रमजानमध्ये बुऱ्हानी फाऊंडेशन लावणार 40 हजार झाडे!

  Mumbai
  रमजानमध्ये बुऱ्हानी फाऊंडेशन लावणार 40 हजार झाडे!
  मुंबई  -  

  विकासाच्या नावावर मुंबईसह देशभर झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे. ही झाडांची कत्तल अशीच सुरू राहिली, तर भविष्यात त्याचा काय परिणाम होईल, याचा विचारच करायला नको असे म्हणत आता पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मुंबईतील दाऊदी बोहरा समाज पुढे सरसावला आहे. बुऱ्हानी फाऊंडेशनच्या माध्यमातून मुंबईभर बोहरा समाजाने रमजानच्या काळात 40 हजार झाडांची लागवड करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार या झाडांच्या लागवडीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत 2 हजार झाडांची लागवड करण्यात आल्याची माहिती बुऱ्हानी फाऊंडेशनचे शेख अब्बेअली भानेपुरवाला यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

  पर्यावरण संवर्धनासाठी दाऊदी बोहरा समाजाने मुंबईसह देशभर 2 लाख झाडांच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार बुऱ्हानी कॉलनी, ट्रस्ट, संस्थांच्या जागेत, कब्रस्तानमध्ये झाडांची लागवड करण्यात येत आहे. तर मुंबई महापालिकेच्या मदतीने जिथे कुठे मोकळी जागा मिळेल आणि झाडे योग्य प्रकारे तग धरू शकतील अशा जागा निवडत तिथेही झाडांची लागवड करण्यात येत असल्याचेही भानेपुरवाला यांनी सांगितले आहे. रमजानच्या काळात सर्व एकत्र येतात, त्यामुळे रमजान दरम्यान झाडांच्या लागवडीबाबत जनजागृती करत झाडांची प्रत्यक्ष लागवड करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे रमजानदरम्यान 40 हजार झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहेच, पण त्यानंतरही झाडांच्या लागवडीचा उपक्रम सुरुच राहणार आहे. जिथे जागा मिळेल तिथे झाडे लावली जाणार असल्याचेही भानेपुरवाला यांनी सांगितले आहे.


  हेही वाचा

  महापालिका म्हणते, आता तुम्हीच लावा झाडे!

  पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे वरळी हिलचे बाबुजी!


  झाडे लावली म्हणजे पर्यावरण संवधर्नाच्या दृष्टीने आपली जबाबदारी संपली, असे या उपक्रमात अजिबात होणार नाही. कारण झाडे लावण्याबरोबरच या झाडांची पुढची जबाबदारीही झाड लावणाऱ्या त्या त्या व्यक्तीवर टाकण्यात आली आहे. त्यासाठी झाडांना क्रमांक देण्यात आले असून, त्या व्यक्तीने झाडांची पूर्ण काळजी घेणे आवश्यक ठरणार आहे. तर झाडांची योग्य काळजी घेतली नाही आणि झाड मृत झाले, तर त्याला त्या व्यक्तीस जबाबदार ठरवले जाणार असल्याचेही भानेपुरवाला यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या उपक्रमातील ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. बुऱ्हानी फाऊंडेशनच्या या उल्लेखनीय उपक्रमामुळे मुंबईतील हिरवळ वाढण्यास मदत होणार असल्याचे म्हणत त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.