलण्याची सवय लागली की ते पुन्हा कचरा खाली टाकणारच नाहीत. कारण त्यांना कळेल की हा कचरा साफ करायला किती मेहनत लागते. 

मोठ्या प्रमाणात कचरा समुद्रातून काढला जातोय. या कचऱ्याची विल्हेवाट कशाप्रकारे लावली जाणार आहे? रिसायकल करण्यात येणार आहे का?
आता तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही प्लॅस्टिकपासून ऊर्जा निर्माण करू शकता. एवढंच नाही, तर प्लॅस्टिकपासून इंजिन ऑईलची सुद्धा निर्मिती करता येऊ शकते. मच्छिमार त्यांच्या बोटीत हे इंजिन ऑईल वापरू शकतात. यासाठी पुण्यात एक प्लांट लावण्यात आला आहे. वर्सोवा बीचवरही हा प्लांट लावण्यात येईल. पालिकेने यासाठी परवानगी सुद्धा दिली आहे. त्यानुसार ते जागा द्यायलाही तयार आहेत. दुसरं म्हणजे कचऱ्याचं वर्गीकरण करण्यासाठी आम्ही एक नवीन मोहीम सुरु करणार आहोत. किनाऱ्यावरून उचलेला कचरा हा वर्गीकरण केंद्रामध्ये जातो. तिथे प्लॅस्टिकचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाते. तुम्ही घरच्या घरी देखील सुका आणि ओला कचऱ्याचं वर्गीकरण करू शकता. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करु शकता. मुळात प्लॅस्टिक नाही, तर आपण खराब आहोत. प्लॅस्टिकला झिरो गार्बेज बनवून त्याच्यापासून प्लॅस्टिक पैसे बनवा. या सर्व कल्पना पुढच्या काळात आम्ही राबवणार आहोत. आता तर ही फक्त सुरुवात आहे. 

समुद्राच्या पाण्यासोबत सर्व कचरा पुन्हा बाहेर फेकला जातो. त्यामुळे पावसाळ्यात तर बीच क्लीन ठेवणं आव्हानात्मक असेल ना?
भरतीबरोबर समुद्रात साठलेला कचरा परत किनाऱ्यावर येतो. मात्र आपण जसे रोज आंघोळ करतो. तसंच हा किनाराही दर आठवड्याला स्वच्छ करावा लागणार आहे. तसंच आम्ही पावसाळ्यासाठीही पूर्ण तयार आहोत. कितीही कचरा येऊ दे, पण आम्ही पुन्हा तो कचरा साफ करू. गेल्या वर्षी सुद्धा आम्ही बीच क्लीन केलाय. शनिवार आणि रविवार दोन दिवस आम्ही दिवसभर बीच साफ करायचो. यावर्षीही करू. एक-एक दिवस आम्ही एक एक लाख टन कचरा उचलला आहे.

तुम्ही सुरू केलेल्या या मोहिमेत किती जणांनी तुमचा साथ दिली?
वर्सोवा किनाऱ्यावर एवढा कचरा होता की हे काम एकट्यानं करणं अशक्य होतं. सुरुवातीला एकटाच होतो. पण हळूहळू स्थानिकांनी पुढाकार घेतला आणि कामात हातभार लावला. २०१६मध्ये पालिका सुद्धा या मोहिमेत सहभागी झाली. वर्सोवा बीचवरून आम्ही ५ मिलियन किलो इतका कचरा जमा केला. पण हे सर्व फक्त नागरिकांनीच नाही केलं, तर यामध्ये पालिकेचाही हातभार आहे. पर्यावरणाचं संवर्धन आणि जतन करणं ही काही फक्त सरकार किंवा पालिकेचीच जबाबदारी नाही. नागरिक म्हणून आपलंही हे कर्तव्यच आहे आणि याचा उल्लेख संविधानात करण्यात आलेला आहे. इतर काम करत आहेत की नाहीत हे पाहण्यापेक्षा तुम्ही तुमचं कर्तव्य नीट पार पाडत आहात का? किती दिवस आपण फक्त तक्रार करत बसणार? जर काही बदल आणायचा आहे, तर पहिली सुरुवात स्वत:पासून करा.

माझा वैयक्तिक अनुभव आहे. मी आजपर्यंत पालिका अधिकाऱ्यांना तक्रारीसाठी पत्र नाही लिहिलं. पालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून मी बीच क्लीनअप मोहिमेची माहिती दिली. त्यांनी मला यात पूर्ण सहकार्य केलं. तुम्ही फक्त त्यांच्याकडे तक्रारच घेऊन जात असाल, तर नकारार्थी वातावरण पसरतं. पण कधी तुमच्या आयडिया त्यांच्यासमोर मांडा. पालिका नक्कीच सहकार्य करेल. तुम्ही प्रेमानं लोकांशी संवाद साधला, तर लोकंही तुमच्या कामाशी जोडले जातील. वर्सोवा गावातील रहिवाशांनीही यात खूप मोठं योगदान दिलं आहे. आता तर युनायटेड नेशनसुद्धा आमच्यासोबत आहे. युनायटेड नेशन खांद्याला खांदा लावून आपल्याला सहयोग करेल. मी सुरू केलेल्या कामाची त्यांनी दखल घेतली ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे.

'कचऱ्यामुळे चांगले मित्र भेटले'

सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच कचऱ्यामुळे मला खूप चांगले मित्र भेटले. लोकांना फेसबुकवर मित्र भेटतात, पण आम्ही बीच क्लीनअप आणि टॉयलेट क्लीनअपसारख्या मोहिमेद्वारे मित्र झालो आणि आज एकत्र या मोहिमेसाठी सहकार्य करत आहोत.

मुंबईत अनेक समुद्र किनारे आहेत. पण तुम्ही वर्सोवा बीचपासूनच का सुरुवात केली?
यासाठी वर्सोवाचा पूर्ण भूगोल समजून घेण्याची गरज आहे. वर्सोवा बीचची खूप मोठी समस्या आहे. मुंबईत अंदाजे २२ मिलियन नागरिक राहतात. त्यापैकी १० मिलियन नागरिकांनी टाकलेल्या कचऱ्याचा भार वर्सोवा बीचवर पडतोय. बोरिवली ते अंधेरी दरम्यान टाकण्यात येणारा सर्व कचरा वर्सोवा बीचवर येतो. मुंबईकरांनी केलेल्या कचऱ्याचा भार एकप्रकारे आम्ही उचलला आहे. त्यामुळे हा भार कुठे ना कुठे कमी करण्याची गरज होती. त्यामुळे वर्सोवापासून माझ्या मोहिमेला मी सुरुवात केली. बीच क्लीनअपसाठी आम्हाला जवळजवळ ८५ आठवडे लागले. अजूनही आमचं काम सुरू आहे आणि पुढेही असंच सुरू राहील.

बीच क्लीनअपसाठी लागलेले ८५ आठवडे तुमच्यासाठी किती कठीण होते?
खरंतर आमच्यासाठी टफ असं काहीच नव्हतं. आमच्यासाठी हे काम म्हणजे पॅशन आहे. आमच्या कामावर आम्हाला अभिमान तर आहेच, शिवाय कामावर आमचं प्रेमही आहे. मनापासून आम्ही हे काम करतो. त्यामुळे आम्हाला हे काम करायला कठीण असं काही वाटलं नाही. पण हे खूप सोपं आहे. आम्ही जास्त काही असं केलंच नाही. फक्त हातात ग्लोव्ह्ज घातले आणि कामाला लागलो. फक्त दोन तास. तुम्हाला या कामासाठी आठवड्याचे फक्त दोन तास द्यायचे आहेत. पुढाकार घ्या आणि तुमच्या परिसरात कामाला लागा. मानसिकता आणि हृदयाचे परिवर्तन होण्याची गरज आहे. एकदा ते झाले की कोणासाठीही हे काम कठीण नाही.

वैयक्तिक आयुष्य आणि वकिली पेशा,या दोन्ही गोष्टी सांभाळत बीच क्लीनअप ही मोहीम कशी राबवली?
यात अवघड असं काहीच नाही. सोमवार ते शुक्रवार मी माझी वयैक्तिक कामं आणि कोर्टाची कामं करतो. तर शनिवार आणि रविवार मी बीचवर साफसफाई करताना दिसेन. लोकं काय करतात, फक्त स्वत:च्या कामावरच फोकस करतात किंवा आपलं व्यवसायिक हितच जपतात. पण तसं व्हायला नको. आयुष्यात आपण समतोल राखला पाहिजे. ३६५ दिवस आहेत. फक्त दोन तास द्या. पण सुरुवात तरी करा. पर्यावरणाला याची खरंच खूप गरज आहे. जर तुम्ही आज नाही केलंत, तर कधीच करू नाही शकणार. सुरुवातीला मी दोन तास बीचवर साफसफाई करण्यासाठी द्यायचो. पण आता मी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस बीच स्वच्छ करतो. मी अक्षरश: वीकेंडची वाट पाहत असतो. कधी वीकेंड येईल आणि मी माझं काम सुरू करीन. मला वाटतं की हे काम पहिलंही होऊ शकलं असतं. पण ठीक आहे.

बीचवर पसरणाऱ्या या अस्वच्छतेसाठी नक्की कोण जबाबदार आहे? मुंबईकर की साफसफाईची जबाबदारी असलेली पालिका?
देश स्वतंत्र झाल्यापासून आपण फक्त एकमेकांवर बोट उचलतोय. कोणी म्हणतंय हे सरकार आणि पालिकेचं काम आहे, तर कोणी म्हणतंय की हा करेल तो करेल. पण पहिली सुरुवात स्वत:पासून केली पाहिजे असा कोणी विचारही करत नाही. साधा कोणी यासाठी पुढाकार घेत नाही. तुमच्यासोबत कोणी असो वा नसो, पण पहिली सुरुवात ही स्वत:पासून केली पाहिजे. तुम्ही बदलाल तर जग बदलेल. महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही पुढाकार घेऊन देशासाठी हेच केलं. मी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे. आपल्याला त्रास होतोय तर मग यातून मार्गही आपणच काढला पाहिजे. गांधीजींनी केलेला मिठाचा सत्याग्रह हे एक उत्तम उदाहरण आहे. मिठासाठी त्यांनी एल्गार पुकारला आणि त्यात त्यांना यश आलं. मी सुद्धा तेच करतोय. मला वाटलं मुंबईच्या समुद्र किनाऱ्याची सुंदरता या कचऱ्यामुळे नष्ट होत आहे. मग मी तो कचरा उचलण्याची जबाबदारी घेतली. मी नागरिकांना तेच सांगतो, की तुम्ही एकदा जबाबदारी घेतली की ती पूर्ण करा. प्रामाणिकपणे आणि एकजुटीने काम करणं गरजेचं आहे.

एकीकडे मुंबई अस्वच्छ करणारे नागरिक आहेत तर दुसरीकडे मुंबईला सुंदर आणि स्वच्छ बनवण्यासाठी झटणारे अफरोज शहा यांच्यासारखे अवलियाही आहेत. तुम्हाला कोणत्या टीममध्ये सामील व्हायचे आहे? हे तुम्हालाच ठरवायचे आहे. अफरोज शहा यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या आगळ्या वेगळ्या पण अतिमहत्त्वाच्या कामासाठी त्यांना 'मुंबई लाइव्ह'चा सलाम...

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा