Advertisement

मेट्रो-3 साठी झाडे तोडण्यास न्यायालयाची स्थगिती


मेट्रो-3 साठी झाडे तोडण्यास न्यायालयाची स्थगिती
SHARES

मुंबई - कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो 3 मार्गातील झाडांच्या कत्तलीला उच्च न्यायालयाने गुरूवारी स्थगिती दिली. झाडांची कत्तल करत पर्यावरणाचा ऱ्हास करू नये, झाडांची कत्तल न करताही मेट्रो मार्गी लावता येईल असं म्हणत झाडांची कत्तल थांबवण्यासाठी सेव्ह ट्री ग्रुपने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने पुढील निर्णय येईपर्यंत झाडांच्या कत्तलीला स्थगिती दिली आहे. पुढील आदेश येईपर्यंत एकही झाडं कापता येणार नाही, अशी ताकीदही न्यायालयाने दिली आहे. मेट्रो-3 च्या कामाला मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जोरात सुरुवात केली असताना ही स्थगिती आल्याने हा मेट्रो-3 प्रकल्पासाठी आणि एमएमआरसीसाठी मोठा दणका मानला जात आहे. तर सेव्ही ट्रीच्या लढ्याला आलेले हे यशही मानले जात आहे.

सेव्ही ट्रीचे सदस्य झोरू बाथेना यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी झाडांच्या कत्तलीला स्थगिती तर दिली आहेच, पण त्याचवेळी झाडांची कत्तल न करता मेट्रो नेता येईल का यासंबंधीचा अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे निर्देशही दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे कफ परेड, चर्चगेट भागातील झाडांची कत्तल रोखण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. असं असताना न्यायालयाने मेट्रो-3 प्रकल्पातील सर्वच्या सर्व आरेसह 5, 012 झाडांच्या कत्तलीला स्थगिती दिली आहे. तर, समितीही स्थापन करण्यात येणार आहे. त्यामुळे झाडांची कत्तल थांबण्याची आशा निर्माण झाल्याचे सेव्ह ट्रीकडून सांगितले जात आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सेव्ह ट्री ग्रुपमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता यासंबंधीची संपूर्ण माहिती अद्यापपर्यंत आली नसल्याचं म्हणत एमएमआरसीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

मेट्रो-3 च्या कामावर परिणाम

झाडे कापण्यास स्थगिती दिल्याने याचा परिणाम मेट्रो-3 च्या कामावर होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. कारण, झाडे कापल्याशिवाय काम करताच येणार नाही. संपूर्ण प्रकल्पात झाडे कापता येणार नसल्याने परिणामी मेट्रो-3 च्या कामाला खीळ बसणार असल्याची चर्चा आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा