छाटणीच्या नावाखाली झाडांची सर्रास कत्तल

मुंबई - विकासाच्या नावाखाली मुंबईत एकीकडे झाडांची बेसुमार कत्तल सुरू असताना दुसरीकडे छाटणीच्या नावावर कंत्राटदारांकडूनही झाडांची सर्रास कत्तल सुरू असल्याची धक्कादायक बाब सातत्याने समोर येत आहे. रविवारी, 2 एप्रिलला सकाळी मंत्रालयाजवळ छाटणीच्या नावावर दोन झाडांची कत्तल करणाऱ्या कंत्राटदाराला अखेर पर्यावरण प्रेमी आणि स्थानिकांनी चांगलाच दणका दिला. यासंबंधी पालिकेकडे तक्रारही दाखल केली. छाटणीच्या नावावर झाडांची कत्तल होत असताना, पालिका आणि वृक्ष प्राधिकरण करतेय काय? असा प्रश्न पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी खार सबवे येथे अशाच प्रकारे छाटणीच्या नावावर झाडांची कत्तल केली जात असल्याचं समोर आलं होतं. सेव्ह ट्रीच्या सदस्यांनी झाडांची कत्तल रोखली होती. आता रविवारी पुन्हा मंत्रालयाजवळील मादाम कामा रोडवर सकाळी साडे दहाच्या सुमारास दोन झाडे कापली जात असल्याचे सेव्ह ट्रीचे सदस्य आकाश शर्मा यांच्या निदर्शनास आले. याविषयी संबंधित कंत्राटदाराकडे विचारणा केली असता पावसाळ्याच्या धर्तीवर येथील सहा झाडांची छाटणी करण्याची परवानगी असल्याचे कंत्राटदाराकडून सांगण्यात आले. पावसाळ्याला अजून बराच वेळ असताना आणि मूळात छाटणीची परवानगी असताना झाडांची कत्तल का करताय अशी विचारणा शर्मा यांनी करत त्वरीत काम थांबवण्यास सांगितले. पण कंत्राटदाराने झाड कापण्याचे काम सुरूच ठेवले. त्यामुळे शर्मासह अन्य सेव्ह ट्री सदस्यांनी त्वरीत पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याकडे तक्रार करत अखेर हे काम थांबवले. पण तोपर्यंत सहापैकी दोन झाडांची कत्तल झाली होती.

मुंबईतील तापमानात प्रचंड बदल होत असून झाडांची कत्तल हे त्याचे एक मुख्य कारण आहे. असे असताना झाडे वाचवण्याऐवजी झाडांची बेसुमार कत्तल सुरू असून हे भविष्यासाठी अत्यंत घातक आहे. पण ज्यांच्यावर झाडांची कत्तल रोखण्याची जबाबदारी आहे ते पालिका प्रशासन आणि वृक्ष प्राधिकरण मात्र मूग गिळून गप्प का आहे? असा सवाल करत शर्मा यांनी सरकारी यंत्रणांच्या या भूमिकेबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. तर या सर्व बाबी सेव्ही ट्री संदर्भातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.

Loading Comments